चिपळूण (रत्नागिरी) : महाराष्ट्रातील विजेची निर्मिती मागणीपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे आता खासगी वीज कंपन्यांची वीज सरकारने घ्यावी. प्रसंगी दरात कपात करण्याची तयारी खासगी कंपन्यांनी दाखवली आहे. त्यामुळे २०२१ या वर्षात ग्राहकांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
राज्यात विजेची सरासरी मागणी २० हजार मेगावॉटच्या आसपास असून वीज खरेदी करारांमुळे उपलब्धता २५ हजार मेगावॉटपेक्षा अधिक आहे. २००१ मध्ये मागणीपेक्षा विजेचा पुरवठा कमी असल्याने भारनियमन केले जात होते. त्या काळात वीजनिर्मितीला चालना देण्यासाठी खासगी वीजकंपन्यांना वीजप्रकल्प उभारण्यास प्रोत्साहन देण्यात आले. परिणामी अनेक उद्योजकांनी खासगी वीज प्रकल्प उभारले.
हेही वाचा - जगाला हेवा वाटावा असा देश निर्माण करूया! -
वीजटंचाईच्या काळात कधी कोळसा महाग झाल्याचे कारण सांगत तर कधी परदेशातील कोळसा खाणीचे कायदे बदलल्याचे कारण सांगत वीजदर हवे तसे वाढवून घेतले. मागील २० वर्षात सौर ऊर्जेसह अनेक स्रोत तयार झाले. खासगी वीज प्रकल्पांची संख्याही वाढली. त्यामुळे मागणीपेक्षा ५ हजार मेगावॉट वीज अतिरिक्त उपलब्ध झाली आहे. २०२४ पर्यंत आणखी काही प्रकल्पातून वीज निर्मिती सुरू होणार आहे.
मागणी कमी व पुरवठा जास्त अशी परिस्थिती असल्याने राज्य वीज नियामक आयोगाने ज्याची वीज स्वस्त त्याच्याकडून आधी खरेदी (मेरिट ऑर्डर डिस्पॅच) तत्त्व लागू केले. वीजदरानुसार सरकारी-खासगी वीज कंपन्यांची यादी दर महिन्याला तयार होते. त्यानुसारच राज्याला वीजपुरवठा करण्यासाठी विविध वीजप्रकल्पांकडून वीज खरेदी करण्याचे बंधन महावितरणवर आहे. महावितरणच्या आधी स्वस्त वीज या तत्त्वामुळे अनेक नामवंत उद्योगपतींचे वीजसंच वीजनिर्मितीचा दर महाग असल्याने अनेक महिने बंद आहेत. यात ‘रतन इंडिया’च्या १२०० मेगावॅट वीज प्रकल्पाचाही समावेश होता.
वीजदर इतरांच्या तुलनेत महाग असल्याने आपला संच बंदच राहत असल्याचे लक्षात आल्यावर ‘रतन इंडिया’ने आपल्या मंजूर वीजदरात कपातीचा अर्ज राज्य वीज नियामक आयोगाकडे केला. त्यास वीज आयोगाने मंजुरी दिली. परिणामी ‘रतन इंडिया’च्या विजेचा दर आता ३.२५ रुपये प्रति युनिटवरून २.८७ रुपयांवर आला. १ जानेवारीपासून स्वस्त वीजपुरवठा यादीत रतन इंडियाच्या १२०० मेगावॉट विजेची भर पडली आहे.
प्रति युनिट ५० ते ८५ पैसे दर कमी
सरकारच्या महावितरण कंपनीला खासगी कंपन्यांकडून स्वस्त दरात वीज उपलब्ध झाली तर घरगुती दरात प्रति युनिट ५० ते ८५ पैसे दर कमी होईल. व्यावसायिक दरात प्रति युनिट ९२ पैसे दर कमी होण्याची शक्यता आहे.
संपादन - स्नेहल कदम
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.