मालवण : अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरून पुढे सरकल्यानंतरही सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पडझड, वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत. किनारपट्टीवर ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने बंदर विभागाच्यावतीने तीन नंबरचा बावटा लावला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे व मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचे रूपांतर निसर्ग चक्रीवादळात झाले आहे. त्यामुळे गेले दोन दिवस किनारपट्टी भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा तडाखा बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र उपग्रहावरून घेतलेल्या माहितीनुसार हे वादळ सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरून पुढे सरकल्याचे दिसून आले. वादळ पुढे सरकले तरी धोका टळला नसल्याने प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेत किनारपट्टीसह, खाडी, नदीकिनारी वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना दिल्या.
रात्रीपासून किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे पडली. विजतारा कोसळून नुकसान झाले. शहरातील बाजारपेठ भाजी मंडईवरील पत्रे उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा काल सायंकाळ पासूनच खंडित झाला होता. यात सकाळी काही भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला तर अन्य भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते.
हे पण वाचा - आणि बघता बघता खाक झाले 25 लाख
किनारपट्टीवरील देवबाग येथे माडाची झाडे पडून नुकसान झाले आहे. काळसे बागवाडी मळा येथे झाड पडल्याने घर व शौचालयाचे नुकसान झाले आहे. किल्ले सिंधुदुर्ग येथे झाड पडल्याने विद्युत खांबाचे नुकसान झाले आहे. आचरा जामडूल येथेही झाड पडून नुकसान झाले आहे. देवगड येथील संतोष परब यांच्या घरावर माडाचे झाड पडून नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. घरातील मंडळींना शेजारी हलविण्यात आले आहे. वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड येथील नारायण मेस्त्री यांच्या घरावर माडाचे झाड पडून सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वजराठ येथील गोपाळ गावडे यांच्या घरावर झाडाची फांदी पडून नुकसान झाले आहे.
हे पण वाचा - दिलासादायक... कोरोना काळातही प्लेसमेंटच्या संधी
दाभोली मोबारवाडी येथे वीज वाहिन्यांवर झाड पडल्याने नुकसान झाले आहे. समुद्र खवळला असल्याने मच्छीमारांनी अगोदरच आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी हलविल्या आहेत. अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळत होता. किनारपट्टीच्या भागात वाऱ्याचा जोर कायम असल्याचे दिसून आले. बंदर विभागाच्या वतीने धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा बंदरात लावला आहे अशी माहिती बंदर अधिकारी अमोल ताम्हणकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.