पुन्हा एकदा जाधव विरुद्ध कदम संघर्ष

zp-election
zp-election
Updated on

चिपळूण - तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे याआधीच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट झाले आहे. रमेश कदम यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले. भास्कर जाधव यांचे समर्थक शिवसेनेत गेले. 

रमेश कदम समर्थकांमुळे भाजपचा गड मजबूत होण्यास मदत होईल. यामुळे काही ठिकाणी शिक्के बदलले असले तरी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे भास्कर जाधव विरुद्ध रमेश कदम असाच संघर्ष दिसणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्व पक्षांची उमेदवार निश्‍चिती मोहीम सुरू आहे. अनेक विभागात उमेदवार निश्‍चित झाले असून त्यांनी प्रचारास सुरवात देखील केली. राष्ट्रवादीत भास्कर जाधव व रमेश कदम यांच्यातील वाद जगजाहीर होता. पक्षांतर्गत कुरघोडीमुळे रमेश कदमांनी राष्ट्रवादीस रामराम केला. दोघांतील वाद सुरू असतानाच मधल्या काळात जाधव यांनी त्यांच्या समर्थकांना सेनेत पाठवले. दोन्ही नेत्यांच्या वादात राष्ट्रवादीचे झालेले नुकसान कसे भरून काढणार याचीही उत्सुकता आहे. काँग्रेसमध्ये संदीप सावंत यांची तालुकाध्यक्षपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर अद्याप नवीन नियुक्ती झालेली नाही. आगामी निवडणुकीसाठी मेळावे अथवा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीस जोर आलेला नाही. 

नीलेश राणे यांनी तालुक्‍यात काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यास मोठे यश आलेले नाही. तालुक्‍यात एकही जिल्हा परिषद अथवा पंचायत समिती सदस्य नाही. हे चित्र बदलण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. केडर बेस असलेल्या शिवसेनेची तालुक्‍यात जोमाने वाटचाल सुरू आहे. राष्ट्रवादीतील फुटीचा फायदा घेण्यात सेना पदाधिकारी गुंतले आहेत. पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण यांनी भूमिपूजन व उद्‌घाटनांचे अनेक फटाके फोडून आम्हीच विकास केल्याचे दाखवले आहे. 

भाजपला पालिका निवडणुकीत यश मिळाले. पंचायत समितीसाठी प्रथमच ते स्वबळावर लढणार असल्याने पदाधिकाऱ्यांना ताकद दाखविण्याची संधी आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला आयात उमेदवार असतानाही दहा हजार मते मिळाली. त्यानंतर यात निश्‍चिती वाढ झाली आहे.

आरक्षण-पंचायत समिती
 अनुसूचित जाती स्त्री- कापसाळ 
 नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) पेढे, कळबंट, मुर्तवडे
 नागरिकांचा मागास प्रवर्ग - मालदोली, कुटरे
 सर्वसाधारण स्त्री- सावर्डे, कोकरे, टेरव, ओवळी, रामपूर
 सर्वसाधारण- कोंढे, खेर्डी, चिवेली, दहिवली बुद्रुक, पोफळी, अलोरे

जिल्हा परिषद-गट
 सर्वसाधारण महिला स्त्री- पेढे, पोफळी, कळबंट, रामपूर, मालदोली, कोकरे, खेर्डी
 नागरिकांचा मागास प्रवर्ग- अलोरे  सर्वसाधारण- सावर्डे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()