Raigad : आमचे गार्डन पूर्वव्रत होईल का? भुमाफियांवर कारवाई कधी? पालीतील बालोद्यानाबाहेर फलकांद्वारे संतप्त नागरिकांचा सवाल
पाली : पालीतील राम आळीमध्ये असलेल्या एकमेव बालोद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सद्यस्थितीत हे बालोद्यान अखेरची घटका मोजत असल्याने अनेक नागरिकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. आणि हा संताप बालोद्यानाबाहेर अज्ञातांनी सर्व ठिकाणी फलक लावून व्यक्त करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता.19) ही बाब समोर आली आहे.
आमचे गार्डन पूर्वव्रत होईल का?, भु माफियांवर कारवाई कधी होणार?, आमचा गार्डन अतिक्रमनापासून मुक्त होईल का? अनधिकृत शेड हटवा आमचे गार्डन वाचवा, अनधिकृत शेडवर नगरपंचायतचा बुलडोझर कधी फिरणार?
गार्डन आहे पालिकरांचा नाही कोणत्या भु माफियांचा अशा आशयाचे बॅनर बलोद्यानाच्या तारेच्या कुंपणाला सर्वत्र लावण्यात आले आहेत. संपूर्ण पाली शहरात हा चर्चेचा विषय झाला असून नागरिक या गोष्टीचे समर्थन करत आहेत.
संघर्ष ग्रुप आणि तत्कालीन पाली ग्रामपंचायती मार्फत लहान मुलांची गरज ओळखून तीन वर्षांपूर्वी येथील राम आळी मध्ये हे बालोद्यान बनविण्यात आले होते. त्यानंतर पाली ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि नगरपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक झाली.
दरम्यानच्या काळात उद्यानाकडे दुर्लक्ष झाले. दोन वर्षांपूर्वी जानेवारी 2022 रोजी नगरपंचायत निवडणूक होऊन नगरपंचायत प्रस्थापित झाली. यावेळी या बलोद्यानाला नवी झळाळी येईल अशी अपेक्षा होती मात्र हे बालोद्यान जैसे थेच आहे. येथील पाळणे, सी-सॉ, गेट व बाकडे तुटले आहेत. तारेचे कुंपण अनेक ठिकाणी मोडले आहे.
त्यामुळे येथे गुरांचे सर्रास वास्तव असते. येथे अनधिकृत पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे. येथील झाडे व गवत कोमेजून गेले आहे. फरशांची दुरवस्था झाली आहे. आजूबाजूला वाहने पार्क केलेली असतात. परिणामी लहानग्यांना खेळण्यासाठी हक्काचे ठिकाण नसल्याने त्यांचा प्रचंड हिरमोड होत आहे.
अशाप्रकारे अज्ञात नागरिकांनी आपली भावना व्यक्त करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. कारण संघर्ष ग्रुप आणि तत्कालीन ग्रामपंचायत ने मिळून केलेल्या उद्यानाकडे नगरपंचायतचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे लहानग्यांना खेळण्यासाठी हक्काची जागा नाही. नगरपंचायतने उद्यानाची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करून नवी झळाळी द्यावी.
- अमित निंबाळकर, माजी ग्रामपंचायत सदस्य, पाली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.