मंडणगड (रत्नागिरी) : तालुक्यातील पणदेरी धरणाला (Panderi Dam) मुख्य भिंतीत कालव्याच्या मुखाशी मोठी गळती लागून लाल माती मिश्रित पाणी नदीला जावून पोहचले. चार दिवसांपासून पाऊस गायब झाला असताना पाण्याचा गढूळ रंग पाहून परिसरातील नागरिक भयभीत झाले. काही मिनिटातच धरणाला गळती लागल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. घटनेने खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने गळती थांबविण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या. धरण परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करून सतर्कतेचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.panderi-dam-case-in-mandangad-ratnagiri-marathi-news
धरणातून निघालेल्या कालव्याच्या भिंतीजवळ ता.५ जुलै रोजी मोठी गळती लागली असून त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात मुख्य भिंतीतून पाणी झिरपून धरणातून बाहेर येत आहे. गळती ठिकाणी पिचिंग करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोत्यातून माती भरून भराव केला जात आहे. तसेच धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पाण्याचा दाब कमी करण्यासाठी विसर्ग होणाऱ्या सांडव्याची भिंत तोडून उंची कमी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सिमेटचा बंधारा कमी करण्यासाठी ब्लास्टीग मशीनचा वापर करण्यात येत आहे. पाणी पातळी कमी होईल असा अंदाज होता, मात्र ११८.६० मीटर इतक्या पुर्ण क्षमतेतने जलाशय भरलेला आहे. याशिवाय वरील भागातून ओढ्यातून जलाशयात येणारे पाणी सुुरुच असल्याने इतक्या प्रयत्नानंतरही पाणी पातळी कमी होण्यास विलंब लागत आहे. शेकडों मजूर, जेसीबी, ट्रॅक्टर, डंपर, पोकलंड मशीन गळती थांबविण्यासाठी कार्यरत करण्यात आले असून मातीचा भराव करून त्यावर पिचिंग करण्यात येणार असल्याचे अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
सखल भागातील नागरिकांचे स्थलांतर
परिसरातील पंदेरी बौद्धवाडी, रोहिदासवाडी, कोंडगाव या गावातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना करून त्यांचे उंचावर असणाऱ्या भागात विस्थापन करण्याचे काम सुरू आहे. पणदेरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा याठिकाणी त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे २०० नागरिकांना स्थलांतरित केल्याची माहिती तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांनी दिली.यंदाचे हंगामात या धरणाचे भिंतीचे मजबुतीकरण करण्यात आले. मात्र त्याच्याबाजूच्या ठिकाणीच गळती लागल्याने काम हवं त्याठिकाणी झाले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातो आहे. मात्र गळतीमुळे मोठा धोका नसल्याचे संबंधित अधिकारी यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांची फौज घटनास्थळावर
घटनेची माहिती मिळताच मंडणगड, खेड, दापोली येथील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची फौज घटनास्थळावर दाखल झाली. यामध्ये प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेगुर्लेकर, रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता वैशाली नाडकर, कार्यकारी जगदीश पाटील, उपअभियंता गोविंद श्रीमंगले, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकुमार काशीद, पोलीस निरिक्षक श्री.आंब्रे, पोलीस निरीक्षक उत्तम पीठे, सुशांत वराळे घटनास्थळी हजर झाले. नागरिकांना आवाहन करून सुरक्षेसाठी स्थलांतरित करण्याचे काम सुरू करण्यात आले.
पणदेरी धरण प्रकल्प
धरणाची लांबी- २६५ मीटर
धरणाची उंची - २७.९० मीटर
कालव्याची लांबी - डावा कालवा ४ मीटर, उजवा कालवा २.८४ मीटर,
पाणी साठवण्याची क्षमता - ४.०१ दश लक्ष घनमीटर,
सिंचन क्षेत्र - 255 हेक्टर
सिंचना क्षेत्राखालील गावे - पणदेरी, दंडनगरी, बहीरवली, कोंडगाव, घोसाळे
धरणाची भिंत जुनी असल्याने गळतीची ही समस्या निर्माण झाली आहे. शक्य ती सर्व उपाय करुन पाणी पातळी कमी करून गळती थांबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी यांत्रिकी मशिनरी व स्थानिक मजुरांच्या मदतीने काम सुरू आहे. कुठलाही मोठा धोका नसून सतर्कता म्हणून परिसरातील गावांतील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.
- गोविंद श्रीमंगले, उपअभियंता लघु पाटबंधारे
प्रशासनाकडे या धरणांचे विविध समस्या संदर्भात वांरवार तक्रारी करुनही सुरक्षीततेच्या समस्याबाबत प्रशासनाने पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे. आजच्या घटनेस पुर्णपणे प्रशासन जबाबदार असून प्रशासनास याबाबत मी वांरवार पत्रव्यवहार केला आहे. करोडो रुपयांचा निधी खर्च होऊनही या धरणाचा स्थानीक शेतकऱ्यांना काडीचाही उपयोग झालेला नाही. उलटपक्षी वांरवार काम करुन अधिकारी व राजकरण्याना भ्रष्टाचाराचे नवे कुरण मिळाले आहे. या घटनेस कारणीभुत असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई करण्यात यावी.
जमीर माखजनकर, जनरल सेक्रेटरी, जिल्हा काँग्रेस व स्थानिक ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.