कणकवली (सिंधुदुर्ग) - ओस पडलेल्या चिरेखाणीमधूनही चांगले शेती उत्पादन मिळवता येते हे आंबडोस येथील धोंडी नाईक या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. त्यांनी दोन गुंठे क्षेत्रात बुश जातीची मिरी लागवड केली आहे. या मिरीची सध्या काढणी सुरू असून किमान 30 ते 35 हजाराचे उत्पन्न निश्चितपणे मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आंबडोस येथील धोंडी नाईक यांच्या मालकीच्या क्षेत्रात चिरेखाणी होत्या. चिरे उत्पादन क्षमता संपल्यानंतर या खाणी ओस पडल्या होत्या; मात्र या खाणीमधूनही चांगले उत्पादन मिळवू शकू, असा आत्मविश्वास असलेल्या नाईक यांनी आंबा, काजू, कलिंगड आदी विविध फळपिकांबरोबर भात आणि विविध भाजीपाल्याचीही लागवड केली आहे. तर दोन वर्षांपूर्वी त्यांना चांदा ते बांदा योजनेतून बुश जातीच्या मिरीची रोपे मिळाली. या रोपांची यशस्वी लागवड आणि जोपासना त्यांनी केली.
यंदा या रोपांना चांगल्या दर्जाची मिरी लागली असून दोन गुंठे क्षेत्रातील 200 मिरी रोपांपासून 100 ते 120 किलोपर्यंत मिरीचे उत्पादन निघेल आणि किमान 30 ते 35 हजाराचे उत्पन्न या मिरी लागवडीतून मिळेल, असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला. पारंपरिक मिरी रोपांपेक्षा बुश जातीच्या मिरी रोपांपासून अधिक आणि खात्रीशीर उत्पन्न मिळत असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यात अनेक भागांत चिरेखाणीचा भाग सध्या ओस आहे. त्याठिकाणी बोअरवेल किंवा इतर माध्यमातून पाण्याची उपलब्धता झाली तर अनेक पिके देखील घेता येऊ शकतात. त्यादृष्टीने तरुणांनी शेतीकडे वळावे, असेही आवाहन धोंडी नाईक यांनी केले.
दरम्यान, जिल्ह्यात अनेक शेतकरी आपल्या परसबागेत मिरी लागवड करतात; मात्र मिरीची रोप अडीच मिटरपेक्षा अधिक उंच गेली तर मिरी काढणीचा खर्च अधिक येतो. तसेच जेवढी मिरी उंच वाढेल तेवढे उत्पन्नही कमी निघते. त्यामुळे आम्ही चिरेखाणीत अडीच मिटर पर्यंत मिरीची वाढू दिली. त्यामुळे उत्पादनही चांगले निघाले, असे नाईक यांनी सांगितले.
विविध पिकांना हवे प्राधान्य
कोरोना काळात शेतीनेच सर्वाना जगविले हे खरे असले तरी लॉकडाऊन सदृश परिस्थितीचा फटका शेतकऱ्यांनाही बसतोय. काजू प्रमाणेच कलिंगड पिकालाही यंदा कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध प्रकारची फळे, भाजीपाला आणि अन्य पीक लागवडीलाही प्राधान्य द्यायला हवे. तरच शेतीमधून चांगले उत्पन्न मिळू शकते.
कमी पाण्यातही मिरीपासून अधिक उत्पन्न मिळण्याची हमी आहे. चार वर्षांपूर्वी सुकवलेल्या काळ्या मिरीला सहाशे ते सातशे रूपये प्रतिकिलो एवढा दर होता. इतर देशातून मिरीची आयात मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने सध्या 300 ते 350 रूपये प्रतिकिलो एवढा दर मिळत आहे. स्थानिक बाजारपेठेची उपलब्धता असल्याने यातून अणखी उत्पन्नाची संधी आहे.
- धोंडी नाईक, शेतकरी, आंबडोस
संपादन - राहुल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.