Karjat-Khalapur Assembly Election : कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणून विकासकामांचा झपाटा लावल्याचे चित्र आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे समर्थक सुधाकर घारे यांच्याकडून शिवसेनेचे शिलेदार आपल्याकडे आणून आमदार थोरवे यांना राजकीय शह देण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.
सुधाकर घारे व महेंद्र थोरवे यांच्या राजकीय प्रतिस्पर्धेत मतदारसंघातील सर्वात अनुभवी नेते व तीन वेळा आमदारकी भूषवलेले माजी आमदार सुरेश लाड यांनी शरद पवार यांच्याबरोबर जात ऐनवेळी मोठे राजकीय फासे टाकण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांना महाविकास आघाडी अर्थात आताच्या इंडिया आघाडीचे काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे यांची व त्यांचे पदाधिकाऱ्यांची साथ प्राप्त होत आहे.
शिवसेना उप जिल्हाप्रमुख नितीन सावंत स्पर्धेत अग्रणी आहेत. माजी आमदार सुरेश लाड व नितीन सावंत यांच्यात राजकीय सहकार्याची समीकरणे दिवसेंदिवस बिघडत असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत-खालापूर मतदारसंघात तिरंगी लढत निश्चित मानली जात आहे. स्थानिक स्तरावर भाजप व आमदार महेंद्र थोरवे यांच्यात फारसे विश्वासाचे वातावरण नाही. याचा फटका विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना बसण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारांशी गाठीभेटी वाढवल्या आहेत.
सुधाकर घारेंमुळे थोरवेंना राजकीय ब्रेक
कर्जत-खालापूर मतदार संघात आमदार महेंद्र थोरवे यांची ताकद मजबूत होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांनी सुरू केलेला झंझावात व त्यांना मंत्री अदिती तटकरे , खासदार सुनील तटकरे यांचा असलेला पाठिंबा आमदार थोरवे यांच्यासाठी राजकीय ब्रेक ठरणार तर नाही ना, असे चित्र सध्या आहे. कर्जत-खालापूर मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय वारे अतिशय गुंतागुंतीचे बनणार असून तिरंगी किंवा चौरंगी लढत निश्चित होणार, हे स्पष्ट झाले आहे
आघाडीच्या उमेदवारांसाठी लढाई सोपी
मतदार संघात मनसे, शेकाप, आरपीआय, वंचित व आप या राजकीय पक्षांची ताकद ही निर्णायक आहे. इंडिया आघाडीत शेकाप, आप महत्त्वाचे घटक असून माजी आमदार सुरेश लाड यांचे नेतृत्व स्थानिक पातळीवर मान्य असल्याने लाड यांच्यासाठी जमेची बाजू आहे. इंडिया आघाडी मजबुतीने, एकसंघ होत निवडणुकीत उतरल्यास आघाडीच्या उमेदवारासाठी लढाई सोपी जाईल असे चित्र आहे. इंडिया आघाडीकडून माजी आमदार सुरेश लाड की शिवसेना उप जिल्हाप्रमुख नितीन सावंत हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.