रायगड जिल्ह्यात रंगू लागल्या पोपटी पार्ट्या

रायगड जिल्ह्यात पोपटी पार्ट्यांची चवदार रंगत सुरु झाली आहे. वालाच्या शेंगा भामरुडाच्या (भांबुर्डी) पाल्यात मडक्यामध्ये मोकळ्या आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजविल्या जातात.
Popati Party
Popati PartySakal
Updated on

पाली - जिल्ह्यात पोपटी पार्ट्यांची चवदार रंगत सुरु झाली आहे. वालाच्या शेंगा भामरुडाच्या (भांबुर्डी) पाल्यात मडक्यामध्ये मोकळ्या आगीवर विशिष्ट पद्धतीने शिजविल्या जातात. त्यामध्ये कांदा व बटाटा तसेच अंडी, चिकन घालून त्यांची लज्जत वाढविली जाते. यालाच पोपटी असे म्हणतात. सध्या जिल्ह्यात पोपटी पार्ट्यांची धम्माल सुरु झाली आहे. जिल्ह्यातील रुचकर स्थानिक गावठी वालाच्या शेंगा तयार होण्यास उशीर लागणार आहे. त्यामुळे खवय्यांना पुण्यावरुन आलेल्या वालाच्या शेंगांवरच समाधान मानावे लागत आहे. मागील वर्षी 40 रुपये किलोने मिळणाऱ्या पुणेरी वालाच्या शेंगा यंदा 60 रुपये किलोने मिळत आहेत.

जिल्ह्याच्या मातीत पिकविलेल्या चवदार टपोर्या दाण्याच्या गावठी शेंगांच्या पोपटीलाच अधिक पसंती आहे. मात्र पोपटी हंगाम सरून जाऊ नये म्हणून सध्या येथील स्थानिक गावठी शेंगा अजुन तयार झाल्या नसल्याने पुण्यावरुन आलेल्या शेंगावर खवय्यांना सध्या समाधान मानावे लागत आहे.

विदर्भात, खानदेशात ज्याप्रमाणे ज्वारी किंवा बाजरीच्या कणसांना भाजुन केलेला हुर्डा प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच जिल्ह्यामध्ये गावठी वालाच्या शेंगांची पोपटी प्रसिद्ध आहे. ठिकठिकाणी शेतावर किंवा घराबाहेर मोकळ्या जागेत पोपटी पार्ट्यांची धम्माल पहायला मिळते. येथे काही ठिकाणी काव्यसंमेलन रंगतात तर गप्पा गोष्टींच्या मैफिलीमध्ये सुखदुःखाची देवाण घेवाणही होते. अनेक जणांना यातून चांगले उत्पन्न मिळते.

चवदार निडीच्या गावठी शेंगा प्रसिद्ध

पोपटीसाठी अस्सल गावठी शेंगांनाच पसंती असते. गावठी शेंगांमुळेच खरी लज्जत व चव टिकून राहते. मुंबई गोवा महामार्गावर नागोठण्याजवळील निडी गावातील शेंगा विशिष्ट गोड चव व टपोरे दाण्यांसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. निडीगावच्या परिसरातील जमिनीचा पोत कसदार असुन परंपरागत पद्धतीने जपवूणक करुन ठेवलेले बियाण्याचाच वापर येथे केला जातो. हे बियाणे दुसरे कुठे नेऊन पिकविल्यास अशी दर्जेदार शेंग होत नाही. या वालाला विशिष्ठ गोड चव, शेंगेचा आणि दाण्याचा आकारही मोठा. सुरुवातीस बांधावर आलेल्या शेंगाची चव तर अधिकच रुचकर. या शेंगांचा वाल संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मात्र यंदा अवकाळी पाऊस वातावरणातील बदल यामुळे अजूनही या शेंगा तयार होण्यास उशीर होईल.

Popati Party
अष्टविनायक तिर्थक्षेत्रांना देणार उत्तम सोयीसुविधा; डॉ. निलम गोऱ्हे

शेतकर्यांच्या हाती चार पैसे

खास करुन पोपटी करण्यासाठी गावठी वालाच्या शेंगाना मागणी असते. जिल्ह्यात रब्बी हंगामात साधारण साडे पंधरा हजार हेक्टरवर कडधान्याचे पिक घेतले जाते. त्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास 4 हजार 381 हेक्टरवर वालाची लागवड केली जाते. वालाला सुरुवातीस दर चांगला मिळतो. किलोला 100 ते 120 रुपये. नंतर शेंगा सर्वत्र येवू लागल्यावर शेवटी दर 40 ते 50 रुपये किलो पर्यंत जातो. लागवड व मशागत करण्यासाठी मेहनत लागते. वातावरणाने साथ दिल्यास चांगले उत्पन्न मिळते. शेंगा सुकवुन त्यापासून मिळालेल्या वालाची विक्री देखिल केली जाते. मात्र यंदा अवकाळी पावसामुळे वालाचे उत्पादन मिळण्यास उशीर लागणार आहे. असे निलेश शिर्के या शेतकऱ्याने सांगितले.

पोपटीसाठी साहित्य

गावठी वालाच्या किंवा पुण्याच्या भरलेल्या टपोर्या शेंगा, कांदा, बटाटा मांसाहारी खाणारे असल्यास अंडी किंवा मसाला लावलेले चिकन, ओवा, जाडे मिठ व भामरुडीचा (भांबुर्डी) पाला आणि हे सर्व जिन्नस शिजविण्यासाठी मातीचे मोठे मडके व जळणासाठी लाकूड, पेंढा आणि गोणपाट इत्यादी.

भांबुर्डीच्या पाल्याचे विशेष

भांबुर्डीच्या पाल्याचे विषेश आहे. याला गोरखमुंडी, वसई – विरारमध्ये बोडथोला, काही ठिकाणी कोंबडा तर रायगड मध्ये भांबुर्डी किंवा भामरुड असे म्हणतात. पावसाळ्यानंतर हा पाला रस्त्याच्या कडेला माळराणात सर्वत्र उगवतो. या पाल्यात औषधी गुणधर्म असतात. जखम झाल्यास पालाच्याच रस जखमेवर चोळतात. पोपटीमध्ये हा पाला टाकल्याने पाणी नसतांना देखिल याच्या वाफेवर शेंगा चांगल्या शिजतात. तसेच वालच्या शेंगा पोटाला बाधत नाहीत आणि लज्जतदार चव देखिल येते हे याचे विशेष आहे. मात्र अवकाळी पावसामुळे या पाल्याचे देखील नुकसान झाले आहे.

पोपटी बनविण्याची विशिष्ठ पद्धत

पोपटी बनविण्यापुर्वी सर्व साहित्य जमवून ठेवणे आवश्यक. सर्व प्रथम मोठ्या मडक्यामध्ये तळाला भामरुडचा पाल्याचा थर लावावा. भामरुडचा पाला सगळीकडे मोठ्या प्रमाणात उगविलेला आहे. मग त्यावर टपोर्या वालाच्या शेंगाचा एक थर लावावा. त्यावर बटाटा व कांदे ठेवावेत, चिकन मांसाहारी असल्यास चिकन व अंडी ठेवावे. यावर जाडे मिठ व ओवा गरजेप्रमाणे पसरवावा. पुन्हा अशाच प्रकारे वालाच्या शेंगाचा टाकुन इतर साहित्याचा थर लावावा. मडके भरल्यानंतर त्याला निट हालवावे जेणे करुन अातील सर्व जिन्नस घट्ट बसेल. त्यानंतर मडक्याचे तोंड भामरुडीच्या पाल्याने घट्ट बंद करावे. तीन विटांवर अथवा दगडावर मडके पालथे/उपडे करुन ठेवावे. बाजुने पेंढा व लाकुड पेटवावेत. चांगली धग लागण्यासाठी मडक्यावर गोणपाट टाकावेत.

Popati Party
रत्नागिरी : परदेशातून आलेले ७२ जण गेले कोठे?

मडक्याला सर्व बाजुने निट उष्मा मिळाल्यास साधारण अर्धा ते पाऊण तासामध्ये आतील सामर्गी निट शिजते. पोपटी निट शिजली आहे कि नाही हे पाहण्यासाठी मडक्यावर बारीक दडट मारतात. त्यावेळी विशिष्ट आवाज आल्यास पोपटी शिजली असे समजले जाते. तसेच काही जण पाण्याचे दोन तीन थेंब मडक्यावर टाकतात ते थेंब लगेच गायब झाल्यास पोपटी शिजली असे समजावे. मग मडके हळूच गोणपाटाने उचलून एका चादरीवर अथवा गोणपाटावर उपडे करावे आणि आतील सामर्गी त्यावर काढूण ताबडतोब ते गुंडाळवावे याला दडपवणे असे म्हणतात. ज्यामुळे वाफ लगेच निघून जात नाही शेंगा करपत नाहीत आणि चव तशीच राहते. आता गरमागरम लज्जतदर शेंगा, कांदा, बटाटा, अंडी आणि चिकनची मजा लुटण्यासाठी तुटून पडा.

मडके नाही मग पत्र्याच्या डब्यातही करा पोपटी

पोपटीसाठी मडक्यांना देखिल खुप मागणी असते. मडके उपलब्ध नसल्यास त्याऐवजी तेलाच्या पत्र्याच्या डब्यामध्येही पोपटी केली जाते. यासाठी पत्र्याच्या डब्याचे तोंड तीन बाजुने कापलेले असते. अगदी मडक्यात लावतात त्याप्रमाणे कृती करुन पत्र्याचे झाकन घट्ट लावावे व आगीवर उपडे ठेवावे. काही वेळेला मडके फुटते किंवा त्याला तडा जातो आणि आतील साहित्य करपते किंवा अर्धवट शिजते. मात्र पत्याच्या डब्यामध्ये हि भिती नसते. आणि तो वारंवार वापरता देखिल येतो.

दरवर्षी या हंगामात पोपटी पार्ट्यांचे आयोजन करतो. येथील स्थानीक वालाच्या शेंगा पोपटीमध्ये वापरल्या जातात. मात्र यंदा अवकाळी पावसामुळे स्थानिक गावठी शेंगा येण्यास उशीर होईल. त्यामुळे नाईलाजाने पुण्याच्या वालांवर पोपटी करावी लागत आहे. गावठी स्थानिक वाल आल्यावर त्यांचा वापर केला जाईल.

- तुषार केळकर, पोपटी पार्टी आयोजक व शेतकरी

सध्या पुण्यावरून आणलेल्या वालाच्या शेंगा पोपटीसाठी नेल्या जात आहेत. यंदा या शेंगांची किंमत वाढली आहे.

- राजेश फोंडे, भाजी विक्रेते, पाली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.