सावंतवाडी : गोव्यात हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश येथील पोलिसांनी नुकताच केला आहे. यासाठी अमली पदार्थ आले कोठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या कोरोनामुळे गोव्याच्या सीमा सील आहेत. त्यामुळे हे अमली पदार्थ गोव्यालगतच्या सिंधुदुर्गात तर साठवले नव्हते ना, या शक्यतेने गोवा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोव्याच्या अमली पदार्थ तस्करीत सिंधुदुर्गाचा ‘सेफ झोन’ म्हणून वापर होत असल्याची शक्यता पुढे आली आहे.
सध्या गोव्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे राज्याच्या सीमा गेले चार ते पाच महिने बंद आहेत. असे असूनही काही दिवसांपूर्वी बार्देस तालुक्यातील हणजूण येथे एका बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी छापा टाकला असता तेथे तीन विदेशी व्यक्तींसह काही जण रंगेहात पकडले गेले. यात बॉलिवूडमध्ये काम करणारा कपिल झवेरी हाही सापडला. गोव्यात त्यावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कारण झवेरी याच्यासोबतचे काही नेत्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत; मात्र गोव्यातील तपास यंत्रणांच्या दृष्टीने या रेव्ह पार्टीसाठी अमली पदार्थ कोठून आले, हा प्रश्न आहे. त्यांच्या तपासाची दिशा सिंधुदुर्गाकडेही बोट दाखवत आहे.
पूर्वी गोवा हे अमली पदार्थांचे विक्री केंद्र मानले जायचे. हिमाचल, मुंबई, कर्नाटक आदी भागातून गोव्यात विक्रीसाठी अमली पदार्थ यायचे; मात्र गेल्या काही वर्षांत हे मार्केट पूर्ण बदलले. गोव्यात या काळ्याबाजाराचे ट्रेडिंग सेंटर बनले. येथून अमली पदार्थ सप्लाय सुरू झाला. यात काही विदेशी नागरिकही गुंतल्याचा तेथील यंत्रणांना संशय आहे. असे असले तरी गोव्यात अमली पदार्थ तयार होत नाहीत. ते बाहेरूनच येतात. चार ते पाच महिने लॉकडाउन असूनही हे पदार्थ आले कोठून, असा संशय निर्माण झाला आहे. या अमली पदार्थांचा साठा केला गेला असावा, असा संशय तपास यंत्रणेला आहे. याच मुद्द्यावर तपासाची सुई लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वळली आहे.
गोवा स्वतंत्र राज्य असल्यामुळे तेथे पोलिसांपासून सीबीआयपर्यंत अनेक तपासयंत्रणांचे नेटवर्क आहे. या यंत्रणांना अमली पदार्थांच्या बऱ्याच खाणाखुणा माहीत आहेत. शिवाय गोव्याची भौगोलिक व्याप्ती लहान आहे. यामुळे अमली पदार्थांचा साठा करणे जोखमीचे ठरते. या तुलनेत लगतच्या सिंधुदुर्गात पोलिस यंत्रणा सोडली तर दुसरे सक्रिय नेटवर्क नाही. पोलिसांनाही अमली पदार्थविषयक तपासाला मर्यादा आहेत. शिवाय सिंधुदुर्गात दुर्गम भाग बऱ्यापैकी आहे. त्यामुळे या पदार्थांचा साठा करणे सोपे होते.
सिंधुदुर्ग भौगोलिकदृष्ट्या जिल्हा गोव्याला खूपच जवळ आहे. यामुळे वाहतूकही फार जोखमीची नसते. याचा विचार करता सिंधुदुर्गात अशा पदार्थांचा साठा होत असल्याचा संशय बळावला आहे. शिवाय याआधी गोव्यात अमली पदार्थांच्या गुन्ह्यात सिंधुदुर्गातील काहींना पकडल्याचाही इतिहास आहे.
या सगळ्याचा विचार करून सिंधुदुर्ग अमली पदार्थ साठवणुकीसाठी सेफ झोन म्हणून वापरला जातो आहे का, याचा तपास गोवा पोलिसांनी सुरू केला आहे. या दोन भागांना जोडणाऱ्या चोरवाटा कोणत्या आणि त्याच्याशी या प्रकरणाची काय लिंक आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती गोव्यातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.
सिलसिला थांबेना
लॉकडाउन काळातही गोव्यातून दारूची अवैध वाहतूक सिंधुदुर्गमार्गे महाराष्ट्रभर सुरू आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी असे प्रकार उघडही केले; मात्र हा सिलसिला थांबलेला नाही. वास्तविक दारू वाहतूक करणे कठीण असते. या तुलनेत अमली पदार्थ कमी जागेत मावतात. त्यामुळे सिंधुदुर्गात याची साठवणूक केली जात असल्याच्या गोवा पोलिसांच्या शक्यतेला काही प्रमाणात बळकटीही मिळत आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.