कोकण : उद्धटपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारला जाब; भाजपचे महावितरणसमोर ठिय्या आंदोलन

protest of BJP against MSEDCL officers for behaviour with people in vaibhavwadi sidhu
protest of BJP against MSEDCL officers for behaviour with people in vaibhavwadi sidhu
Updated on

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : जीर्ण झालेले विद्युत खांब, वीज वाहिन्या व ट्रान्स्फॉर्मर बदलणे, सार्वजनिक स्थळी भूमिगत वीजवाहिन्या टाकणे, शेती पंपाच्या प्रलंबित जोडण्या तातडीने पूर्ण करण्याच्या मागण्यांसाठी भाजपने महावितरणसमोर ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी उद्धटपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांनी चांगलेच फैलावर घेत जाब विचारला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर भाजपने आंदोलन स्थगित केले.

भाजपने येथील महावितरण कार्यालयासमोर मनमानी कारभाराच्या निषेधार्थ आंदोलन छेडले. तालुकाध्यक्ष नासीर काझी, जयेंद्र रावराणे, राजेंद्र राणे सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, स्वप्नील खानविलकर, हर्षदा हरयाण, किशोर दळवी, शेरपुद्दीन बोबडे, प्राची तावडे, संतोष माईणकर, पुंडलिक साळुंखे, राजू पवार उपस्थित होते.
तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या पंपांना १० - १२ वर्षे रितसर वीज जोडणी मिळत नाही; मात्र पैसे दिले की तात्काळ वीज जोडणी दिली जाते. करुळमध्ये घराशेजारील गंजलेला खांब बदलण्यासाठी गरीब कुटुंबाकडून ८ हजार रुपये घेतल्याचे स्पष्ट करीत महावितरणमध्ये तीन लबाडांची टोळी कार्यरत असल्याचा गंभीर आरोप पदाधिकाऱ्यांनी केला.

जीर्ण खांब बदलण्यासाठी दुर्घटनेची वाट बघताय का ? असा संतप्त सवाल भाजप पदाधिकाऱ्यांनी केला. त्यानंतर उपकार्यकारी अभियंता कृष्णांत सुर्यवंशी यांनी थकित वीज देयक विनंती अर्जानुसार दोन महिन्यात भरुन घेण्यात येईल. जागेची अडचण नसलेल्या शेतकऱ्यांच्या पंपांना डिसेंबर २०२१ पर्यंत वीज जोडण्या दिल्या जातील. गंजलेले विद्युत खांब तातडीने बदलले जातील. त्याचप्रमाणे भुईबावडा विभागाचे सहाय्यक अभियंता अमोल थोरबोले आणि वैभववाडी विभागाचे सहाय्यक अभियंता गौस मुल्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा प्रस्ताव पाठविण्याचे लेखी आश्‍वासन भाजप पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर भाजपने ठिय्या आंदोलन स्थगित केले.

अधिकाऱ्याने मागितली माफी

भुईबावडा विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या उद्धट वर्तनाची ऑडिओ क्‍लीप आंदोलनात ऐकवली. त्यामध्ये त्या अधिकाऱ्याने पंतप्रधानांबद्दल अश्‍लाध्य शब्द उचारल्याचे उघड झाले. त्यामुळे भाजप पदाधिकारी संतापले. त्यांनी त्या अधिकाऱ्याला आंदोलनस्थळी माफी मागायला सांगितली. त्यानुसार क्‍लीपमधील आवाज आपलाच असल्याचे मान्य करुन त्या अधिकाऱ्यांने सर्वांसमक्ष माफी मागितली.

अधिकाऱ्याने दंडासह दिले १६ हजार रुपये

करुळ येथील एका कुटुंबातील वडील आणि मुलगा असे दोघेजण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले. त्या कुटुंबाकडून वैभववाडी विभागातील एका अधिकाऱ्याने गंजलेला विद्युत खांब बदलण्यासाठी ८ हजार रुपये घेतले होते. हे त्या अधिकाऱ्याने आंदोलनस्थळी कबूलही केले. त्यामुळे त्याच्याकडून दंडासह १६ हजार रुपये वसूल करीत कारवाईची मागणी भाजपने केली.

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.