चिपळूण : चिपळुणात आलेल्या महापुराचे खापर कोयना अवजलावर फोडले जात आहे. मुंबई उच्च न्यायालयापर्यंत हा वाद गेला आहे. महापूर आला तेव्हा अलोरे पावर हाऊसच्या परिसरात दरड कोसळल्याने कोयना प्रकल्पातील वीजनिर्मिती ८० टक्के बंद केली. त्यामुळे वीजनिर्मितीनंतर २० टक्के अवजल वाशिष्ठी नदीत सोडले जात होते, तरीही चिपळूणच्या महापुराला कोयना अवजल जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. तांत्रिकदृष्ट्या हे आरोप न्यायालयात सिद्ध करण्याचे आव्हान आरोप करणाऱ्यांसमोर आहे.
कोयना धरणातून येणारे पाणी पोफळी येथील टप्पा १ आणि २ मध्ये वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. नंतर हे पाणी अलोरे येथील टप्पा चारच्या दिशेने सोडले जाते. चौथ्या टप्प्यात वीजनिर्मिती झाल्यानंतर हे पाणी कोळकेवाडी धरणात येते. धरणाच्या पायथ्याशी तिसऱ्या टप्पा आहे. तेथे वीजनिर्मिती झाल्यानंतर कालव्याद्वारे हे अवजल चिपळूणच्या दिशेने सोडले जाते. याशिवाय छुप्या पद्धतीने चिपळूणच्या दिशेने पाणी सोडण्याचा मार्ग नाही. चिपळूण तालुक्यात २१ आणि २२ जुलैला मुसळधार पाऊस झाला.
तेव्हा अलोरे पावर हाऊसच्या परिसरात मोठी दरड कोसळली. त्यामुळे चौथ्या टप्प्याकडे जाणारे पाणी तत्काळ थांबवण्यात आले. कोयनेच्या चार टप्प्यातून १९२० मेगावॉट वीजनिर्मिती होते, मात्र दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर मागणीनुसार ३५० ते ४०० मेगावॉट वीजनिर्मिती केली जात होती. त्यामुळे केवळ २० टक्के अवजल वाशिष्ठी नदीत सोडले जात होते. महापुराच्या दरम्यान कोयना प्रकल्पातून किती वीजनिर्मिती झाली, याचा आलेख महाजनकोच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
त्यात बदल करता येत नाही. कोळकेवाडी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता एक टीएमसी आहे. या धरणाच्या सांडव्यावरून पाणी सोडण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक असते. परवानगी न घेताच पाणी सोडल्याचे स्पष्ट झाले तर अधिकारी निलंबित होऊ शकतात. वीजनिर्मितीत मर्यादा आल्यावर धरणात पाण्याचा फुगवटा तयार झाल्याने २३ जुलैपासून कोयना धरणातील पाणी कोयना नदीत सोडण्यास सुरवात झाली. चिपळूण शहर परिसरात २१ जुलैला ९७ मिमी आणि २२ जुलैला २०२ मिमी पाऊस झाल्याचे सांगतात. त्याच दिवशी सह्याद्रीच्या खोऱ्यात म्हणजे दसपटी आणि पोफळी परिसरात ४०० ते ६०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. कमी कालावधीत जास्त झालेल्या पावसाचे पाणी चिपळूण शहरात आले पाण्याचा निचरा न होणे आणि पाणी भरण्यामागे इतरही अनेक कारणे आहेत.
कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर दररोज वाशिष्ठी नदीला पाणी सोडले जाते. महापुराच्या काळात कोयना धरणातील अतिरिक्त पाणी वाशिष्ठी नदीत सोडले गेले नाही. वीजनिर्मितीनंतर सोडले जाणारे पाणी वगळता पाणी सोडण्यासाठी इतर मार्ग नाही. कोयनेच्या पाण्यामुळे शहरात पाणी भरले असेल तर चिपळूण शहरात दररोज पाणी भरायला हवे होते. ढगफुटीमुळे ग्रामीण भागातील नद्याही तुडुंब भरून वाहत होत्या त्याकडे दुलर्क्ष करून चालणार नाही.
- एस. टी. चोपडो, मुख्य अभियंता महाजनको, पोफळी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.