Raigad News : रब्बीसाठी पाण्याची प्रतीक्षा, डोलवहाळ कालव्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष ; प्रशासन ढिम्म

काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ बंधाऱ्याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला दरवर्षी १५ डिसेंबर दरम्यान सोडले जाते
rabi crop farmer need water Dolavaha lake administration neglect agriculture mangaon
rabi crop farmer need water Dolavaha lake administration neglect agriculture mangaonSakal
Updated on

माणगाव : काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ बंधाऱ्याचे पाणी डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला दरवर्षी १५ डिसेंबर दरम्यान सोडले जाते; मात्र अर्धा डिसेंबर महिना संपला तरी या कालव्यांच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाकडून अद्यापही सुरू आहेत. त्‍यामुळे नदी-नाले कोरडे होत असल्याने रब्बी हंगामातील पीक घेणारे शेतकरी चिंतेत आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील भात पीक घेण्यासाठी मशागतीची कामे हाती घेतली आहेत. पाटबंधारे विभागाची कालवा सफाई व दुरुस्तीच्या कामे अद्यापही सुरू असल्याने पाण्यासाठी शेतकरी अस्वस्थ झाला आहे.

माणगाव तालुक्यातील अनेक शेतकरी रब्बी हंगामात भात पीक मोठ्या प्रमाणात घेतात; तर उर्वरित शेतकरी कडधान्यांची पिके घेतात. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही १५ डिसेंबरपासून कालव्याच्‍या पाण्याकडे शेतकरी लक्ष देऊन आहेत.

यांत्रिक विभागाकडून मशिनरी उपलब्ध झाल्यानंतर कालव्याच्या सफाईचे काम जलदगतीने सुरू केले जाईल, अशी माहिती माणगाव पाटबंधारे उपविभागाचे अधिकारी श्रीकांत महामुनी यांनी दिली होती. मात्र अद्यापही पाणी येत नसल्‍याने शेतकऱ्यांचे कालव्याकडे लक्ष लागले आहे.

२०१८ मध्ये चार हजार ९५३ हेक्टर सिंचनापैकी भातशेती, फळबाग व कलिंगडे, भाजीपाला यासाठी १,२४८ हेक्टरवर सिंचन झाले होते. यंदाच्‍या वर्षी माणगावमध्ये ७९.३२ हेक्टर जमिनीवर; तर मोर्बा येथे ६१.२३ हेक्टर जमिनीवर सिंचन करण्यात आले होते.

रोहे तालुक्यातील कुंडलिका नदीवर काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ येथे बंधारा बांधण्यात आला आहे. १९७४ मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. १९७६ पासून प्रत्यक्ष सिंचन सुरू झाले. त्यानुसार बंधाऱ्यातील पाण्याची विभागणी करण्यात आली.

औद्योगिक वापरासाठी ४७ दशलक्ष घनमीटर, पिण्यासाठी ७, सिंचनासाठी १५६ दशलक्ष घनमीटर इतकी तरतूद करण्यात आली आहे. भिरा येथील टाटा जलविद्युत केंद्रातून वीजनिर्मितीनंतर वर्षाकाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा सिंचनासाठी वापर होतो.

बंधाऱ्यावर डावा आणि उजवा कालवा आहे. माणगाव तालुक्यातील शेतीला डाव्या कालव्यातील पाणी सोडण्यात येते. उजव्या कालव्यातून रोहे तालुक्यातील शेतीला पाणी सोडण्यात येते. हे पाणी दरवर्षी १५ डिसेंबर ते १५ एप्रिल या कालावधीत सोडण्यात येते. मात्र अद्यापही पाणी सोडण्यात आलेले नाही.

रब्बी हंगामातील हे पीक शाश्वत असून शेतकरी मोठ्या प्रमाणात भात पिकाची लागवड करतो. यातून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी घरी धान्य ठेवून उर्वरित धान्य बाजारात विकतो. त्यामुळे त्याचे आर्थिक उत्पन्न वाढते. कालव्याची कामे शासनाने वेळीच हाती घेऊन पाणी सोडल्यास माणगाव तालुक्यातील जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येईल.

- राहुल दसवते, शेतकरी, आडघर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()