Ratnagiri News : मंडणगडची शोकांतिका! पुलाअभावी बोटीने प्रवास; आंबेतपूल चार वर्षांपासून बंद

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा दोन्ही जिल्ह्यांची लाईफलाईन असणारा सावित्री खाडीवरील आंबेतपूल धोकादायक झाल्याने दुरुस्ती, डागडुजी करण्यासाठी मागील चार वर्षांपासून बंद ठेवण्यात आला आहे.
Boat Journey
Boat JourneySakal
Updated on
Summary

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा दोन्ही जिल्ह्यांची लाईफलाईन असणारा सावित्री खाडीवरील आंबेतपूल धोकादायक झाल्याने दुरुस्ती, डागडुजी करण्यासाठी मागील चार वर्षांपासून बंद ठेवण्यात आला आहे.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा दोन्ही जिल्ह्यांची लाईफलाईन असणारा सावित्री खाडीवरील आंबेतपूल धोकादायक झाल्याने दुरुस्ती, डागडुजी करण्यासाठी मागील चार वर्षांपासून बंद ठेवण्यात आला आहे. दुरुस्ती त्यानंतर वाहतूक सुरू, पुन्हा पूल बंद अशा घटना वारंवार घडत राहिल्याने आणि त्याची परिपूर्ण माहिती देण्यात न आल्याने नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होत असून शासन, प्रशासनाबाबत नाराजी आहे. पुलाच्या बंद अवस्थेमुळे फार मोठा परिणाम मंडणगड, दापोली तालुक्याच्या अर्थकारणावर झाला आहे. कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. या पुलाची वाढत गेलेली दुरुस्ती नेमकी कोणामुळे? का? आणि याला जबाबदार कोण? याचा विविध अंगांनी घेतलेला वेध.

माहे जुलै २०१६ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील सावित्री नदीवरील महाड येथील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडलेली होती. त्या अनुषंगाने २०१७ मध्ये लडगे प्रोजेक्ट अँड टेक्नोलॉजिस्ट प्रा. लि. कोल्हापूर यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केले. पुलावरील अवजड वाहतूक बंद करून २० किमी प्रतितास वेगाने हलकी वाहतूक चालू ठेवण्यास हरकत नसल्याचे नमूद करण्यात आले. तसेच या पुलाच्या बाजूस नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव करण्यात यावा, असा शेरा देण्यात आला.

पूल दुरुस्ती अंदाजपत्रक

यानंतर स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मार्च २०१८च्या अर्थसंकल्पात ५ कोटी रुपयांचे काम मंजूर केले. या पुलाच्या दुरुस्तीबाबत तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १ सप्टेंबर २०१८ ला बैठक झाली. या वेळी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार अनंत गीते, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. चर्चेत पुलाच्या दुरुस्तीसाठी १० ते १५ कोटींचा निधी आवश्यक असल्याचे सांगून प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याला ५०५४ (०३) अंतर्गत ५०० लक्ष, ३०५४(रस्ते दुरुस्ती व परीरक्षण अंतर्गत) ६६५ लक्ष एवढ्या रक्कमेची तांत्रिक मंजुरी देऊन निविदा केली.

Aambet Bridge
Aambet BridgeSakal

१२.९७ प्रतिशत कमी दराने ८ कोटी २४ लाख ३४ हजार ५७५ रक्कमेची निविदा मंजूर करण्यात आली. २० जून २०१९ ला काम सुरू करण्यात येऊन त्याला १२ महिने मुदत देण्यात आली. ३० एप्रिल २०२२ पहिली मुदतवाढ घेऊन काम पूर्ण करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. त्यानंतर दरम्यान रो रो सेवा सुरू करण्यासाठी जेटीच्या बांधकामावर ८० लाख करण्यात आला तसेच काम करताना कराव्या लागलेल्या जादा परिणामांचा व अतिरिक्त बाबींचा खर्च यामध्ये शियर कनेक्टर, पाण्याखालील पायाचा क्रॅक भरणे, नोझल लावणे, इपोक्सी ग्राऊंट करणे, मायक्रो काँक्रिट पोकळ्या भरणे असा ४ कोटी ११ लाखांचा खर्च झाला. पुलाच्या दुरुस्तीसाठी मूळ व वाढीव मंजूर रक्कम असा एकूण १२.४५ कोटी निधी खर्च करण्यात आला.

पुलाच्या कामामध्ये त्रुटी

पुलाच्या पायाच्या विहिरीसाठी पाण्याखालील निरीक्षण चाचणी २९ व ३० ऑक्टोबर २०१९ ला केली. त्या वेळी निरीक्षणामध्ये पायाच्या विहिरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे अथवा भेगा पडल्याचे दिसून आलेले नाही, असे नमूद करण्यात आले; परंतु पायाच्या सर्व विहिरींना काही ठिकाणी पोकळ्या निर्माण झाल्या असून, काँक्रिटमध्ये हनिकोबिंग दिसून येत असल्याचे नमूद करत भविष्यात पायाच्या विहिरींना हानी पोहचू नये म्हणून दुरुस्ती आवश्यक असल्याचे नमूद केले; मात्र सदरची बाब मंजूर अंदाजपत्रकात नसल्याने हे काम जादा बाब म्हणवून घेण्याचे नमूद केले. त्याचवेळी पिअर ३ व ४ चे काँक्रिट काही ठिकाणी फुगलेले असल्याने पिअरचे स्टील आतून गंजल्याचा अनुमान काढण्यात आला. या पुलाची मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कोकण यांनी ३ जानेवारी २०२० ला पाहणी केली व निरीक्षण टिपण्या जोडल्या.

पुलाच्या बेअरिंग बदलण्यासाठी व पेडस्टील दुरुस्तीसाठी पुलाचा स्लॅब गर्डरसहित उचलावा लागणार असल्याने ३ महिन्यांकरिता पुलाची वाहतूक पूर्णतः बंद ठेवावी लागणार होती. या वेळी स्थानिक विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रो रो जलसेवा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली. त्यानुसार १४ जानेवारी २०२० ला मंत्रालय येथे बैठक घेऊन पर्यायी जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व सार्वजनिक बांधकाम विभागास सूचित केले. त्यासाठी ७९.०७ लक्ष इतका खर्च अपेक्षित असल्याने ५ फेब्रुवारी २०२० ला मान्यता घेण्यात आली. २९ फेब्रुवारी २०२० ला ही रक्कम हस्तांतरित करण्यात आली. पुलाच्या बेअरिंग व पिअर कॅप ब्रेकेट दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पुलावरील वाहतूक ३ जून २०२१ पासून पूर्ववत करण्यात आली होती.

पाचवा पिलर झुकला

पूल पूर्ववत सुरू केल्यानंतर पुलाचा पिअर क्र. ५ हा अंशतः प्रवाहाच्या खालील बाजूस झुकल्याचे जानेवारी २०२२ मध्ये लक्षात आले. या पिअरची पाण्याखालील पाहणी ३ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू केली. ही पाहणी थ्रीडी सोनार सर्व्हे व रोबोटमार्फत करण्यात आली. ५ फेब्रुवारी २०२२ ला पायाचे निरीक्षण केले असता पूर्व दिशेला प्रवाहाच्या अपस्ट्रीम बाजूला वेल कॅपच्या १८ मिटरखाली क्रॅक आढळून आलेला आहे. पुलाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी पुलाची वाहतूक पुन्हा पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात येऊन ८ फेब्रुवारी २०२२ पासून तो बंद करण्याची अधिसूचना काढण्यात आली.

पुन्हा दुरुस्तीचे अंदाजपत्रक

पिअर क्र. ५ व इतर अन्य ५ पिअरच्या पायाच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक तयार करून ६ एप्रिल २०२२ ला १००७.२८ लक्ष किमतीची तांत्रिक मान्यता देण्यात आली. या कामाच्या बी १ निविदेस दोनवेळा प्रतिसाद न आल्याने या कामाची सी निविदा काढण्यात आली. त्याला दोन ठेकेदारांनी प्रतिसाद दिला. ६ महिन्यांत पिअर क्र. ५ ची दुरुस्ती करून पुलावरून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

नवीन पुलाचा प्रस्ताव

या ठिकाणी नवीन पुलाचा प्रस्ताव अर्थसंकल्प ऑगस्ट २०१८, ऑक्टोबर २०२० ला केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत मार्च २०२० ला केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत मार्च २०२२ व ऑगस्ट २०२२ मध्ये अर्थसंकल्पात समाविष्ट होण्यासाठी सादर करण्यात आला आहे. त्याची कामाची किंमत १३६ कोटी इतकी नमूद केली असून, जागेचा सर्व्हे करून डीपीआर पूर्ण झाल्यानंतर जागा व मंजुरी घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

पुलाची माहिती

  • पुलाची लांबी : ३७६ मीटर

  • गाळ्यांची संख्या : ७

  • ४८ मीटरचे २, ५६ मीटरचे ५

  • बांधकामाचे वर्ष : १९७८

  • पुलाचे वय : ४४ वर्षे

पुलासाठी आंदोलने

  • राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस

  • स्थानिक नागरिकांचा एल्गार

  • शेतकरी संघर्ष समिती

  • सावित्री नदी खाडीपट्टा रायगड

  • रत्नागिरी विकास संघर्ष समिती

  • मंडणगड शहर व्यापारी संघटना

  • संतोष अबगुल प्रतिष्ठान

स्ट्रक्चरल ऑडिटमधील सूचना

  • पुलाच्या ठिकाणी सरासरी ८ मीटर पाणीपातळी

  • पुलाचे पाण्याखाली निरीक्षण करण्यात आले

  • पुलाच्या नेओप्रिन पॅड बेअरिंग आहेत.

  • स्पन जॉइंट १, २, ३, ४, ६ मध्ये सपोर्टिंग मेंबरला भेगा

  • पुलाच्या मध्यभागी जास्त प्रमाणात कंपने जाणवतात

  • पुलाच्या दोन्ही टोकाकडे कंपने कमी होत जातात.

  • पुलाचे बेअरिंग पूर्णपणे बदलणे आवश्यक

पुलाबाबतची महत्त्वाची निरीक्षणे

  • १८ जुलै २०१८ ला बोटीद्वारे पाहणी

  • पुलाचे पिअर कॅपचे काँक्रिट निखळले

  • स्टील पूर्णपणे गंजल्याचे दिसून आले.

  • त्या भागातील काँक्रिट ताकद अत्यंत कमी

  • कॅप ब्रेकेटचे गणिटिंग मूळ काँक्रिटपासून सुटले

  • नेओप्रिन पॅड बेअरिंगखालील पेडस्टलमध्ये भेगा

  • पूल अत्यंत कमकुवत झाल्याचे निदर्शनात आले.

  • पिलर क्र. ३ मध्ये भेगांची दुरुस्ती आवश्यक

काम प्रगतीपथावर असून, कलंडलेल्या पिअरची पाण्याखाली दुरुस्ती सुरू आहे तसेच अन्य पिअरला पाण्याखाली मजबुतीकरणं करण्यात येणार आहे. परिस्थितीचे अवलोकन करता या पिअरच्या ठिकाणी काम करणे अवघड ठरत आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत काम पूर्ण करण्यात येऊन पूल वाहतुकीस सुरू करण्यात येईल.

- श्री. उलागडे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगाव

पुलाच्या निकृष्ट कामाबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाहणी करण्याची भूमिका मांडली आहे; मात्र अधिकारी याबाबत चालढकल करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष आणि ठेकेदाराने ही जनतेच्या जीवाशी खेळू नये. कोणाचे लागेबांधे आहेत? जनतेने शांत बसू नये. डोळे उघडावेत.

- जमीर माखजनकर, सचिव- रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटी

आंबेत पुलाचे काम सुरू असून, नागरिकांना असुविधा होऊ नये म्हणून रो रो सेवेबाबत लक्ष ठेवून आहोत. खासदार सुनील तटकरे, आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्याशी वेळोवेळी याबाबतच्या समस्या मांडण्यात येत असून, त्यांच्याकडून याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे.

- मुझफ्फर मुकादम, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मंडणगड

मंडणगड आणि दापोलीला मुंबईजवळच्या मार्गाने जोडणारा आंबेतपूल नादुरुस्त होऊन ३ वर्षे होत आली. सर्व प्रवासी जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. व्यापार ठप्प आहे. मुंबई-मंडणगड अंतर आणि वेळ वाढला आहे. मंडणगडला सक्षम राजकीय नेतृत्व नाही आणि अत्यंत कमी असलेली मतदारसंख्या यामुळे राजकीय वजन मिळवू देत नाही. तालुकावासीयांनी पक्षभेद दूर ठेवून फक्त नवीन पूल व्हावा, यासाठी अराजकीय आंदोलन उभे करायला लागेल.

- सचिन शेठ, व्यावसायिक मंडणगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.