पाली - वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावर पाली येथील अंबा नदीच्या जुन्या पुलावरून व दोन्ही बाजूच्या रस्त्यावरून पाणी गेले. गुरुवारी (ता.20) हे पाणी ओसरल्यावर पुलाजवळील रस्त्याच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले.
या रस्त्याचे डांबर उखडून व वाहून गेले आहे. येथील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. हे दृश्य पाहून नागरिकांनी सोशल मीडिया व व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रचंड संताप व्यक्त केला. तसेच उपरोधिक टीका व विनोद देखील शेअर केले.
अंबा नदीवर नवीन पूल बांधून तो दोन महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पुलांची उंची व रुंदी वाढवल्याने यंदा पुलावरून पाणी गेले नाही. मात्र पुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते सखल भागात असल्याने तेथून व जुन्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी गेले.
परिणामी पाण्याच्या प्रचंड प्रवाहापुढे या नुकत्याच झालेल्या रस्त्याचा निभाव लागला नाही. आणि रस्त्यावरील डांबर अगदी सहज लेप निघाल्याप्रणाने अलगत निघाली.
तर काही ठिकाणी वाहून गेली. रस्त्याच्या बाजूला टाकलेली खडी व माती देखील वाहून गेली आहे. नवीन बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे रस्त्याच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
कंत्राटदार व अभियंत्यांवर कारवाई करा
आम आदमी पार्टी सुधागड तर्फे वाकण ते पाली रोडची पाहणी करण्यात आली. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे आपचे म्हणणे आहे. या रस्त्याचे काम होऊन दोन ते तीन महिने झाले असतांना हा रस्ता पावसात टिकू शकला नाही.
त्यामुळे या रस्त्याच्या दर्जाची तपासणी (क्वालिटी इन्वेस्टीगेशन) करण्यात यावी व ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम केले व ज्या इंजीनियरांनी या कामाची पाहणी केली त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी सुधागडचे अध्यक्ष अशोक सोनू रायकर यांनी केली आहे.
अंबा नदीवर नवीन पूल बांधला, त्याच्या शेजारील जुना पूल तोडला नाही आहे. त्यामुळे नदीच्या जोरदार प्रवाहाला जुन्या पुलाचा अडथळा झाला आणि पाण्याची तुंबी मारली व पाणी नवीन पुलाच्या दोन्ही बाजूने मार्ग काढून रस्त्यावरून वाहिले.
परिणामी पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे रस्त्याचे नुकसान झाले. शिवाय रस्त्याचे काम काही प्रमाणात बाकी आहे.
लागलीच रस्त्यावरील बाहेर आलेली डांबर, खडी, माती व राडारोडा हटविण्यात आला आहे. तसेच रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ताबडतोब करण्यास घेतले आहे.
सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.