अलिबाग : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा उकाडा वाढला आहे. सूर्यनारायण आग ओकत असून अंगाची लाहीलाही होत आहे. घामाच्या धारांमुळे नागरिक बेजार झाले आहेत. आणखी आठवडाभर तापमानाचा पारा चढाच राहण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे साथीचे आजारही बळावले आहेत.
सकाळी गारवा आणि दुपारी कडक ऊन तर सायंकाळी ढगाळ वातावरणामुळे प्रचंड उष्मा वाढला आहे. जिल्ह्यातील डोंगराळ भागात काही ठिकाणी धुके पडण्यास सुरुवात झाली आहे. धुक्यामुळे सकाळी गारवा जाणवत असला तरी दुपारीनंतरचा उकाडा असह्य होत आहे.
गेल्या २४ तासांमध्ये तापमान ३४ अंशांच्या पुढे गेले आहे. खोपोली, पाली, माणगाव, पाटणूस या भागात उन्हाचे तीव्र चटके जाणवत आहेत. नोकरदार, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उन्हापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना करूनच बाहेर पडावे लागते. महिला-मुली छत्री-स्कार्फचा आधार घेत आहेत.
समुद्र किनाऱ्यावरील भागात आर्द्रतेचे प्रमाण कमालीचे वाढत आहे. सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस झाला. ३ ऑक्टोबरपासून पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र वातावरणातील उष्मा वाढल्याने घामाच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
आरोग्याच्या तक्रारींत वाढ
दिवसा कडक ऊन आणि रात्री जाणवणाऱ्या गरम वाफा, सकाळी गारवा यामुळे शारीरिक संतुलन बिघडल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रायगड जिल्ह्यात डेंगी, मलेरिया, सर्दी-खोकला, साथीच्या आजारांचे रुग्ण वाढल्याने रुग्णालयातील गर्दीही वाढली आहे.
किनारपट्टीलगतचा पारा तिशीपार
हवामान तज्ज्ञांच्या मते, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरदरम्यान सूर्याच्या दक्षिणेकडे हालचाली झाल्याने मान्सूनचा किंवा उत्तर-मैदानावरील कमी दाबाचा पट्टा कमकुवत होतो. यावेळी जमिनीत मुरलेल्या पाण्याची वाफ होते. सूर्याची उष्णता आणि गरम वाफ अशा दुहेरी उष्णतेचा अनुभव ऑक्टोबर महिन्यात येतो. कोकण किनारपट्टीत दरम्यान पारा तिशीच्या पुढे जातो.
आहार महत्त्वाचा
हलका आणि सहज पचेल, असा आहार घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. मऊसर खिचडी, वरण-भात, पेज, सूप यांसारख्या आहाराचा समावेश असावा.
आजारपणात शारीरिक हालचाली होत नसल्याने अन्न पचत होत नाही. याशिवाय जंकफूड, तळलेले- मसालेदार पदार्थ खाण्याचे टाळावे, असा सल्ला दिला जातो.
शेतीकामांना अडथळा
सध्या शेतीच्या कामांना वेग आला आहे. दुपारी घराबाहेर पडल्यास ऊन लागण्याची भीती असते. त्यामुळे शेतकरी सकाळी आणि सायंकाळी शेतीची कामे करीत आहेत.
तापमान -किमान- कमाल
६ ऑक्टोबर- ३०- ३२
७ ऑक्टोबर- ३०- ३१
८ ऑक्टोबर- ३०- ३२
९ ऑक्टोबर- ३१ -३२
१० ऑक्टोंबर- २८- ३४
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.