सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याला रविवारी पुन्हा मुसळधार पावसाचा तडाखा बसला. दिवसभर वादळी वाऱ्याच्या पावसाने अनेक ठिकाणी पडझडी झाल्या. अनेक पुलांवर पाणी आल्याने वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होती. तेरेखोल नदीचे पाणी पुन्हा बांदा बाजारपेठेत घुसले तर आंबेगाव येथे घराचे छप्पर कोसळून दोन सख्ख्या लहान बहिणी जखमी झाल्या.
आंबेगाव रूपवाडी येथील अजित दळवी यांच्या घराचे छप्पर कोसळले. यात त्यांच्या दोन मुलींना दुखापत झाली. जखमी आकांक्षा (वय 12) व अनुष्का (5) यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. छप्पर कोसळल्याने संसारोपयोगी वस्तूचे संपूर्ण नुकसान झाले आहे. पावसाळ्यातच छप्पर कोसळल्याने त्यांच्यावर मोठे संकट उभे राहिले आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
गेले काही दिवस ब्रेक घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरला. रविवारी संततधार कायम होती. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. येत्या दोन दिवसांत आणखी पावसाची रिपरिप सुरू राहिल्यास अनेक घरांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. पावसाने पुन्हा उग्ररूप धारण करीत धुवॉंधार कोसळणे सुरूच ठेवले आहे. काल मध्यरात्रीपासून अविरतपणे सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली. तेरेखोल नदी बांदा आळवाडी येथील बाजारपेठेत घुसली. यामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. बांदावासीयांनी पुन्हा एकदा धसका घेतला. चतुर्थीच्या तोंडावर पाणी आल्याने व्यापारी वर्गात मोठी भीती निर्माण झाली आहे.
सावंतवाडी तालुक्यातही वादळी पाऊस झाला. संततधार पावसामुळे मालवण तालुक्यात पेंडूर परिसरात पूर परिस्थिती असून कट्टा पेंडूरमार्गे कुडाळ रस्त्यावर पेंडूर नाक्याजवळ ओढ्यावरील पुलावर आज पाणी आले. त्यामुळे सकाळी काही काळ वाहतूक ठप्प होती. माणगाव खोऱ्यातील आंबेरी फुलावरही पुन्हा एकदा पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे माणगाव खोऱ्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला.
कणकवली, वैभववाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले व देवगड तालुक्यालाही मुसळधार पावसाचा फटका बसला. काही ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. पावसाचा मुख्य बाजारपेठांमध्ये परिणाम दिसून आला.
दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक पाऊस
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 157 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. जिल्ह्याची सरासरी 99 असून आतापर्यंत एकूण सरासरी 3418.68 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुकानिहाय व कंसात आजअखेरचा पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः दोडामार्ग 157 (3616), सावंतवाडी 120 (3726), वेंगुर्ले 91.6 (3273.9), कुडाळ 102 (3293.55), मालवण 125 (4261), कणकवली 82 (3078), देवगड 76 (2957), वैभववाडी 126 (3144).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.