रत्नागिरी: आर्थिक वर्ष संपल्यामुळे घरपट्टी थकवणाऱ्यांना पालिकेच्या वसुली विभागाने चांगलाच दणका दिला. वारंवार नोटिसा बजावूनही घरपट्टी थकवणाऱ्या शहरातील १८२ मालमत्ता पालिकेने सील केल्या आहेत. त्यामध्ये मोबाईल टॉवर, पालिकेचे भाडेतत्त्वावर घेतलेले गाळे, इमले आणि नॉन बॅंकिंग कंपन्यांना टाळे ठोकले आहे. पालिकेला मार्चअखेरपर्यंत १४ कोटी वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १० कोटी ९० लाख म्हणजे ७८ टक्के वसुली करण्यात पालिकेला यश आले आहे.
पालिकेला दरवर्षी सुमारे २८ हजार इमलेधारकांकडून सुमारे ७ कोटींची घरपट्टी वसुली होते; मात्र कोरोना काळामुळे घरपट्टी थकल्याने ती १४ कोटींवर गेली होती. यापूर्वी पालिकेने अनेक सवलती दिल्या होत्या; मात्र मार्चला आर्थिक वर्ष संपुष्टात आल्याने पालिका प्रशासनाने घरपट्टी थकबाकीदारांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली. मार्च महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत केवळ ५५ टक्के थकबाकी वसूल झाली होती. उर्वरित साडेसहा कोटी थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान पालिकेसमोर होते. थकीत घरपट्टी वसूल करण्यासाठी पालिकेकडून विशेष मोहीम आखण्यात आली. यात थकबाकीदार असलेल्या शासकीय कार्यालयांना रेडकार्ड दिली.
मालमत्ताधारकांना नोटिसा देऊनही त्यांनी घरपट्टी न भरल्याने पालिकेच्या वसुली पथकाने थकबाकीधारकांना झटका दिला. मार्चअखेरीला शहरातील १८२ मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपये येणे बाकी आहे. यामध्ये मोबाईल टॉवर, पालिकेचे भाडेतत्त्वावरील गाळे, खासगी गाळे यांचा समावेश आहे. मार्चअखेरीस १४ कोटींपैकी १० कोटी ९० लाख वसुली पूर्ण झाली आहे. १०० टक्के वसुली होईपर्यंत कारवाई सुरूच ठेवण्यात येणार आहे. मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली पथकाचे अधिकारी नरेश आखाडे, उत्तम पाटील, सागर सुर्वे, अभियंता शिवचर आदींनी ही कारवाई केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.