सह्याद्रीच्या वैविध्यपूर्ण निसर्गसंपदेचा वारसा घाटमाथ्याच्या पायथ्याशी वसलेल्या राजापूर तालुक्यालाही लाभला आहे. पर्वतरांगातील जंगल परिसरामध्ये वास्तव्यास असलेले वन्यप्राणी भक्ष्याच्या वा खाद्याच्या निमित्ताने भटकंती करत लोकवस्तीमध्ये घुसू लागले आहेत. गव्यांचा तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून वावर वाढल्याचे चित्र दिसत आहे. आठ-दहांच्या कळपाने येणाऱ्या या गव्यांकडून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. त्याचवेळी त्यांचा मोर्चा आंबा, काजू बागांकडे वळून त्याचेही नुकसान केले जात आहे. विविध कारणांमुळे भातशेती धोक्यात आलेली आहे. वारंवार बदलणाऱ्या हवामानाचाही आंबा-काजू बागायतींचेही उत्पन्न काहीसे कमी-जास्त होत आहे. यामुळे आधीच चिंतातूर असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये गव्यांच्या नुकसानकारक वावराच्या दहशतीची भर पडली आहे.
- राजेंद्र बाईत, राजापूर
राजापूर तालुक्यात गवे नेमके येतात कुठून याबाबत ठामपणे वनविभागही सांगू शकत नाही. दाट जंगल आणि डोंगर परिसर असलेल्या अणुस्कुरा घाटाच्या पायथ्याशी राजापूर तालुका वसलेला आहे. राजापूर तालुक्यामध्येही मोठ्या प्रमाणात जंगल परिसर आहे. अणुस्कुरा घाटामध्ये वावर असलेले हे गवे त्या परिसरामध्ये फिरत असताना नजीकच्या राजापूरच्या जंगल परिसरामध्ये घाटातून खाली येतात, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. तालुक्याच्या जंगल परिसरामध्ये आलेल्या गव्यांपैकी काही गवे पुन्हा अणुस्कुरा घाटामध्ये परतत असतील तर, काही गवे राजापूरच्या जंगल परिसरामध्ये रूळून याच ठिकाणी वास्तव्याला राहत असल्याचा अंदाजही लोकांकडून वर्तवला जात आहे.
गव्यांमुळे राजापुरातील नुकसानीची नोंद
भालावली, रूंढेतळी, कशेळी, जुवाठी, कोंड्ये, आडवली, सोल्ये, धाऊलवल्ली, भालावली, वाल्ये, जांभवली, शेजवली, तिवरे, मंदरूळ, करक, पांगरी, मूर, वाटूळ, ओझर, तिवरे आदी गावात नुकसानीची नोंद.
गव्यांकडून भातशेती खाऊन फस्त
लहरी पावसासह जमाखर्चाचा न जुळणारा ताळमेळ आदी कारणांमुळे भातशेती आधीच धोक्यात आली आहे. त्यामध्ये गव्यांच्या वावरातून होणाऱ्या नुकसानीची भर पडली आहे. लावणी केलेली भातशेतीची रोपे वा लावणीपूर्वीची भाताची रोपे गव्यांकडून खाऊन फस्त केली जातात. त्यातून काहीवेळा शेतकऱ्यांवर त्या भागामध्ये दुबार भातशेती लावण्याची वेळ येते; मात्र, त्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांकडे लावणीसाठी भाताची रोपे उपलब्ध होत नाहीत. त्यातून, तो भाग मोकळा राहून शेतकऱ्याचे नुकसान होताना दिसते. गव्यांकडून भातशेतीच्या झालेल्या नुकसानीची काही शेतकऱ्यांनी वनविभागाकडे नोंद केल्याचे दिसते. मात्र, काही शेतकरी भातशेतीच्या नुकसानीची नोंद करण्यास पुढे आल्याचे दिसत नाही.
धावत्या वाहनांना कळपाचा धोका
अनेकवेळा रात्रीच्यावेळी रस्ता ओलांडणारा गव्यांचा कळप अनेक वाहनचालकांना दिसतो. नागमोड्या वळणांचा रस्ता ओलांडताना गवा रेड्यांचा कळप भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांसमोर अचानक येतो. अचानक घडणाऱ्या या घटनेमध्ये गाडीवर ताबा मिळवताना वाहनचालकाच्या नाकी दम येतो. मात्र, त्या कळपामध्ये समाविष्ट असलेले आठ-दहा गवे एकामागोमाग एक असे ओळीने रस्ता ओलांडतात. अचानक घडणाऱ्या या घटनेमध्ये वाहनांना अपघात होण्याचा धोका असतो तर, काहीवेळा धिप्पाड देहाच्या गव्याला त्या वाहनाची धडक होऊन अपघात होण्याचा संभव असतो.
नुकसानीला पिकविमा कवचाची अपेक्षा
केंद्र शासनाच्या पिकविमा योजनेमध्ये आंबा, काजूसह भातशेतीचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रतिकूल हवामानामुळे आंबा व काजूच्या होणाऱ्या नुकसानीचा
पिकविमा संरक्षणामध्ये समावेश करण्यात आला आहे. भातशेतीच्या
नुकसानीमध्ये नैसर्गिक आपत्ती, कीडरोग, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे आदी निकषांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, भातशेतीचे वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे गवा आणि अन्य वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीला पिकविम्याचे संरक्षण मिळत नाही. याचा विचार होऊन भविष्यामध्ये भातशेतीला पिकविम्याचे संरक्षण देताना वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीचाही समावेश व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
का वाढला गव्यांचा वावर
अणुस्कुरा घाटामध्ये वावर असलेला गव्यांचा वावर घाटाच्या पायथ्याच्या भागामध्ये नेमका का वाढू लागला आहे याच्या निश्चित कारणाचा उलगडा होताना दिसत नाही. भातशेतीच्या जोडीने नाचणी, वरी, तिळाची शेती आदींची पूर्वीच्या तुलनेमध्ये सद्यःस्थितीमध्ये शेती कमी केली जात आहे. त्यामुळे शेतीकामासह अन्य कामानिमित्ताने जंगल परिसरामध्ये लोकांचा वावर गेल्या काही वर्षामध्ये तुलानात्मकदृष्ट्या कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. लोकांच्या या कमी झालेल्या वावरामुळे लाजाळू स्वभावाचा म्हणून ओळखला जाणारा गवा घाट परिसरातून घाटाच्या पायथ्याशी असलेल्या परिसरामध्ये उतरू लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
कळपांच्या संख्येबाबत अनभिज्ञतता
गेल्या काही वर्षांपासून राजापूर तालुक्यामध्ये गव्यांचा वावर प्रकर्षाने जाणवू लागला आहे. वर्षभराच्या कालावधीमध्ये विविध भागांसह शेतशिवार, आंबा-काजूच्या बागा आणि अन्य परिसरामध्ये दिवसा-रात्री गवे आढळून येतात. मात्र, तालुक्यामध्ये गव्यांचे नेमके किती कळप आहेत वा त्यांची नेमकी संख्या किती आहे याचा वनविभागाकडे निश्चित आकडा उपलब्ध नाही. राजापूर तालुक्यामध्ये सुमारे दहा-पंधरा गवा रेड्यांचे कळप आणि सुमारे शंभरहून अधिक गवे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आंबा, काजू कलमे, बागायतींनाही धोका
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत तालुक्यामघ्ये गेल्या काही वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजूची लागवड झालेली आहे. त्याच्या जोडीला अनेक शेतकर्यांनी नारळ, पोफळी, सुपारीचीही लागवड केलेली आहे. भातशेतीसोबतच गव्यांकडून लागवड केलेली आंबा, काजूची कलमे, नारळ, सुपारीची झाडे यांचेही नुकसान केले जात आहे. यामध्ये आंबा, काजूच्या झाडांची गव्यांकडून मोडतोड केली जात आहे तर काहीवेळा मोठ्या झाडांना गवे आपले शरीर घासतात. त्यामध्ये त्या झाडाच्या साली उकटतात. त्यातून झाड मरण्याची अधिक शक्यता असते. काहीवेळा आंबा, काजूची छोटी कलमे उकटून टाकण्याचा प्रयत्नही गव्यांकडून केला जातो. त्यातून, बागायतदारांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
शेतकर्यांच्या युक्त्या फोल
गव्यांच्या उपद्रवापासून भातशेतीची सुटका करण्यासाठी काही शेतकर्यांकडून शेताच्या भोवती रंगीत साड्यांचे कुंपण करून त्यांच्या वावराला प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र दिसते तर, काही शेतकर्यांनी तडतड असा आवाज येण्यासाठी पत्र्यासारख्या काही वस्तूंचीही बुजगावणी म्हणून मोठ्या खुबीने उपयोग केल्याचे दिसते. मात्र, या सार्या युक्त्यांना गवे धजावताना दिसत नसल्याचा अनुभव शेतकर्यांकडून सांगितला जातो. लाजाळू स्वभावाचा गवा माणसाच्या वावराची चाहूल लागताच पळायला लागतो. मात्र, त्या परिसरातून माणसांचा वावर जसाजसा कमी होत जातो तसा पुन्हा त्यांचा मोर्चा त्या भागाकडे वळत असल्याचेही दिसत आहे. रात्रीच्यावेळी माणसांचा वावर नसल्याने भातशेतीसह बागायतींमध्ये गव्यांचा बिनधास्त वावर असल्याचे दिसते.
अशी मिळते नुकसान भरपाई
प्रतिगुंठा भातपिक -३६२ रु., नाचणी - ३६२ रु., ऊस-५५० रु., फळझाडे प्रतिझाड ः आंबा - ५०० रु., काजू- ५०० रु., नारळ- २ हजार रु., बांबू प्रतिनग ः १० रु.
गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये कोंड्ये-जुवाठी परिसरामध्ये गव्यांचा वावर वाढला आहे. कळपाने येणाऱ्या गव्यांकडून भातशेतीसह आंबा-काजू कलमांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे. गव्यांकडून होत असलेले नुकसान रोखून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना होणे गरजेचे आहे.
- सुनील शिवगण, शेतकरी, कोंड्ये
कळपाने वावरणाऱ्या गव्यांकडून भातशेतीसह आंबा-काजू बागायतींचे नुकसान केले जात आहे. त्यातून शेतकऱ्यांसह बागायतदारांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या नुकसानीची शासनाकडून भरपाई मिळते. मात्र, शेतकऱ्यांसह बागायतदारांच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेमध्ये ही भरपाई तुटपुंजी असते. त्यामुळे नुकसानभरपाईच्या रकमेमध्ये वाढ व्हावी
- प्रसाद मोहरकर, जुवाठी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.