रत्नागिरी : गणपतीपुळे पर्यटनस्थळासाठीचा १०२ कोटींच्या विकास आराखड्यात बदल करण्यात आला. त्याची माहिती ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि देवस्थान समिती यांना दिली नाही वा त्यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही, असा आरोप करत केलेले बदल हे ठेकेदारधार्जिणे असल्याचा संशय आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे. आराखड्यातील बदल अयोग्य वाटल्यास भाजप आंदोलनाचा पवित्रा घेईल, असेही त्यांनी सांगितले.
गणपतीपुळे विकास आराखड्यातील बदलाबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भापज जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन उपस्थित होते. लाड म्हणाले, ‘‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणपतीपुळे विकास आराखड्याला १०२ कोटी दिले. त्यानंतर आलेल्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विकास आराखड्यातील कामांसाठी जादा १० कोटी देण्याची घोषणा केली होती, मात्र तो निधी अजूनही आलेला नाही. जुना आराखडा बनविताना सर्वांची मते घेण्यात आली होती.
जुन्या आराखड्यात बदल केला असून, त्याबाबत ग्रामस्थ, सरपंच, देवस्थान कमिटी अनभिज्ञ आहेत. याबाबत गणपतीपुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांसह माझ्याकडे निवेदन दिले आहे. आराखड्यातील ५७ कोटी रुपये १४ रस्त्यांसाठी आहेत. ते रस्ते कोणते आहेत, याची माहितीच दिली जात नाही. ते रस्ते गणपतीपुळेला जोडणारे नसतील तर त्याचा काहीच उपयोग नाही. येथील पाणी योजना जलजीवन मिशनमधून होणार असून, आराखड्यातील निधीचे पुढे काय करणार, याचीही माहिती देण्यात आलेली नाही.
त्यामुळे ठेकेदार धार्जिणे बदल करण्यात आल्याचा संशय आहे. जुना आराखडा तत्कालीन कॅबिनेटपुढे मंजूर झाला होता. त्यामुळे बदल केलेला आराखडा हा मंजुरीसाठी कॅबिनेटपुढे ठेवला आहे का. या संदर्भात ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गणपतीपुळेतील ग्रामस्थ, देवस्थान समिती आणि ग्रामपंचायत यांची संयुक्त बैठक घेऊन त्याद्वारे माहिती देण्याची विनंती केली आहे.
कोरोना काळात जिल्हा रुग्णालयात अनेक अनियमित खरेदी व्यवहार झाले आहेत. त्याची माहिती मागवण्यात आली आहे. येत्या पंधरा दिवसांत ती माहिती देण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांपुढे झालेल्या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिल्याचे लाड यांनी सांगितले. तसेच माझ्या आमदार फंडातून १४ लाख ५० हजार रुपये खर्च करून रत्नागिरीला दिलेल्या रुग्णवाहिकेला कोल्हापूरला अपघात झाला. तिचा खासगी कामासाठी वापर झाला होता. विमाही न काढल्यामुळे ती भंगारात काढावी लागली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
नावेदप्रकरणी महानिरीक्षकांना भेटणार
नावेद २ या बेपत्ता नौकेच्या प्रकरणासंदर्भात कोकण महानिरीक्षकांची भेट घेणार असल्याचे आमदार लाड यांनी सांगितले. या घटनेच्या चौकशीत ढिसाळपणा होत असून, जिल्ह्यातील सागरी गस्तीवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस अधीक्षकांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.