रत्नागिरी : पाच डझन रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी मुंबईतील एका उद्योजक ग्राहकाने तब्बल १ लाख ८ हजाराला विकत घेतली. राजापूर तालुक्यातील उत्पादक बाबू अवसरे यांची ती पेटी होती. ‘ग्लोबल कोकण’ आणि ‘मायको’ यांनी कोकणातील मुहूर्ताच्या हापूसच्या पेटीचा लिलाव मुंबईत नुकताच केला. त्यावेळी हा दर मिळाला. ग्लोबलचे संचालक संजय यादवराव यांच्यासह आमदार शेखर निकम यांनी यासाठी पुढाकार घेतला. या लिलावात सहभागी अन्य दहा हापूस उत्पादकांच्या पेट्यानाही चांगला दर मिळाला.
विक्रमी दराची पेटी उद्योजक आणि सेंट अग्नेलो व्हीएनसीटी व्हेंचरचे राजेश अथायडे यांनी खरेदी केली. त्या लिलावाची सुरवात १० हजार रुपयांनी झाली. यामध्ये पाच जणांनी बोली लावली. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही २५ हजार रुपये दराने चार पेटी विकत घेतल्या. अथायडेंनी दुसरी पेटी २६ हजार रुपयांनी घेतली. रमेश भाईंनी २५ हजारला, सिंधुदुर्ग फार्मर प्रोड्युसरचे प्रसाद मालपेकर यांनी एक पेटी १५ हजाराला तर बांधकाम व्यवसायिक जगन्नाथ मोरे, आर्किटेक गणेश यादव, नीलेश भोसले यांनी प्रत्येकी १२ हजार रुपयात आंबा पेटी विकत घेतल्या. या लिलावातून तीन लाख दहा हजार रुपये जमा झाले. या लिलावात सहभागी हापूस उत्पादकांस प्रत्येकी ३१ हजार रुपये मिळणार आहेत.
राजश्री यादवराव, सुप्रिया मराठे आणि सुनैना रावराणे या तीन महिला उद्योजकांनी एकत्र येत कोकणातील शंभर शेतकऱ्यांना संघटित केले. रत्नागिरी हापूस आंब्याचा ब्रॅंण्ड बाजारात आणण्यासाठी ‘मायको’ने मॅंगोटेकची निर्मिती केली. याद्वारे हापूस ग्राहकांना थेट घरपोच दिला जाणार आहे. प्रत्येक पेटीवर विशेष क्यूआर कोड टाकला जाणार असून ग्राहकांना या आंब्याची लागवड कोणत्या शेतात आणि कधी केली याची माहिती मिळेल.
परिश्रमाने हापूसची लागवड केली जाते. त्याचा लिलाव होतो, तेव्हा शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. त्यासाठी मायकोमार्फत विजयदुर्ग, राजापूर, देवगड, रत्नागिरीतील सर्वोत्कृष्ट दर्जाचा आंबा जगभरातील ग्राहकांना देण्यात येणार आहे.
- संजय यादवराव, संचालक, ग्लोबल कोकण
संपादन- अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.