राजापूर - तालुक्यातील नाणार येतील प्रस्तावित रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पातील संघर्षामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांकडून मनाई आदेश जारी करण्यात आलेला होता. मात्र, या मनाई आदेशाचे शिवसेनेचे आमदार राजन साळवींसह शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी उल्लंघन केले. याप्रकरणी आमदार श्री. साळवी यांच्यासह शिवसेनेच्या 33 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना आज अटक करून येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आले.
अटक केलेल्यांमध्ये शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, पंचायत समितीचे सभापती सुभाष गुरव, उपसभापती अश्विनी शिवणेकर, नाणार रिफायनरीविरोधी शेतकरी, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलाकर कदम आदींचा समावेश आहे.
तालुक्यातील नाणार परिसरामध्ये रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाची शासनाकडून उभारणी केली जात आहे. त्यासाठी नाणार परिसरारातील चौदा गावांमधील जागा संपादीत करण्याची प्रक्रीया प्रशासनाकडून हाती घेण्यात आली आहे. या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांसह शिवसेना आणि अन्य राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध केला जात आहे.
या प्रकल्पविरोधातून स्थानिक ग्रामस्थांतून वेळोवेळी आंदोलनेही केली आहेत. अशा स्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकांना विश्वासात घेवून प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात येईल असेही स्पष्ट केले आहे. यासाऱ्या घडामोडीमध्ये रिफायनरी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पासंबंधित लोकांचे असलेले गैरसमज दूर करण्यात येतील अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे लोकांच्या विरोधानंतरही प्रकल्प होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
अशातच दिल्ली येथे प्रकल्पातील गुंतवणूकीच्या अनुषंगाने सौदी अरेबिया येथील सौदी आरामको या कंपनीशी सामंजस्य करार झाला. त्यामुळे प्रकल्प होणार असल्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. या साऱ्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी दिल्ली येथे झालेल्या सामंजस्य कराराच्या निषेधार्थ केंद्र शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.
नाणार प्रकल्पाला होत असलेल्या विरोधातून कायदा आणि सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण होवू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी 2 एप्रिल ते 16 एप्रिल या कालावधीसाठी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केलेला होता. आहे. त्याच कालावधीमध्ये शिवसैनिकांनी आमदार साळवी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन झाल्यामुळे राजापूर पोलिसांनी आमदार श्री. साळवी यांच्यासह तब्बल 33 जणांवर गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये वसंत जड्यार, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती अजित नारकर, पंचायत समिती सभापती सुभाष गुरव, शहरप्रमुख संजय पवार, युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी संतोष हातणकर, रिफायनरी विरोधी शेतकरी, मच्छीमार संघटेनेचे अध्यक्ष कमलाकर कदम, जिल्हा परिषद सदस्य सोनम बावकर, पंचायत समिती सदस्य प्रकाश गुरव, अभिजीत तेली, प्रमिला कानडे, विशाखा लाड, प्रशांत गावकर, करूणा कदम, युवा सेनेचे तालुकाधिकारी प्रफुल्ल लांजेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामचंद्र सरवणकर, दिनेश जैतापकर, शरद लिंगायत, राजन कुवळेकर, विश्वनाथ लाड, पंचायत समितीचे माजी उपसभापती उमेश पराडकर, संतोष कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य योगिता साळवी, पूर्णिमा मासये, राजा काजवे, विवेक मांडवकर, आजिम नाईक, मधुकर बाणे, दशरथ दुधवडकर, बाळकृष्ण हळदणकर, समीर चव्हाण आदींचा समावेश आहे. या साऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी, पोलिसांनी अटक केलेली नव्हती. ही कारवाई आज केली. या साऱ्यांना अटक करून येथील न्यायालयामध्ये हजर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.