Ratnagiri : उन्नत'साठी रत्नागिरी जिल्ह्यातून राजापूरची निवड; 22 गावांचा सहभाग, अभियानात IIT मुंबईचं सहाय्य

22 गावांचा सहभाग; आयआयटी मुंबईचे साह्य, लोकांशी संवाद अन् संशोधन
ratnagiri
ratnagirisakal
Updated on

रत्नागिरी - गावपातळीवरील दैनंदिन जीवनावर परिणाम करणार्‍या समस्यांसह विविध सामाजिक व विकासाशी संबंधित प्रश्‍नांची संशोधनाद्वारे उकल करून त्यावर अचूक उपाययोजना शोधण्याच्या उद्देशाने राज्य शासनातर्फे उन्नत महाराष्ट्र अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून राजापूर तालुक्याची निवड झाली आहे.

राज्य शासन आणि आयआयटी मुंबई यांच्यामार्फत राबवण्यात येत असलेल्या या सर्व्हेक्षणामध्ये तालुक्यातील पहिल्या टप्प्यामध्ये दहा गावांमध्ये रस्ते आणि पाणी या मुद्द्यान्वये सर्व्हेक्षण केले जात आहे. या अभियानांतर्गत अभ्यास अन् संशोधनाद्वारे तयार करण्यात येणारा अहवाल वा अभ्यासप्रकल्प विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणी करण्यासाठी वा गावामध्ये एखादा विकास प्रकल्प राबवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

त्याचवेळी लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणार्‍या समस्यांची उकल करून त्या सोडवणे, पायाभूत सुविधांची उभारणी करणे आणि गावच्या भविष्यातील विकासासाठी दिशादर्शक म्हणूनच उपयुक्त ठरणार आहे. स्थानिक पातळीवरील रोजगाराच्या संधी काय असू शकतात याचे काही प्रमाणात मार्गदर्शन या अभ्यासातून होणार आहे.

राजेंद्र बाईत, राजापूर

उन्नत महाराष्ट्र अभियानअंतर्गत राज्य शासन आणि आयआयटी मुंबई यांच्यामार्फत केस स्टडी पद्धतीने हा अभ्यास केला जात आहे. त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांसह महाविद्यालयीन युवकांची मदत घेतली जात आहे. ’आपले प्रश्‍न, आपले विज्ञान’ या उपक्रमांतर्गत हा अभ्यास केला जात असून गावागावातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकांशी थेट संवाद साधून सखोल अन् सविस्तर संशोधन केले जाणार आहे.

ratnagiri
Raigad : वादळामुळे नौका समुद्रकिनारी ; हवामान विभागाचा ४८ तासांचा अलर्ट; गुजरातच्या बोटीही आश्रयाला

भविष्याचा वेध घेऊन अभ्यास अहवाल वा प्रकल्प अहवाल तयार केला जाणार असून, हा अभ्यास प्रकल्प अहवाल शासनासह पंचायत समिती आणि संबंधित ग्रामपंचायतीकडेही राहणार आहे. विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने सर्व्हेक्षण करून प्रकल्प अहवाल तयार केले जाणार आहेत जेणेकरून, काही विषयांची उकल होण्यास आणि त्याद्वारे ती समस्या सोडवून गावविकास साधण्यास मदत होईल.

या विषयांवर केस स्टडी

स्थानिक शेती, उपलब्ध पाणी, ग्रामीण वाहतूक

ग्रामीण शिक्षण, गावपातळीवरील आरोग्य, गावागावातील स्वच्छता, गावातील लघुउद्योग, स्थानिक पर्यावरण, सार्वजनिक व्यवस्था, पायाभूत सुविधा, रोजगार संधी

सरपंच, ग्रामसेवक, प्राध्यापकांची कार्यशाळा

ratnagiri
Ratnagiri Politics : राणेंची 'ती' ऑफर धुडकावत सामंतांनी बदलला Whatsapp DP; मशालीच्या 'डीपी'ने राजकीय तर्कांना उधाण

उन्नत महाराष्ट्र अभियानांतर्गत राजापूर तालुक्यामध्ये प्रत्यक्ष संशोधन वा सर्व्हेक्षण करण्याच्या अनुषंगाने राजापूर येथे गतवर्षी तालुक्यातील सरपंच आणि ग्रामसेवकांची कार्यशाळा पार पडली. यामध्ये या अभियानासह नेमके कशा पद्धतीने आणि कोणत्या मुद्द्यान्वये केस स्टडी होणार आहे, त्याचा भविष्यामध्ये गावविकासासाठी कसा उपयोग होणार आहे याची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यापूर्वी, केस स्टडीसह संशोधनामध्ये सहभागी होण्याच्या उद्देशाने विविध महाविद्यालयांतील प्राध्यापकांची रत्नागिरी येथेही कार्यशाळा पार पडली होती. त्यामध्ये अनेक नामवंत महाविद्यालयातील प्राध्यापक सहभागी झाले होते. त्यांनी या प्रकल्पासंबंधित आणि सर्व्हेक्षणासंबंधित सविस्तर माहिती जाणून घेतली.

ratnagiri
Pune : बेवारस बालक, परमेश्वराचा अवतार- दत्तराज सिन्नरकर यांचे मत

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त

उन्नत महाराष्ट्र अभियानांतर्गत गावोगावच्या संशोधनामध्ये वा केस स्टडीमध्ये सहभागी होणार्‍या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोकांशी संवाद साधून विविध समस्यांची उकल करण्याची अन् अभ्यासण्याची जवळून संधी मिळणार आहे. त्यामुळे केस स्टडीमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. मात्र, पहिल्या टप्प्यातील निवड झालेल्या गावांमध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश झालेला नव्हता. मात्र, पाण्यासंबंधित जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये झालेल्या सर्व्हेक्षणात त्यांचा समावेश करण्यात आला होता.

केस स्टडी होत असलेली गावे

नाटे, दळे, अणसुरे, ताम्हाणे, जुवाठी, कशेळी, भू, झर्ये, आंगले, केळवली

असे झाले रस्ता सुविधेचे सर्व्हेक्षण

निवड केलेल्या गावांमधील रस्ता सुविधेसंबंधित अहवाल तयार करण्यासाठी संबंधित गावामध्ये जाऊन मुख्य रस्ता आणि वाडीवस्त्यांना जोडणारे जोडरस्ते आणि त्यांचा दर्जा याची पाहणी करण्यात आली. संबंधित रस्त्यावर किती वेगाने वाहन पळू शकते, या आधारावर रस्त्यांची पाहणी वा सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यासाठी ए पन्नास कि.मी. पेक्षा जास्त वेग, बी 35 कि.मी. वेग, सी ः वीस ते पस्तीस कि.मी. वेग, डी वीस कि. मी. पेक्षा कमी वेग, ई डांबरीकरण नाही; पण कच्चा रस्ता, एफ रस्ता नाही असे गट करण्यात आले.

ratnagiri
Pune PMPML : ‘क्यूआर कोड’चा १५०० प्रवाशांकडून वापर ;पहिल्या दिवशी घेतला लाभ; पालकमंत्र्यांच्या हस्ते सेवेचे लोकार्पण

यानुसार सर्व्हेक्षण करताना या रस्त्यांची लांबी, रूंदी यांसह त्यांवर आधारित वा जोडणार्‍या वाड्या आणि लोकसंख्या यांचीही नोंद करण्यात आली. त्याच्या जोडीने रस्त्याची सद्यःस्थिती वा दर्जा काय आहे? भविष्यामध्ये या रस्त्यांची कामे करायची झाल्यास त्यावर अपेक्षित निधी किती आहे याचाही अभ्यासही करण्यात आला. त्यानंतर, संकलित केलेल्या डाटाच्या साहाय्याने या गावच्या रस्त्यांचे नकाशे तयार करण्यात आले आहे. भविष्यामध्ये रस्त्यांची कामे करणे, आराखडे तयार करण्यासाठी ते उपयुक्त ठरणार आहेत.

रस्त्यावर खर्च झालेल्या नोंदीचा अभाव

गावातील मुख्य रस्त्यासह जोडरस्त्यांची माहिती घेताना या रस्त्यांवर आजपर्यंत शासकीय वा ग्रामपंचायत फंडातून निधी खर्च करण्यात आला आहे का? झालेला असल्यास कोणकोणत्या योजनांमधून निधी खर्च झाला आहे, याची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेण्यात आली. मात्र, ही माहिती कुठल्या एकाच कार्यालयात सलगपणे अन् सहजपणे उपलब्ध नाही. गावातल्या रस्त्यांवर झालेल्या कामांची व खर्चाची माहिती ही एकाच ठिकाणी वर्गीकृत स्वरूपात उपलब्ध व्हावी या अनुषंगाने आयआयटी मुंबईतर्फे माहिती संकलित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सार्वजनिक मालमत्तांच्याही नोंदी

रस्ते वा पाणीपुरवठ्याचे सर्व्हेक्षण करताना गावातील सार्वजनिक मालमत्तेच्या नोंदीही करताना लोकेशन ट्रॅक करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये संबंधित सार्वजनिक मालमत्तेचे लोकेशन घेऊन जीपीएस लॉगर ऑन ठेवून त्याचे ट्रॅक घेण्यात आले. या सार्वजनिक मालमत्तांमध्ये ग्रामपंचायत इमारत, शाळा, दुकाने, स्मशानभूमी आदींचा समावेश आहे.

ratnagiri
Pune News : ओतूर येथे बिबट्याने केला महिलेवर हल्ला

असे झाले रस्ता सुविधेचे सर्व्हेक्षण

पाण्यासंबंधित सर्व्हेक्षण करताना विविध मुद्दे विचारात घेण्यात आले. त्यामध्ये निवड केलेल्या गावांमधील वाडीवस्त्यांना प्रत्यक्ष भेटून सार्वजनिक जलस्रोतांची पाहणी करण्यात आली. लोकवस्तीमध्ये जलस्रोत आहे की दूरवर आहेत, दूरवर असल्यास किती लांबीवर, त्या जलस्रोतांच्या पाणीसाठ्याची क्षमता, सद्यःस्थितीतील पाण्याचा साठा, पाईपलाईन असल्याची तिची सद्यःस्थिती आदींच्या नोंदी करण्यात आल्या. त्याचवेळी या जलस्रोतांवर किती लोकसंख्या आणि वाडीवस्ती अवलंबून आहेत याचाही अभ्यास करण्यात आला.

संबंधित जलस्रोतांमधील पाणीसाठा मे अखेरपर्यंत पुरेसा ठरतो का? पाणीपातळी खालावल्यास नेमकी कधी कमी होते? त्यानंतर पाण्यासाठी कोणत्या उपाययोयजना केल्या जातात? या संबंधित लोकांशी संवाद साधून माहिती संकलित करण्यात आली. भविष्यामध्ये या जलस्रोतांवर नळपाणी योजना राबवणे शक्य आहे का? तसे झाल्यास कशा पद्धतीने नळपाणी योजना राबवणे शक्य आहे, त्यासाठी येणारा अंदाजित खर्च आदींचा अभ्यास करण्यात आला.

अहवाल तयार करण्याचे काम सुरू

निवड झालेल्या गावांमधील रस्त्यांचे करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणाचे अहवाल आयआयटीला सादर करण्यात आले आहेत. त्याची आयआयटी, मुंबईकडून फेरतपासणी होऊन त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे. पाण्याच्या सुविधांच्या सर्व्हेक्षणाचे अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. हे सविस्तर अहवाल लवकरच संबंधित ग्रामपंचायती आणि पंचायत समितीला सादर करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रकल्प समन्वयक हर्षद तुळपुळे यांनी दिली. अंतिम सविस्तर अहवालानंतर पायाभूत सुविधांची माहिती स्पष्ट होणार असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

अहवालाद्वारे कोणते होणार चित्र स्पष्ट

पायाभूत सुविधांची सद्यःस्थिती

सुविधा निर्मिती, डागडुजीसाठी खर्च

पायाभूत सविधा सुदृढ करण्याचे उपाय

त्यासाठी लागणारा अपेक्षित निधी

भविष्यातील पायाभूत सुविधां उभारणीसाठी अहवाल

पाणी अहवाल जलजीवन मिशनला उपयुक्त

रोजगार निर्मितीला प्रकल्प अहवाल

गावविकासासाठी उपयुक्त केस स्टडी

गावामध्ये लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणार्‍या कोणत्या समस्या आहेत? त्या समस्येसंबंधित सविस्तर माहिती, कोणत्या पायाभूत सुविधा वा संसाधनांची कमतरता आहे आदींची आगाऊ माहिती या अहवालाच्या माध्यमातून मिळणार आहे. जी माहिती गावातील विविध समस्या सोडवण्यासह त्या द्वारे गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पर्यायाने तालुक्याच्या गावविकासासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनासाठी भविष्यामध्ये उपयुक्त ठरणार आहे.

अभियानप्रमुख विकास रस्तोगी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या उन्नत महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत राज्य शासन आणि आयआयटी मुंबई यांच्यामार्फत केस स्टडी पद्धतीने अभ्यास केला जात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, गटविकास अधिकारी विवेक गुंड यांच्या मार्गदर्शनाखाली आपले प्रश्‍न, आपले विज्ञान’ या उपक्रमांतर्गत हा अभ्यास केला जात असून त्या द्वारे गाव विकासासंबंधित एखाद्या विषयाची सविस्तर माहिती संकलित होत आहे. ही माहिती भविष्यामध्ये गावामध्ये विकासात्मक योजनेचा आराखडा तयार करणे, त्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी निश्‍चितच उपयुक्त ठरणार आहे.

- सुहास पंडित, सहाय्यक गटविकास अधिकारी

आयआयटी मुंबई व राज्य शासनाच्यावतीने राबवल्या जात असलेल्या उन्नत महाराष्ट्र अभियाना’साठी रत्नागिरी जिल्ह्यातून राजापूरची निवड झाली आहे. या सर्व्हेक्षणामध्ये तालुक्यातील 22 गावांनी सहभाग नोंदवला असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये दहा गावांमध्ये सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक ग्रामपंचायत अन् पदाधिकार्‍यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जात आहे. तत्कालीन राजापूरचे गटविकास अधिकारी सुहास पंडित यांचेही सहकार्य लाभत आहे. केस स्टडीचा अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू असून, लवकरच तो संबंधित ग्रामपंचायती आणि पंचायत समितीला सादर केला जाणार आहे.

- हर्षद तुळपुळे, स्थानिक प्रकल्प समन्वयक

उन्नत अभियानांतर्गत बनवण्यात येत असलेला अहवाल ग्रामीण भागातील विकासासाठी पूरक आहे. येथील ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनातील समस्या पुढे येणार असून त्यावरील उपाययोजना कागदावर येतील. असा नियोजनबध्द आराखडा पायाभूत सुविधांची उभारणीसाठी उपयुक्त ठरू शकतो. त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील तरूणांना रोजगाराक्षम बनविण्यासाठी त्याचा फायदा होईल.

- दिपक नागले, माजी सभापती, जिल्हा परिषद

उन्नत महाराष्ट्र अभियानांतर्गंत वेगवेगळ्या मुद्द्यान्वये केस स्टडी केली जात आहे. त्यामध्ये रस्ते, पाणी, आरोग्य, पायाभूत सुविधा आदींचा समावेश आहे. केस स्टडी करून अहवाल तयार करताना आगामी सुमारे 30 वर्षांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील गावविकासाचा आराखडा तयार करण्यासाठी आणि त्या द्वारे गावविकास साधण्यासाठी हा प्रकल्प निश्‍चितच उपयुक्त ठरणार आहे. दळे गावामध्ये रस्ते, पाणी, जैवविविधतता, आरोग्य आदी मुद्द्यान्वये सर्व्हेक्षण केले जात आहे.

- महेश करंगुटकर, सरंपच दळे

उन्नत महाराष्ट्र अभियानांतर्गत गावातील उपलब्ध पाण्याची सुविधा आणि जलस्रोतांची पाहणी अन् सर्व्हेक्षण झाले आहे. भविष्यामध्ये गावातील पाण्याची सुविधा अधिक सुदृढ करणे, पाणीसुविधा उभारणे वा नळपाणी योजना राबवणे यासाठी या सर्व्हेक्षणाचा अहवाल उपयुक्त ठरणार आहे.

सर्व्हेक्षण झाले असले तरी त्याचा सद्यःस्थितीमध्ये अहवाल प्राप्त झालेला नाही. मात्र, या अहवालाच्या साहाय्याने भविष्यामध्ये पाणीसुविधा सुदृढ करत त्या द्वारे शेती वा बागायतीला प्रोत्साहन देत गावातच रोजगार निर्मिती करणे अन् लोकांचा आर्थिक उत्पन्नाचा स्तर उंचावणार्‍या तत्सम योजना राबवण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.

- श्रीधर सौंदळकर, सरपंच आंगले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.