रत्नागिरीत रुद्रानुष्ठानाची शतकोत्तर परंपरा

रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी मंदिर; ऐतिहासिक महत्व, अव्याहत अनुष्ठान
रत्नागिरीत रुद्रानुष्ठानाची शतकोत्तर परंपरा
Updated on

रत्नागिरी : सणांचा राजा श्रावण महिना हा वैविध्यपूर्ण व्रतवैकल्यांचा. रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी, तृणबिंदूकेश्वराच्या मंदिरामध्ये असेच एक आगळे व्रत गेले शंभरहून अधिक वर्षे पाळले जात आहे, ते म्हणजे संततधार रुद्रानुष्ठान. तृणबिंदूकेश्वराची स्थापना करणाऱ्यां मुळे नामक व्यक्तीच्या वंशजांनी ही परंपरा सुरू केली. तृणबिंदूकेश्वराच्या पिंडीवर तांब्याच्या अभिषेक पात्रामधून पाण्याची संपूर्ण महिनाभर संततधार सुरू असते व ब्रह्मवृंद येथे रुद्र पठण करत असतात. दिवस-रात्री खंड न पडता, हे अनुष्ठान सुरू झाले आहे.

रत्नदुर्ग किल्ला विजापूरच्या सुभेदाराच्या ताब्यात असताना चिटणीस म्हणून मुळे नामक व्यक्ती काम करत असे. त्यांचे कुलदैवत तृणबिंदूकेश्वर म्हणून त्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी तृणबिंदूकेश्वराची स्थापना केली. मुळ्ये यांचा मूळ चौथरा फगरवठार येथे आहे. तृणबिंदूकेश्वराची स्थापना केल्यावर ते फगरवठार येथून दररोज सकाळी पुजेला येत असत. याकरिता भैरव मंदिर, खालची आळी, टिळक आळी, जोशी पाळंद, कुंभारवाडी येथून फगरवठार रोड चौथऱ्यापर्यंत चिरेबंदी फरशी बांधलेली होती. कालौघात ही फरशी दिसेनाशी झाली आहे. याचमुळे यांच्या वंशजांनी संततधारेची परंपरा सुरू केली. त्यांचे गोखले नाक्यावर भाजीचे दुकान होते. या संबंधीची माहिती देवस्थानच्या अंकामध्ये दिली आहे. शिपोशीच्या आठल्ये घराण्याचा इतिहास व पुण्याच्या दरबारात करिना जबाबमध्ये ही माहिती असल्याचे यात म्हटले आहे.

श्री भैरी, जोगेश्वरी, नवलाई-पावणाई, तृणबिंदूकेश्वर ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे ही प्रथा अखंडितपणे सुरू आहे. श्रावण प्रतिपदा ते अमावस्या या काळात तृणबिंदूकेश्‍वर मंदिरात संततधार रुद्रानुष्ठान केले जाते. कालपासून (ता. ९) रुद्रानुष्ठान सुरू झाले आहे. रुद्रानुष्ठान काळात दररोज बेल, फुले, फळांची आरास केली जाते. संततधारेकरिता भाविक, दानशूर मंडळींचेही सहकार्य लाभते. उपाध्यक्ष राजन जोशी यांनी सांगितले की, पावसचे स्वामी स्वरूपानंदांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारची सायंपूजा सुरू करण्यात आली. ती आजही सुरू आहे.

४५ वर्षे नैवेद्य

खालच्या आळीतील प्रसिद्ध ज्योतिषी गजानन पटवर्धन म्हणाले की, मुळ्ये यांनी ही संततधार सुरू केली. पूर्वी भाऊ जोशी, रामचंद्र पटवर्धन, यशवंत जोशी यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. माझी आई ४५ वर्षे दुपारी १२ वाजता देवाचा नैवेद्य करून देत होती व वडील तो घेऊन सोवळ्याने, अनवाणी जात होते. विहिरीतून पाणी काढून वडील संततधारेसाठी घालत होते. मी संकष्टीच्या आवर्तनांसाठी जात होतो. मुलगाही अनेक वर्षे संततधारेसाठी जात आहे. या संततधार सेवेचा खूप उपयोग आमच्या कुटुंबाला मिळाला व तो कृपाशीर्वादच म्हणावा लागेल. संततधारेचे तीर्थ प्राशन करणाऱ्या अनेक भाविकांना चांगली प्रचिती आली असून त्यावर श्रद्धा आहे.

निवृत्तीनंतर ८२ वर्षापर्यंत सहभाग

झाडगाव, खालच्या आळीत भैरी मंदिरालगत राहणारे ८५ वर्षीय रामचंद्र विठ्ठल चितळे म्हणाले, आम्ही मुळचे चिपळूणचे, नंतर नेवऱ्यातून येथे सुमारे १०० ते १२५ वर्षांपूर्वी स्थायिक झालो. मी १५ वर्षांचा असल्यापासून रुद्रानुष्ठानात सहभागी होत आहे. मध्यंतरी नोकरीमुळे बाहेरगावी असल्यामुळे मी येऊ शकलो नाही. परंतु निवृत्तीनंतर अगदी ८२ वर्षापर्यंत भाग घेतला. दिगंबर जोशी, नारायण कुलकर्णी, बाबा देसाई यांच्यासह अनेकांनी ही परंपरा पुढे नेली आहे. पूर्वी विहिरीतून पाणी काढावे लागे. त्याकरिता महिलाही पाणी काढून देत. अलिकडे ट्रस्टने थेट पाण्याची सुविधा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.