आता कोणाला घाबरायची गरज नाही. भीती मनात ठेवू नका. आता आपले दिवस आलेत, असे नीलेश राणे म्हणाले.
रत्नागिरी : आता आपले दिवस आले. त्यामुळे येत्या काळात कोणाला घाबरायची गरज नाही. नारायण राणे (Narayan Rane) खासदार झाले असले तरी मीच खासदार झाल्यासारखे वाटते. राणेसाहेब तुम्ही फक्त दिल्ली सांभाळा, इकडे आम्ही बघतो. ज्यांनी निवडणुकीत हरवण्याचा प्रयत्न केला, वाट लावण्याचा प्रयत्न केला त्यांना सोडणार नाही, त्यांची वाट लावणारच, असा थेट इशारा माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी कोणाचेही नाव न घेता दिला.
रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. नीलेश राणे म्हणाले, गेल्या दहा वर्षांमध्ये काय झाले हे मी सांगण्याची गरज नाही. माझी कोणाशी व्यक्तीशः लढाई नाही; परंतु त्या माणसाला काही व्हिजन नव्हते. त्यामुळे कोकणाचा (Konkan) विकास झाला नाही. इकॉनॉमिक झोन लागू केल्यामुळे विकासाला खिळ बसली आहे. मोठे नुकसान झाले आहे.
राणेसाहेब आपल्या माध्यमातून कोकणावरचे हे भूत काढून टाका. मी २०१४ मध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर ठाम राहिलो, भूमिका बदलली नाही. पराभव माहित होता तरी तरूणांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही भूमिका बदलली नाही. नाणार प्रकल्प होणार होता त्यालाही विरोध झाला. आता तो बारसूमध्ये होणार आहे. हे मुंबईत बसून कोणीतरी ठरवणार. काहींनी तर तीन महिन्यात रोजगार देण्याचा वायदा केला. त्यानंतर पक्ष काढला, काय झाले? किती रोजगार दिले? पक्ष काढणाऱ्यांनी व्हिजन सांगावे, असा सवालही उपस्थित केला.
रत्नागिरी जिल्ह्याने माझ्यावर प्रेम केले आहे. काही संबंध नसताना मला पुन्हा बोलावले आहे. कोणाला आवडो न आवडो; पण आता नीलेश राणे पुढे असणार. जिल्ह्यातील लोकांचे प्रेम मी विसरणार नाही. गोमातेसाठी १०० गुन्हे दाखल झाले तरी अंगावर घ्यायला तयार आहे. आता संकोच बाळगू नका, बिनधास्त बोला. आता कोणाला घाबरायची गरज नाही. भीती मनात ठेवू नका. आता आपले दिवस आलेत, असे सांगून नीलेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग झाला, आता रत्नागिरी आणि राजापुरातही जाणार आणि ज्यांनी हरवण्याचा प्रयत्न केला त्यांची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा ५ वर्षात चकाचक करतो. पक्ष असा मजबूत करतो की, मागण्यापेक्षा पक्षाने मतदार संघ तुमचाच आहे असे म्हणायला हवे, असे सूचक विधानही राणे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.