रत्नागिरी : शहरामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रचंड उत्साहात सकाळपासूनच रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत शहरामध्ये ४० टक्के मतदान झाले. त्यानंतर उन्हामुळे मतदारांनी विश्रांती घेतली व पुन्हा तीन वाजल्यानंतर मतदारांनी गर्दी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
महायुतीचे विद्यमान मंत्री उदय सामंत आणि परिवर्तनाचा नारा देणारे महाविकास आघाडीचे बाळ माने यांच्यातच प्रमुख लढत होती आणि या दोनच उमेदवारांचे बूथ शहरात पाहायला मिळाले.
शहरात सकाळी साडेसहा वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मतदारांची वर्दळ सुरू झाली. सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाने सर्वप्रथम मतदान केले. सकाळीच मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
गाडीतळ येथील नगरपालिका शाळेच्या मतदान केंद्रात पन्नास ते शंभर मतदार दोन रांगांमध्ये उपस्थित होते. उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता बहुतांशी केंद्रांवर मंडप व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मतदारांनी समाधान व्यक्त केले.
गृहमतदानाची सुविधा प्रशासनाने दिली असली तरी आज ८० ते १०० वयोगटातील अनेक ज्येष्ठांनी स्वतः मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. बूथवर बसणाऱ्या कार्यकर्त्यांना चहा, नाश्ता, पाणी, दुपारचे जेवण अशी सुविधा महायुती, महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली होती.
या ठिकाणी मतदारांना मार्गदर्शन, मदतीचे काम करण्यात येत होते. काहीजणांना मतदार यादीत नाव शोधण्यापासून नंबर सांगण्याची व्यवस्था केली होती. काही मोठ्या केंद्रांवर लॅपटॉप घेऊनही हे काम करण्यात येत होते.
दुपारी १२ ते १ वाजल्यानंतर मतदान केंद्रावरील गर्दी थोडी कमी झाली. पहिल्या चार ते पाच तासांत सुमारे ४० टक्के मतदान झाले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी पत्नी अंकिता यांच्यासह मतदान केले.
रत्नागिरी मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी पत्नी सौम्यश्री यांच्यासह येथील दामले विद्यालयात मतदान केले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी रा. भा. शिर्के प्रशालेत मतदान केले. नगरपालिका शाळा क्र. ५, स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय केंद्रावर पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी मतदान केले.
मतदान करताना मतदाराने मोबाईल नेऊ नये, अशा सूचना असल्याने सर्वच मोबाईल बाहेर जमा करण्यात येत होते. अनेकांनी मोबाईल आणले नव्हते; परंतु काही ज्येष्ठांना मोबाईल कुठे ठेवावा, याची समस्या भेडसावत होती. त्यांनी नाराजीही व्यक्त केली. मतदान केंद्रांत मतदान करताना फोटो, व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी नव्हती. तरीही नेत्यांचे फोटो काढण्यात आल्याने याला कशी काय परवानगी दिली, असा सवाल काही मतदारांनी केला.
मतदानासाठी भुसावळहून रत्नागिरीत आलो. मागच्यावेळीही आलो होतो आणि त्यापूर्वीही नोकरीत असताना कागलला बदली झाली होती; पण मतदानासाठीची सुटी मतदानासाठीच वापरण्यासाठी रत्नागिरीत आलो.
- सी. एल. वाघुळदे
मी लंडन येथील ससेक्स युनिव्हर्सिटी येथे मास्टर्स करत आहे; परंतु मतदान असल्याने आज लंडनहून येथे मतदानासाठी आले. माझे हे पहिलेच मतदान होते व मला खूप आनंद झाला. माझे वडील जि. प. मध्ये असून, आई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सेवा बजावत आहे.
- सानिका निवेंडकर, नवमतदार
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.