रत्नागिरी : प्रत्येकाला आपले वाहन खूप प्रिय असते. तसा त्याचा नंबरही लय भारी असावा यासाठी कितीही रक्कम मोजायला अनेक वाहनधारक तयार असतात. त्यामुळे मग ‘व्हीआयपी’ नंबरला प्राधान्य दिले जाते; मात्र आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार दुचाकी, चारचाकीसह अन्य वाहनांना व्हीआयपी नंबर घेताना वाहनधारकांच्या खिशाला चाट बसणार आहे. याचा अध्यादेश शासनाने काढला असून, पुढील महिन्यापासून चॉईस नंबरसाठी सध्या असलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम मोजावी लागणार आहे.
उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून नवीन सीरियल सुरू झाल्यानंतर ‘व्हीआयपी’ क्रमांकासाठी अर्ज घेतले जातात. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास लिलाव पद्धतीने हे क्रमांक दिले जातात. महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने सर्व प्रकारच्या वाहनांची व्हीआयपी अथवा पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या दरांमध्ये मोठी वाढ केली आहे. या अधिसूचनेमध्ये निश्चित केलेल्या दरासंदर्भात हरकती नोंदवण्यासाठी राजपत्र प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्याची मुदत दिली आहे.
रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातही व्हीआयपी नंबरची चांगली मागणी आहे. अनेकजण लकी नंबरसाठी दुप्पट ते तिप्पट रक्कम मोजायला तयार असतात. काहींचा नऊ हा लकी नंबर आहे. ९, ९९, ७८६, ९९९ व ९९९९ या वाहन क्रमांकासाठी प्रस्तावित दर दुचाकी व तीनचाकी आणि परिवहन वाहने यांच्याव्यतिरिक्त अडीच लाख रुपये आहे तर दुचाकी व तीनचाकी आणि परिवहन वाहनांसाठी ५० हजार रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे. सध्या त्यासाठी अनुक्रमे दीड लाख रुपये व २० हजार रुपये आकारले जात आहेत.
यापूर्वी आपल्या इच्छेप्रमाणे कोणताही क्रमांक वाहनांसाठी लागणार असेल तर त्यासाठी साडेसात हजार रुपये मोजावे लागत होते. आता यात दुप्पट वाढ होऊन किमान १५ हजार रुपये मोजून असे क्रमांक घ्यावे लागणार आहेत. दुचाकीसाठी तीन हजार असलेली रक्कम वाढवून ती ५ हजार रुपये करण्यात येणार आहे.
हौशी मालकांच्या खिशाला चाट
पसंतीच्या क्रमांकांचे दर कितीही वाढले तरी त्याला मिळणारा प्रतिसाद कमी होत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. काहीवेळा ज्योतिष किंवा अंकशास्त्रांच्या गणितानुसार विशिष्ट क्रमांक हवा असतो तर कधी कधी हौस म्हणूनही ''होऊ दे खर्च'' असं म्हणत पसंतीच्या क्रमांकासाठी लाखो रुपये मोजतात; परंतु आता प्रस्तावित दर अधिकच झाल्याने हौस करणाऱ्यांच्या खिशाला चाट बसणार आहे.
...ही वाढ अन्यायकारक
व्हीआयपी नंबरसाठी सध्या जवळपास ५ हजारांपासून २ लाखांपर्यंतची वाढ नवीन अधिसूचनेमध्ये प्रस्तावित केली आहे. गृहविभागाने प्रस्तावित केलेली वाढ ही अन्यायकारक असल्याचे मत वाहनचालकांमधून व्यक्त केले जात आहे.
शासनाच्या नव्या धोरणानुसार, १५ सप्टेंबरला व्हीआयपी नंबरच्या दरवाढीची अधिसूचना जारी झाली. व्हीआयपी नंबरसाठी शासनाने वाढ केली असून, पुढच्या महिन्यापासून ही दरवाढ लागू होणार आहे.
- अजित ताम्हणकर,उपप्रादेशक परिवहन अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.