उमेदवारांची धाकधूक वाढली ; उद्या कोण उचलणार गुलाल ?
सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल उद्या (18) स्पष्ट होणार आहे. यामध्ये ग्रामपंचायतीवर कोणाचा झेंडा फडकतो? हे समोर येणार आहे. भाजप आणि महाविकास आघाडीने जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर दावा करत गुलाल आम्हीच उधळू, असे म्हटले आहे; मात्र मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला? हे मतपेटीतून पुढे येणार आहे. एकूणच नशीब अजमावणाऱ्या उमेदवारांची धाकधूक मात्र वाढली आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारीला पार पडल्या. अगदी शांततेत आणि सुरळीत मार्गाने निवडणूक प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायतीच्या या निवडणुकांमध्ये मतदारांनीही उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे मतदान टक्केवारीही वाढली. बऱ्याच ठिकाणी अस्पष्ट उमेदवारी चिन्हामुळे वृद्ध व्यक्तींना मतदान करण्यासाठी निर्माण झालेली अडचणही उमेदवारासाठी तोट्याची ठरू शकते.
हेही वाचा - उलटसुलट चर्चेला मिळाली चालना
तालुक्यातील कोलगाव, तळवडे, मळगाव, इन्सुली या ग्रामपंचायतीवर सर्वांचे लक्ष लागून आहे; मात्र या चारपैकी कोलगाव ग्रामपंचायतीवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. याठिकाणी महेश सारंग विरुद्ध मायकल डिसोजा या दोन प्रतिस्पर्धीनी निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मतदानादिवशी जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान सुरू असताना कोलगावात मात्र हळद, तांदूळ, लिंबू रस्त्यावर आल्याने या ठिकाणी जादूटोण्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनीही दंगल नियंत्रण पथकासह कोलगावमध्ये दिलेली भेट चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे कोलगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुक निकालाकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यातील सगळ्याच ग्रामपंचायतीवर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत पाहायला मिळाली. सावंतवाडी तालुक्यातही बऱ्याच ठिकाणी महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असेच चित्र होते तर काही ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये बिघाडीही झाली होती तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरले होते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी चुरस पाहायला मिळाली होती.
तळवडेमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे तर इन्सुली व मळगावमध्ये भाजपाकडून ताकद लावण्यात आली आहे. मळेवाड ग्रामपंचायतीमध्ये यावेळी बदल घडण्याची अपेक्षा आहे; मात्र शिवसेनेकडूनही यावेळी येथे महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार, असा दावा केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीची पुनरावृत्ती ग्रामपंचायत निवडणुकीत होऊ देऊ नका, असे केलेले मतदारांना आवाहन आणि भाजपकडून ग्रामपंचायत निवडणुकीत वाटून घेण्यात आलेली जबाबदारी पाहता मतदार कोणाच्या ताब्यात या गावची सत्ता देतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा - कासवांच्या चाहुलीनं पर्यावरणप्रेमी आनंदले
मतमोजणीकडे लक्ष
- तहसील कार्यालयामध्ये यंत्रणा सज्ज
- कार्यालयाबाहेर कडक बंदोबस्त
- कोलगाव, तळवडे, मळगाव, इन्सुलीकडे नजरा
- बहुतांश ठिकाणी आघाडी विरुद्ध भाजप संघर्ष
दहा वाजता मतमोजणी
येथील तहसील कार्यालयामध्ये मतमोजणीसाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून उद्या (18) सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी वेगळे टेबल असून तासाभरात निकाल स्पष्ट होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.