Shivsena, Bjp, Ncp
Shivsena, Bjp, NcpEsakal

Sakal Survey : रत्नागिरीत शिवसेना वरचढचं; राष्ट्रवादी-भाजपही सज्ज

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होणार .
Published on

रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri)जिल्ह्यातील पाच मतदारसंघापैकी चारमध्ये शिवसेनेचे (Shivsena)निर्विवाद वर्चस्व आहे. चिपळूण (Chiplun)मतदारसंघात राष्ट्रवादी त्याहीपेक्षा शेखर निकम (Shekhar Nikam) हे वरचढ आहेत. सद्यस्थितीत निवडणुकीचा ज्वर नसला तरी दोन नगरपंचायतीचे बिगूल वाजले आणि महिनाभरात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूका येऊ घातल्या आहेत. राजकारणातील चढउतार लक्षात घेतले तर गुहागर (Guhager)मतदारसंघात शिवसेनाला टक्कर देण्यात भाजप सज्ज आहे. पक्षीय पातळीवर लढाई झाली तर येथील अंदाज करणे कठीण. महाआघाडी झाली तर गुहागरसह चार जागा आघाडी जिंकू शकते.

Shivsena, Bjp, Ncp
..तर मुंबईतील 25 हून अधिक मतदारसंघात भाजप-सेनेतच खरा 'सामना'

२०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत दापोली (Dapoli)विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे योगेश कदम यांनी राष्ट्रवादीचे संजय कदम यांचा पराभव केला होता आताही विधानभेच्या निवडणुका झाल्या तरीही शिवसेनेचाच भगवा फडकेल अशी स्थिती आहे. २०१९ ची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. संजय कदम शिवसेनेकडून राष्ट्रवादीकडे आलेले. त्यांचा राजकीय प्रवास सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद सभापती ते आमदार असा झाला होता तर योगेश कदम यांनी तो पर्यंत कोणतीही निवडणूक लढविलेली नव्हती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत २५ वर्षे शिवसेनेचे आमदार असलेले सूर्यकांत दळवी यांचा संजय कदम यांनी पराभव केल्यावर पुढील २ वर्षे दापोली तालुका शिवसेनेला कोणी वालीच राहिला नव्हता. तेव्हा रामदास कदम यांनी त्यांचे पुत्र योगेश कदम यांना दापोली मतदार संघात धाडले. रामदास कदम यांनी या मतदार संघात आपल्या मंत्रीपदाचा उपयोग करून २५ वर्षात झाली नव्हती तेवढी विकासकामे केली. योगेश युवा नेते असल्याने युवा कार्यकर्त्यांची फळी त्यांचेसोबत तयार झाली.

संजय कदम यांनीही दापोली पंचायत समितीमध्ये शिवसेनेची सत्ता खेचून राष्ट्रवादीचा सभापती बसविला. जिल्हा परिषद निवडणुकीत दापोली तालुक्यातून ६ पैकी ३ सदस्य निवडून आणले. २०१९ ला राष्ट्रवादीचे संजय कदम कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार होते.शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार योगेश कदम यांच्यापुढे त्यांची डाळ शिजली नाही.युती असूनहि भाजपचे नेते व कार्यकर्ते ऊदासीन होते. शिवसेनेतील नाराज गटानेही योगेश कदम यांचे काम केले नाही तरीही योगेश कदमनी साडेतेरा हजारांची आघाडी मिळवली. सेना आता एवढी बळकट आहे.

आता विधानसभेची निवडणूक झाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे योगेश कदम हेच असतील व भाजप ऊमेदवार पराभूत होईल. महाविकास आघाडी न होता सर्व राजकीय पक्ष स्वबळावर लढले तर त्याचा फायदा पुन्हा शिवसेनेलाच होईल.

गुहागर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्त्व गेली १३ वर्ष आमदार भास्कर जाधव करत असले तरी आता त्याची लोकप्रियता ओसरु लागली आहे. ते एक वर्ष विरोधी पक्षात राहिले. आज सत्तेत असून कोरोना संकटामुळे प्रभावी काम करण्याची संधी न मिळणे ही त्याची दृष्य कारणे आहेत. त्यासह समाजांमध्ये असलेली नाराजी, सीआरझेड कायद्याच्या उल्लंघनाच्या नोटीसा, मोडकाआगर पूल बंद असणे, विजापूर रस्त्याचे काम रेंगाळणे,यासह विविध कारणांमुळे गुहागरच्या पर्यटन व्यवसायाला बसत असलेला फटका याचा परिणाम झाला आहे. खासदार सुनील तटकरेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पुन्हा उभारी घेतोय तर काँग्रेस पक्ष आणि भाजपमधील तरुण नेतृत्त्वाचे क्रियाशील होणे ही जाधव यांच्या डोकेदुखीची कारणे आहेत. याचा परिणाम निश्चितच आजच्या घडीला होवू शकतो. सर्व पक्ष स्वतंत्र लढले तर भाजपला संधी मिळू शकते. मात्र महाविकास आघाडी म्हणून निवडणूका झाल्या तर एकीचे बळ भाजपची संधी हिरावून घेईल.

आमदार भास्कर जाधव यांनी २००९ ला गुहागर विधानसभा जिंकली आणि राज्यमंत्री पदाची शपथ घेवून नेतृत्त्व करण्यास सुरवात केली. याच कार्यकाळात त्यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद मिळाले. शेवटचे काही महिने कामगार मंत्री होण्याची संधी मिळाली. स्वाभाविकपणे २०१४ च्या निवडणुकांमध्ये या प्रतिमेचा त्यांना फायदा झाला.२०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी आमदार समर्थकांनी राष्ट्रवादी सोडली. परिणामी १० वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर उमेदवारीचेच प्रश्र्नचिन्ह होते. पक्ष संघटना कोलमडली होती. शिवसेनेबरोबर भाजपची युती झाली. नव्या उमेदवाराला प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला. याचा फायदा पुन्हा एकदा भास्कर जाधव यांना झाला.

गेल्या अडीच वर्षात गुहागरच्या राजकीय स्थितीत अनेक बदल झाले आहेत. खासदार सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा गुहागर तालुक्याती संघटना बांधण्यास सुरवात केली. जाधव याच्या नेतृत्त्वामुळे पक्षापासून दुरावलेल्यांना पुन्हा राष्ट्रवादीत सक्रीय केले. गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्यासह दापोलीतील कांगणे, राजपुरे आदींचा पक्षप्रवेश, कुणबी समाजोन्नती संघाला ५ कोटी देणे यातून हा समाज पुन्हा राष्ट्रवादीकडे वळतोय. पक्षसंघटन मजबूत करताना नव्या चेहऱ्याकडे तालुक्याचे नेतृत्त्व दिले आहे. विधानसभा क्षेत्राध्यक्ष पद खेड तालुक्यात देवून भौगोलिक समन्वय साधला आहे,त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढते आहे.

भाजपचीही ठाम वाटचाल सुरू आहे. २००९ मध्ये अपक्ष म्हणून बसलेला शिक्का धुवून काढण्यात डॉ. नातूंना यश आले आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून पक्ष बांधणी करताना नव्या दमाचे चेहरे आज तालुक्याचे नेतृत्त्व करत आहेत. कोरोनाच्या काळात या नव्या पदाधिकाऱ्यांनी मदत कार्याद्वारे भाजपची संघटना मजबुत केली आहे.या दोन पक्षांच्या तुलनेत शिवसेनेची पक्षबांधणी आज होताना दिसत नाही. सत्तेत असूनही महत्त्वाचे पद न मिळाल्याचा सल आमदार जाधव यांना बोचत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या आक्रमक कार्यपध्दतीवर झाला आहे.

Summary

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होणार .

राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्ये चीड

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होणार . गुहागर तालुक्यातील असगोलीचे नगरपंचायतीमधुन ग्रामपंचायतीमध्ये रुपांतर झाल्याने १ जिल्हा परिषद व २ पंचायत समिती गणांची वाढ होण्याची शक्यता आहे. याने स्थानिक पक्षीय गणिते बदलू शकतात. कोरोना महामारीमुळे शिवसेनाला फटका बसु शकतो. आज पंचायत समितीमध्ये असलेले लोकप्रतिनिधी निवडणुकीत शिवसेनेबरोबर रहाणार की राष्ट्रवादीत जाणार यावरही अनेक सामाजिक गणिते अवलंबुन आहेत. आजपर्यंत स्थानिक निवडणुकांमध्ये अंतर्गत गटबाजीमुळे शिवसेनेला एकहाती यश मिळालेले नाही. भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्त्यांमध्ये चीड आहे. हा राग प्रतिबिंबीत होऊ शकतो.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना हीच वरचढ आहे. मंत्री उदय सामंत यांनी केलेली पक्षबांधणी, संघटनेवरची त्यांची पकड, मंत्रिपदाचा दबदबा आणि मतदारसंघातील राष्ट्रवादी व भाजप यांची अपुरी ताकद यामुळे आजच्या घडीला उदय सामंत हेच शिवसेनेच उमेदवार असतील आणि तेच विजयी होतील, असे ठामपणे म्हणता येते. राजकीय अंदाज असा ठामपणे वर्तवावा इतकी शिवसेनेची रत्नागिरी मतदारसंघावर पकड आहे. राष्ट्रवादी पक्ष येथे विस्कळित झाला आहे. अंतर्गत कलह मिटवण्यात नुकतेच जयंत पाटील यशस्वी झाले, असे चित्र आहे. मात्र त्यामुळे पक्षबांधणी होऊन शिवसेनेला तो टक्कर देईल, असे होण्याची शक्यता नाही. त्याची चाललेली घसरण थांबेल एवढेच काय ते. काँग्रेसची अवस्था तर राष्ट्रवादीपेक्षा वाईट आहे. पक्ष गटबाजीने विस्कळित झाला आहे. शिवाय नेतृत्वाचा अभाव आहे, ही पक्षापुढील मोठी समस्या आहे. त्यामुळे आघाडीतील शिवसेनाच वरचढ आहे.

शिवसेनेला टक्कर देणारा भाजप अजूनही आपली ताकद अजमावतो आहे. मात्र सामंत यांच्यापुढे उभा राहील आणि त्यांना तोडीस तोड लढत देईल, असा उमेदवार सध्या तरी भाजपकडे नाही. शिवसेनेच्या विरोधात जाईल असा मोठा मुद्दा भाजपकडे नाही. रत्नागिरी शहराची दुरवस्था आणि कोविड काळातील अपयश याचा वापर करून घेण्याची ताकद भाजपकडे नाही. मंत्र्यांच्या घोषणांचा सुकाळ मात्र त्यापैकी अंमलबजावणी कितीची होणार, असा प्रश्न भाजपचे नेते विचारून शिवसेनेला अडचणीत आणत नाहीत. त्यामुळे शिवसेनेपुढे भाजपच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काही स्थानिक ठिकाणी असलेले राष्ट्रवादी व भाजपचे दुय्यम स्तराचे नेते वगळता या पक्षाला यश मिळण्याची शक्यता नाही.

राजापूरचे आमदार राजन साळवी यांचीही संघटनेवर पकड हेच त्यांचे बलस्थान आहे. तेथे भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष तुलनेने दुर्बल आहेत. त्यातल्या त्यात काँग्रेसने तेथे थोडेफार स्थान राखले आहे. राजापूर नगरपालिकेत काँग्रेसच्या अस्तित्वाची चुणूक दिसली, तरी विधान परिषदेच्या पातळीवर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता कमी आहे. थोडक्यात तेथेही शिवसेनाच आहे.

राष्ट्रवादीपुढे आव्हान

राष्ट्रवादीला जिल्ह्यात फारसे स्थान नसले, तरी चिपळूण मतदारसंघात शेखर निकम यांनी मात्र राष्ट्रवादीचा गड अभेद्य ठेवला आहे. चिपळूण मतदारसंघात शिवसेनेची डाळ २०१४ च्या निवडणुकीत अल्पमतानेच शिजली. मात्र गेल्या निवडणुकीत शिवसेना कमी पडली. अत्यंत लो-प्रोफाईल ठेवून संयमाने वाटचाल आणि आमदार नसतानाही केलेली अनेक लोकोपयोगी कामे हे निकमांचे बलस्थान. चिपळूणच्या महापुराच्या काळात स्वतःची यंत्रणा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वापरून मदत कार्याचा त्यांनी जणू आदर्शच निर्माण केला होता. मतदारसंघातील पाणीसमस्या आणि पुरानंतरच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन सुरू असलेले काम यात त्यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने विरोधकही त्यांना साह्य करतात.

याच मतदारसंघात शिवसेना तुल्यबळ असूनही सध्या ती पक्षांतर्गत विरोधाने पोखरलेली दिसत आहे. आमदार भास्कर जाधव व माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यातील जाहीर वादविवाद आणि एकापाठोपाठ एक मेळावे घेऊन परस्परांवर दुगाण्या झाडण्यामुळे सेनेत सारेकाही आलबेल नाही, हेच स्पष्ट होते. काँग्रेस आणि भाजप यांचे या मतदारसंघातील स्थान तसे नगण्यच आहे. त्यामुळे पक्ष म्हणूनही राष्ट्रवादीचे निकम आणि महाआघाडी झाली तरी त्यांचाच नंबर लागणार, इतके या मतदारसंघातील वातावरण स्पष्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत थोडेफार इकडेतिकडे झाले तरी विधानसभेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()