दक्षिण कोकणवर अधिराज्य गाजवलेल्या सावंत भोसले घराण्याची कारकीर्द कौतुकास्पद

Sawant Bhosale family history konkan sindhudurg
Sawant Bhosale family history konkan sindhudurg
Updated on

सावंतवाडी ः संस्थांनचे अधिपती असलेल्या सावंत-भोसले घराण्याचे या प्रांतात सोळाव्या शतकामध्ये आगमन झाले. या घराण्याने दक्षिण कोकणवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवले. त्यांची कारकिर्द शौर्याने भारलेली आहे. या घराण्याच्या कोकणातील आगमनाचा प्रारंभ या भागातून मांडत आहोत. 

उदेपूर (राजस्थान) येथील सिसोदिया या राजपूत घराण्याचे सावंत-भोसले हे वंशज आहेत. हे घराणे सूर्यवंशीय राजांचे मानले जाते. उपलब्ध संदर्भानुसार त्यांचे पूर्वज अयोध्या प्रांतात राज्य करत होते. मेवाड प्रांतातील चित्तोड येथील गादी स्थापन करून सिसोदिया घराण्यातील हे वंशज त्या काळात राज्य करत असल्याचे संदर्भ आहेत. याच प्रांतात उदेपूर हे शहर आहे. या घराण्याला पराक्रमाचा मोठा इतिहास आहे. महाराणा प्रताप हेही याच सिसोदिया वंशाचे. 

दक्षिण कोकणात या घराण्यातील मांग सावंत हे सगळ्यात आधी येथे आले. तेच सावंतवाडीतील राजघराण्याचे मुळ पुरुष मानले जातात. विजयनगर राजाच्या सैन्यासोबत ते या प्रांतात आले. सुरूवातीला काहीकाळ चंदगड तालुक्‍यातील गंधर्वगड येथे त्यांचे ठाणे होते. त्यामुळे त्यांना चांदगुढाधिपती या नावानेही संबोधले जायचे. 
कोकणात आल्यानंतर त्यांनी होडावडे (ता. वेंगुर्ले) येथे सर्वांत आधी आपले ठाणे वसवले. त्या काळात या भागावर प्रभाव असलेल्या स्थानिक सरदाराचा त्यांनी पराभव केला. त्यांची ख्याती हळूहळू या प्रांतात पसरली. मागील भागात याच मांग सावंत यांचा या भागावर वर्चस्व असलेल्या कुडाळदेशस्थ प्रभूंशी संघर्ष झाल्याचा संदर्भ आला आहे. 1580 मध्ये मांग सावंत आणि कुडाळदेशस्थ प्रभूंचे सेनापती देव दळवी यांनी मिळून कुडाळ प्रांताविरूद्ध युद्ध पुकारले. मराठ्यांची सत्ता स्थापन करणे हा या मागचा हेतू होता. कुडाळच्या प्रभूंनी विजापूरच्या बादशहाकडून मदत मिळवली. होडावडे येथे दोघांच्याही सैन्यात लढाई होवून यात मांग सावंत मारले गेले. 

मृत्यूवेळी मांग सावंत यांना अपत्य नव्हते. त्यांना एकूण सात पत्नी होत्या. यातील एक गर्भवती होती. ती ओटवणे येथे एका आप्तांकडे गेली. उर्वरीत सहाजणी सती गेल्या. यानंतर पुढचा काही काळ सावंत-भोसले घराणे प्रकाशझोतात नव्हते. 
ओटवणेत मांग सावंत यांच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. ते म्हणजे फोंड सावंत. त्यांचे पुत्र खेम सावंत ओटवणेकर हे राजयोग घेवून जन्माला आले. त्यांच्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते.

ओटवणेत त्या काळात वरदे आडनावाचे कुलकर्णी होते. खेम सावंत लहानपणी त्यांची गुरे राखण्याचे काम करायचे. एकदिवशी दुपारी ते एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले होते. तेथेच त्यांना झोप आली. इतक्‍यात एक मोठा नाग तेथे आला आणि फणा पसरून त्याने खेम सावंत यांच्या अंगावर छत्रीसारखी सावली निर्माण केली. याच दरम्यान शेणवी हे गृहस्थ खेमसावंत यांना शोधण्यासाठी तेथे आले. हा प्रकार पाहून हा मुलगा तेजस्वी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खेम सावंत यांना जागे करून घरी आणले. "भविष्यात आयुष्यात मोठा लाभ झाला तर मला काय देशील?' असा सवाल त्यांनी खेम सावंत यांना केला. यावेळी "जेथे माझी पत्रावळ तेथे तुझा द्रोण' असा शब्द त्यांनी दिला.

पुढे सावंत भोसले घराण्याची गादी स्थापन झाल्यानंतर त्यांनी या शेणवी अर्थात सबनीस यांना प्रधान म्हणून नेमले. आजही ओटवणेमध्ये ही आख्यायिका सांगितली जाते. त्या ठिकाणी सापाची पाषाणी मूर्ती पुजेला लावलेली पहायला मिळते. या देवस्थानला ओटवणेच्या मुख्य देवस्थानामध्ये स्थान आहे. 
पुढे पराक्रमाच्या जोरावर खेम सावंत यांनी देशमुखी मिळवली. एका संदर्भानुसार वरदे यांनी खेम सावंत यांना व्यायाम, खेळाची गोडी लावली. एकदा ते बांद्याच्या पेठेतून मित्रासोबत जात होते. याचवेळी विजापूरच्या राजवाड्यातील एक शाही पाहुणी मेण्यातून जात होती. याच दरम्यान एक उधळलेला बैल या मेण्याच्या दिशेने चालून आला.

खेम सावंत यांनी पुढे येत या बैलाचा प्रतिकार केला. या पाहुणीने बांद्यातील सरदाराला खेम सावंत यांना जहागिरी स्वरूपात बक्षीस देण्यास सांगितले. याचा वरदे यांनी पाठपुरावा करून खेम सावंत यांना देशमुखीची सनद मिळवून देण्यात सहकार्य केले. 
दुसऱ्या एका संदर्भानुसार, त्या काळात कुडाळदेशस्थ प्रभू यांनी प्रत्येक तर्फेवर (विभाग) नाईक म्हणून अंमलदार नेमले होते. माणगाव तर्फेची नाईकी खेम सावंत यांच्याकडे होती. वसुली करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असायची. हा कर वसुल करून तो कुडाळ प्रांतात पाठवायचा अशी व्यवस्था होती. ठराविक काळानंतर खेम सावंत यांनी कुडाळला वसुली पाठवणे बंद केले.

इतकेच नाही तर इतर नाईकांकडून ते वसुली करू लागले. त्या काळात हा एकप्रकारचा बंड होता. विजापुरच्या बादशहाचा ह्यामदराजा नावाचा एक सरदार याच काळात पारपोली घाटातून जात होता. खेम सावंत यांनी त्याच्यावर हल्ला करून पराभव केला. हा सरदार खेम सावंत यांच्या हाती सापडला. सोबत असलेल्यांनी त्याला ठार करावे असे मत मांडले; मात्र खेम सावंत यांनी त्याला जीवदान दिले. पुढे या सरदाराने विजापुरात जावून त्यांच्या पराक्रमाची आणि दिलदार स्वभावाची बादशहाकडे तारीफ केली. यामुळे खुश होवून बादशहाने खेम सावंत यांना देशमुखीची सनद दिली. 1627 च्या दरम्यान ही सनद देण्यात आली. खेम सावंत यांनी आपले ठाणे ओटवणे येथे वसवले. 

चौदा वर्षे देशमुखीचे काम 
खेम सावंत यांनी चौदा वर्षे देशमुखीचे काम केले. याच काळात उत्तरेकडून तीन तेजस्वी साधू या प्रांतात आले. यातील दामोदर भारती हे आताच्या सावंतवाडी जवळ असलेल्या चराठे या गावात थांबले. दुसरे गिरी पंथाचे गोसावी हे मातोंड (ता. वेंगुर्ले) येथील गोडे कोंड येथे आणि तिसरे परशुराम भारती हे तळवणे येथे गेले. यातील परशुराम भारती हे खेमसावंत यांचे गुरू. त्यांच्याकडून त्यांनी योगाभ्यासाची माहिती करून घेतली. खेम सावंत तासनतास समाधी लावून बसायचे. एकदा ते असेच दीर्घकाळ समाधिस्थ होते. त्यांचे देहावसन झाले, असे लोकांना वाटले. त्यांनी अंत्यविधीची तयारी सुरू केली. योग बलाने हा प्रकार तळवणेत असलेल्या परशुराम भारती यांना समजला. खेम सावंत यांची समाधी उतरवण्यासाठी ते तेरेखोल नदीतून ओटवणेकडे यायला निघाले; मात्र त्या आधीच खेम सावंत यांचा अंत्यविधी झाला होता. 1640च्या दरम्यानची ही घटना आहे. परशुराम भारती बांद्याजवळ आले असता अंत्यविधीवेळी काढलेले बंदूकीचे बार त्यांच्या कानी आले. निराश होवून ते तेथूनच तळवणेत परतले. त्यांनीही तळवणेत समाधी घेतली. आजही तेथे भंडारा उत्सव साजरा केला जातो. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.