सावंतवाडी : आंबोली घाटामध्ये दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता चार ते पाच ठिकाणी जाळी बसविण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाने हाती घेतले होते; मात्र वन विभागाच्या आवश्यक परवानगीअभावी ते रखडले. मुळात परवानगीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने चालढकलपणा केल्यानेच हे काम होऊ शकले नाही, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे. या दोन विभागांच्या टोलवाटोलवीचा परिणाम आंबोली घाटाच्या सुरक्षेवर होत आहे.
आंबोली घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार लक्षात घेता सुरक्षिततेचा भाग म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोसळणाऱ्या दरडीच्या ठिकाणी जाळी बसविण्याचे काम हाती घेतले होते. मात्र त्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक होती. कारण हे क्षेत्र वनाच्या कार्यक्षेत्रात आहे. परवानगीसाठीचा प्रयत्नही महामार्ग विभागाकडून झाला होता; मात्र आंबोली घाटातील वन विभागाचा भाग हा ‘कन्व्हेन्शन रिझर्व्ह फॉरेस्ट’मध्ये येत असल्याने जाळी बसविण्यासाठी नागपूर कार्यालयाकडून यासाठी परवानगी घेणे आवश्यक असते. ती न घेताच महामार्ग विभागाने या कामासाठी सिंधुदुर्ग वन विभागाकडे प्रस्ताव केला होता. सुरवातीला वन विभागाने काही अटी-शर्ती घालून परवानगी दिली होती; मात्र ती पुन्हा रद्द करून नागपूर वन विभागाच्या परवानगीशिवाय काम करू नका, असे स्पष्ट कळविले होते. महामार्ग विभागाने सुरवातीपासूनच या प्रक्रियेला फारसे गांभीर्याने न घेतल्याने जाळी बसविण्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही, असे वन विभागाचे म्हणणे आहे.
आंबोली घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात याठिकाणी आवश्यक काळजी घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची कमतरता दिसून येते. महामार्ग विभागाने घाटातील जवळपास तीनशे मीटर भागातील दरडी कोसळण्याच्या ठिकाणी जाळी बसविण्यासाठी प्रयत्न केले होते. वन विभागाने परवानगी नाकारल्यानंतर यासंदर्भात प्रांत कार्यालयातही बैठक झाली होती; मात्र वन विभागाने स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. त्यामुळे ते काम होऊ शकले नाही. आता पावसाळा सुरू झाल्याने हे काम होणे अशक्यच आहे. सिंधुदुर्ग वन विभागातील वरिष्ठ अधिकारी नुकतेच निवृत्त झाले आहेत. यामुळे जबाबदार अधिकारी या नात्याने आंबोली घाटातील जाळी बसविण्याच्या परवानगीबाबत वन विभागाची बाजू देणारे सक्षम अधिकारी उपलब्ध झाले नाहीत. याबाबत आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके-कांबळे यांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
आंबोली घाटात पावसाळ्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना आखल्या होत्या; मात्र सुरुवातीला सिंधुदुर्ग वन विभागाने परवानगी दिली होती. त्यानुसार आम्ही काम सुरू केले होते; मात्र ती परवानगी नाकारल्याने काम थांबविले. आता नव्याने नागपूर कार्यालयाकडून परवानगी घेऊन काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
- पी. जी. बारटक्के,उपअभियंता, कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग उपविभाग-२
पर्यटनावर प्रभाव
थंड हवेचे ठिकाण प्रतिमहाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोलीची ओळख अलीकडच्या काळात संवेदनशील दरडींमुळे अडचणीत आली आहे. वर्षा पर्यटनाचे महत्त्वाचे ठिकाण असलेला धबधबा घाटातच आहे. वर्षा पर्यटन हा येथील महत्त्वाचा पर्यटन हंगाम असतो. दरडी कोसळण्याच्या भीतीचा प्रभाव या हंगामावर होत आहे. आता खबरदारी म्हणून राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतलेले पाऊल वन विभागाच्या लाल फितीत अडकल्याने यावर्षी दरडीची भीती कायम राहणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही या घाटाची सुरक्षा महत्त्वाची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.