सावंतवाडी : ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’, अशी परिस्थिती असलेल्या सावंतवाडी शहराला २४ तास पाणीपुरवठा करणाऱ्या ४८ कोटी रुपये योजनेचे आमिष दाखवण्यात येत आहे; परंतु येथील राजकीय नेत्यांच्या अनास्थेमुळे तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर गेली चार वर्षे उलटूनही या योजनेची प्रतीक्षा सावंतवाडीकरांना करावी लागत आहे. ही योजना निधीअभावी रेंगाळली असून प्रत्यक्षात कधी पूर्ण होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सावंतवाडी शहराला कित्येक वर्षे पाणीप्रश्न भेडसावत आहे. एकीकडे स्वतःच्या मालकीचे धरण, संस्थानकालीन केसरी नळपाणी योजना व नरेंद्र डोंगरावर राबविलेली योजना असे पाण्याचे स्रोत उपलब्ध आहेत, तरीही सावंतवाडीकरांना पाण्यासाठी झगडावे लागत आहे. शहरातील बऱ्याच भागांमध्ये भौगोलिक रचना लक्षात घेता कमी दाबाचा पाणीपुरवठा होणे तसेच एप्रिल-मेमध्ये पाणीटंचाई असणे असे प्रकार उद्भवतात.
एकूणच या सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी २०१८ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पाळणेकोंड धरणावर अद्ययावत ४८ कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्याचा निर्णय झाला. राज्य नगोत्थान योजनेतून ही योजना बसविण्यात आली. साळगावकरांच्या कार्यकाळात या योजनेचा डीपीआर पूर्ण करून ४४ लाख रुपये तांत्रिक मंजुरीसाठी शासनाकडे दिले होते.
एकूणच तांत्रिक मंजुरी मिळूनही त्याकाळी ही योजना पुढे सरकली नाही. नगराध्यक्ष म्हणून साळगावकरांनी आपल्या स्तरावर सक्षम पाठपुरावा केला; मात्र राज्यकर्त्यांची हवी असलेली साथ त्यांना मिळाली नाही. दरम्यानच्या काळात झालेल्या राजकीय बदलानंतर साळगावकरांनी अचानक नगराध्यक्षपदाचा राजीनामा देत विधानसभा निवडणूक लढवली. त्यानंतर मुक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक होऊन नगराध्यक्षपदी संजू परब विराजमान झाले. नगराध्यक्ष या नात्याने शहराच्या पाणीप्रश्नावर काम करताना या योजनेसाठी परब यांनी पाठपुरावा सुरू केला.
यासाठी मुंबई वारीही केली; मात्र त्यांच्या कार्यकाळामध्ये कोरोनाच्या संकटाने डोके वर काढल्याने त्यांना यावर काम करत असताना अनेक अडचणी आल्या. किंबहुना दोन वर्षे कोरोना काळातच गेल्याने त्यांनाही हवे तसे काम करता आले नाही. सद्यस्थितीत पालिकेवर प्रशासक असून त्यामुळे हे काम पूर्णपणे रेंगाळले आहे. एकूणच यासाठी लवकरच निवडणूक होऊन पालिकेवर नवीन बॉडी नियुक्त होणे गरजेचे आहे.
या योजनेचा विचार करता सावंतवाडी शहरामध्ये चार ठिकाणी हायटेक टाक्या उभारण्यात येणार आहेत. झिरंग, गरड, बाहेरचावाडा व शिल्पग्राम या भागात टाक्या उभारण्यात येणार आहे. शिवाय पाळणेकोंड धरणावरून शहरात आलेली संपूर्ण पाईपलाईन बदलण्यात येणार आहे. धरण परिसरात असलेला जलशुद्धीकरण प्रकल्पही अद्यावतरित्या उभारण्यात येणार आहे. एकूणच या योजनेतून शहराला निश्चितच चांगल्या प्रकारे पाणीपुरवठा होणार आहे. सद्यस्थितीत असलेली पाईपलाईन जीर्ण झाल्याने वेळोवेळी ती फुटते. पाळणेकोंड धरण कुणकेरी गावात असल्याने ही पाईपलाईन काही अंशी वन विभागाच्या भागात येते. त्यामुळे जंगली प्राण्यांकडूनही पाईपलाईनची नासधूस होते. परिणामी नागरिकांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे ही योजना सावंतवाडीकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
सावंतवाडीचे पालिकेचे नगराध्यक्षपद भूषविलेले दीपक केसरकर आज राज्याच्या राजकारणात कॅबिनेट मंत्री आहेत. शिवाय मुख्यमंत्री शिंदे यांचेही निकटवर्ती आहेत. केसरकर यांना शहरवासीयांनी प्रत्येक निवडणुकीत भरभरून प्रेम दिले आहेत. त्यामुळे त्यांनी ४८ कोटीच्या या नळपाणी योजनेसाठी आवश्यक असलेला निधी मंजूर करून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुळात पालकमंत्री असतानाही केसरकर यांच्याकडे अर्थखाते होते. त्यावेळी ते आवश्यक निधी देऊ शकले असते; परंतु घोड कुठे अडले, असा प्रश्न जनतेला पडला आहे. या योजनेसाठी तातडीने निधी मंजूर होऊन ती मार्गी लागावी, अशी अपेक्षा शहवासीयांतून होत आहे.
शहरातील पाणीप्रश्नावर एकमेव उपाय म्हणजे ४८ कोटींची नळपाणी योजना मार्गी लागणे. केवळ त्या काळातील नेत्यांमुळे ही योजना रखडली गेली. आता योजनेसाठी प्रसंगी मोर्चा काढू. लवकरच प्रांताधिकाऱ्यांचे लक्ष वेधू.
- बबन साळगावकर, माजी नगराध्यक्ष
राज्यात आता शिंदे-फडणवीस हे कार्यक्षम सरकार आले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष बसल्यानंतर हे काम तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न असेल.
- बंटी पुरोहित, युवा मोर्चा जिल्हाचिटणीस, भाजप
या योजनेसाठी आवश्यक सर्व गोष्टी पूर्ण करण्यात आल्या आहेत. केवळ आवश्यक असलेला निधी उपलब्ध होताच हे काम हाती घेतले जाईल. नवीन शासनाकडून निधीची अपेक्षा आहे.
- भाऊ भिसे, पाणीपुरवठा अधिकारी, सावंतवाडी पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.