सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शासकीय कामकाजासाठी ओरोस येथे जात असताना येथील नगराध्यक्ष संजू परब यांच्या शासकीय गाडीला पाठीमागून येणाऱ्या मोटारीची धडक बसून अपघात झाला. ही घटना मुंबई-गोवा चौपदरीकरण मार्गावर मळगाव स्वामी धाबा सर्कल येथे दुपारी 3च्या सुमारास घडली. नगराध्यक्ष संजू परब व त्यांचे सहकारी यातून बचावले; मात्र मागे असलेल्या मोटारीतील कळणे (ता. दोडामार्ग) येथील शिवसेनेच्या संजय गवस यांच्या पायाला दुखापत झाली. या अपघाताची पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
श्री. परब व त्यांचे सहकारी काही कामानिमित्त ओरोस येथे जात होते. याचवेळी आपल्या एका खासगी कामासाठी आणि आमदार वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे दोडामार्गमधील मिलिंद नाईक, संजय गवस सहकारी कुडाळ येथे जात होते. परब यांच्या मोटारी मागोमाग त्यांची मोटार होती. यावेळी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या एका दुकानात जाण्यासाठी संजू परब यांच्या मोटारीतील चालकाने अचानक डीवाईडरच्या बाजूला घेतली. यामुळे मागे असलेल्या मोटारीची नगराध्यक्ष परब यांच्या मोटारीला जोरदार धडक बसली. त्यामध्ये पालिकेच्या शासकीय मोटारीचे मोठे नुकसान झाले; मात्र परब यांच्या मोटारीतील कोणालाही दुखापत झाली नाही. मागच्या मोटारीत असलेले संजय गवस यांच्या पायाला दुखापत झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच बीट अंमलदार शरद लवकरे व सहकारी पोलिस घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. यावेळी घटनास्थळी नेमळे सरपंच विनोद राऊळ, मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, दिपक जोशी, जितेंद्र गावकर आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत. शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी धाव घेत दोडामार्गमधील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची तसेच भाजपचे नगराध्यक्ष परब व त्यांच्या सहकाऱ्यांचीही चौकशी केली. याबाबत येथील पोलिस ठाण्यात अपघाताची फिर्याद मिलिंद नाईक कळणे दोडामार्ग यांनी दिली असून या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे, अशी माहिती बीटअंमलदार शरद लोहकरे यांनी दिली.
ओरोस येथे शासकीय कामकाजासाठी जात असताना मोटारीला अपघात झाला. यात चालकाला किरकोळ दुखापत झाली; मात्र जनतेच्या आशीर्वादामुळे सुखरूप बचावलो.
संजू परब, नगराध्यक्ष, सावंतवाडी
संपादन - राहुल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.