सावंतवाडी नगराध्यक्षांनीच ठोकले रुग्णालयाला टाळे 

Sawantwadi mayor closes hospital
Sawantwadi mayor closes hospital
Updated on

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील पालिकेच्या भगवान महावीर आयुर्वेदिक व टीबी दवाखान्याला आज खुद्द नगराध्यक्ष संजू परब यांनी टाळे ठोकले. कार्यालयीन वेळेत त्याठिकाणी नियुक्त डॉक्‍टर उपस्थित नसल्याने व दवाखान्याच्या बाहेर खेडेगावातील वृद्ध रुग्णांची होत असलेली परवड लक्षात घेत त्यांनी हा पवित्रा घेतला. त्यानंतर तब्बल दोन तासानंतर दवाखाना पुन्हा सुरू करण्यात आला. 

येथील पालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहाबाहेर पालिकेच्या माध्यमातून भगवान महावीर आयुर्वेदिक व टीबी दवाखाना सुरू आहे. या दवाखान्यामध्ये दोन कर्मचारी व डॉ. उमेश मसुरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. कार्यालयीन वेळेनुसार सकाळी साडेनऊ ते दुपारी एक व दुपारी दोन ते सायंकाळी पावणेसहा असा दवाखाना सुरू असतो; मात्र गेले कित्येक दिवस दवाखान्यातील डॉ. उमेश मसुरकर यांच्याबाबत नागरिकांच्या तक्रारी नगराध्यक्ष संजु परब यांच्याकडे आल्या होत्या. डॉ. मसुरकर हे कार्यालयीन वेळेनुसार दवाखान्यामध्ये हजर नसतात. त्यामुळे रुग्णांची परवड होत असल्याच्या तक्रारी होत्या. पालिकेच्या दवाखान्यात दर दिवशी ग्रामीण भागातील रुग्णांसह शहरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येत असतात. त्यामुळे नेहमी डॉक्‍टरांच्या उशिरा येणारा त्रास त्यांना सहन करावा लागत असे. 

आज सकाळी साडेनऊ वाजता बॅ. नाथ पै सभागृहामध्ये भाजपच्या शहर मंडलाचा प्रशिक्षण कार्यक्रम होता. यासाठी त्याठिकाणी नगराध्यक्ष हजर होते. त्यांनी कार्यक्रम सुरू होण्याआधी दवाखान्याला भेट देत पाहणी केली. या पाहणीमध्ये नागरिकांच्या तक्रारीप्रमाणे डॉक्‍टर वेळेत दवाखान्यात हजर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बाहेर रुग्ण ताटकळत असतानाही डॉक्‍टर वेळेत हजर नसल्याने नगराध्यक्ष परब यांचा पारा चढला. त्यांनी थेट दवाखान्याला टाळे ठोकत त्याची चावी थेट मुख्याधिकाऱ्यांकडे नेऊन दिली. यामुळे काही काळ वातावरण तंग झाले. उपचारासाठी आलेले रुग्ण लक्षात घेता तब्बल दोन तासानंतर दवाखाना पुन्हा उघडण्यात आला. 

यावर नगराध्यक्ष श्री. परब म्हणाले, ""डॉ. मसुरकर यांच्याबाबत नागरिकांच्या तक्रारी होत्या. आज त्याबाबत सत्यच समोर आले. अजूनही डॉक्‍टरांबद्दल अनेक तक्रारी असून याबाबत जातीनिशी लक्ष घालणार आहे. खेडेगावातून येणाऱ्या व शहरातील रुग्णांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी यापुढे कौन्सिल बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार आहे.'' नगराध्यक्ष परब यांच्या भूमिकेबाबत शहरात जोरदार चर्चा सुरू होती. 

डॉक्‍टरचा थम शिपायाकडून 
नगराध्यक्ष परब यांनी डॉ. उमेश मसुरकर यांच्यावर आरोप करताना कोरोना काळाच्या आधी डॉक्‍टरचा थम खुद्द शिपायाकडून लावण्यात येत होता. यासाठी वेगळी सिस्टीम करण्यात आली होती, याबाबत आपणाकडे तक्रारी होत्या. याचीही आपण खात्री करणार आहे, असेही श्री. परब म्हणाले. 

सकाळी साडेनऊ वाजता दवाखाना उघडल्यानंतर आदल्या दिवशी झालेल्या केस पेपरचे चलन करून ते पालिकेत भरावे लागते. या काळात काही रुग्णांचे नातेवाईक केस पेपर काढून निघून जातात किंवा काही केस पेपर काढून बसतात. रोज साडेदहा वाजता रुग्णालयात येतो. रुग्णालय बंद करुन निघत असतानाही रुग्ण आला तरी त्याला सेवा देतो. यावेळी कुठलीही कार्यालयीन वेळ पाहत नाही. 
- डॉ. उमेश मसूरकर  

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.