कुडाळ : वेतोरेत भरते गणिताची जत्रा

शाळेचा वेगळा प्रयोग ः भारत विज्ञानमध्येही उपक्रमाची दखल
school experiment Math Fair activities intellectual ability kudal
school experiment Math Fair activities intellectual ability kudalsakal
Updated on

कुडाळ : गणित जत्रेच्या निर्मितीतून विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेला आणि बौद्धिक क्षमतेला चालना देणारा अनोखा गणित जत्रा उपक्रम श्री देवी सातेरी (कै.) सौ. गुलाबलाई दीनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय, वेतोरेच्या मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर राबवित आहेत. नेहरू विज्ञान केंद्र, वरळी-मुंबई येथे झालेल्या पश्चिम भारत विज्ञान जत्रेमध्ये राज्याचे नेतृत्व करीत गोवा, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली या आठ राज्यांसमवेत त्यांनी मांडलेली गणित प्रयोगशाळा ‘खुल-जा-सिम-सिम’ ही प्रतिकृती प्रथम क्रमांकाची मानकरीही ठरली.

याबाबत बोलताना सौ. वालावलकर म्हणाल्या, ‘‘भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८० ला इरोड या गावी त्यांच्या आजोळी झाला. म्हणून २२ डिसेंबर हा दिवस ''गणित दिन'' म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. २०१२ हे वर्ष (त्यांची १२५ वी जयंती) भारत सरकारने गणित वर्ष म्हणून साजरे करावयाचे निश्चित केले. त्या वर्षापासून आजतागायत श्री देवी सातेरी हायस्कुल वेतोरे (ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) या प्रशालेच्या प्रवेशव्दारापाशी दरवर्षी एका नाविन्यपूर्ण गणित जत्रेची निर्मिती केली जाते. बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित हा विषय कठिण वाटतो आणि त्यामुळे साहजिकच त्या विषयाकडे दुर्लक्ष होते. पर्यायाने गणित विषयात उत्तीर्ण होणे त्यांना अवघड जाते. गणितात रंजकता आणण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेला आणि बौध्दिक क्षमतेला चालना देण्यासाठी, गणित हा विषय कठिण नसून प्रयत्नसाध्य आहे, हे पटवून देण्यासाठी कृती, उपक्रम आणि प्रयोग यांचा वापर करायला हवा.

हा दृष्टीकोन समोर ठेवून २२ डिसेंबर २०२१ ला पाचवी ते बारावीपर्यंतच्या विविध अध्ययन-अध्यापन अनुभूती देण्याच्या एकुण १३४ गणिती खेळांची निर्मिती या गणित जत्रेत केली गेली. जत्रेच्या निर्मितीतून साध्या, सोप्या भाषेत गणित समजावून देण्याचा व घेण्याचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम दरवर्षी २२ डिसेंबरला घेतला जातो. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या दरम्यान सुसंवाद साधावा, अध्ययन करताना विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे आणि यामुळेच शिक्षण प्रक्रिया अर्थपूर्ण व आशयुक्त व्हावी, यासाठी दरवर्षी हा उपक्रम प्रशालेत राबविला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या पध्दतीने गणिताची ओळख होते. गणित व संख्याशास्त्र या विषयाअंतर्गत ८० गुणांची लेखी परीक्षा व २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा याप्रमाणे अकरावी व बारावीसाठी गुणदान पध्दती शासनाने ठरवून दिली आहे. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी २० गुण असल्याने विद्यार्थ्यांना कृतीव्दारे प्रात्यक्षिक करून त्याचा अनुभव घेता यावा, हा दृष्टीकोन समोर ठेवून गणितातील विविध खेळांची निर्मिती केली."

त्या म्हणाल्या, "सुरुवातीला गणितातील प्रत्येक संकल्पना विचारात घेऊन त्यावर कृतीयुक्त माहिती जमविण्यास सुरुवात केली. यामध्ये विद्यार्थ्यांचा सुध्दा प्रत्यक्ष सहभाग घेतला. गणिती खेळांची निर्मिती करताना विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला वाव मिळावा, यासाठी विद्यार्थ्यांनाच आपल्या कल्पनेतून शक्य होतील, तशा गणितीय प्रतिवृत्तींबद्दल माहिती तयार करण्यास सांगितली. विद्यार्थ्यांनी आपल्या परीने साहित्य निर्माण करण्यास सुरुवात केली. गरज पडेल तिथे त्यांना मार्गदर्शन करत नवनवीन साहित्याची निर्मिती केली. गणित जत्रेत फक्त प्रतिकृती न बनविता त्यावर आधारित ''टिकर्टेक मल्टिप्लायर'' आहे; परंतु काळाच्या ओघात कुठेतरी त्याबद्दलची माहिती व त्याचा वापर कमी होत गेलेला दिसतो; परंतु नेहमीच्या वापरातील पध्दतीपेक्षा वैदिक गणितातील पध्दतींनी अगदी कमी वेळेत आणि अचूकपणे आकडेमोड करता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याची माहिती मिळावी, यासाठी वैदिक गणितातील पध्दती व त्यावर आधारित ट्युटोरिअलदेखील तयार केली."

त्या म्हणाल्या, "तक्ते व बोर्डच्या साहाय्याने गणितातल्या काही रंजक गोष्टी तयार केल्या आहेत. काही कोडी, कूटप्रश्न, चारोळ्या, कविता यांच्या माध्यमातून गणितातील बऱ्याच संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. यात खास म्हणजे उखाणे. ज्याचा वापर करून बरीच सूत्रे लक्षात ठेवता येतात. एकक, दशक, शतकपासुन परिमित, दशपरिमित, अनंत, दशअनंतपर्यंतच्या संख्यांचे वाचन, ''रामानुजन मॅजिक स्क्वेअर''सारख्या बाबींची सखोल माहिती या जत्रेतून मिळते. नेहरू विज्ञान केंद्र, वरळी-मुंबई येथे झालेल्या पश्चिम भारत विज्ञान जत्रेमध्ये महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करीत गोवा, गुजरात, छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, दीव-दमण आणि दादरा-नगर हवेली या आठ राज्यांसमवेत आम्ही मांडलेली गणित प्रयोगशाळा खुल-जा-सिम-सिम ही प्रतिकृती प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली."

गणित हा विषय जरी क्लिष्ट असला तरी गणित जत्रेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आकर्षण वाटेल, गणितात गोडी, रस निर्माण होईल, गणिताची भीती वाटणारे व गणिताकडे वळू पाहणाऱ्यांना गणित हा विषय निश्चितच आवडू लागेल, याची मला खात्री आहे. गणित विषयात रूची निर्माण करण्याचा उदात्त हेतू या नावीन्यपूर्ण गणित जत्रेच्या माध्यमातून सफल झाला.’’

- स्वाती वालावलकर, मुख्याध्यापिका, श्री देवी सातेरी महाविद्यालय, वेतोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.