वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - देशातील विविध निवडणुकांमध्ये भाजपची घसरगुंडी होत असताना जिल्ह्यात मात्र स्वाभिमानच्या विलीनीकरणानंतर भाजपला "अच्छे दिन' दिसत आहेत. शिवसेनेला एका पाठोपाठ एक पराभवाचे धक्के देण्यास त्यांनी सुरवात केली आहे. शिवसेना पक्षांतर्गंत असलेली गटबाजी, संघटितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची नसलेली तयारी आणि शहकाटशहाचे राजकारण यामुळे भाजपला चांगलीच संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेनेवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.
हेही वाचा - लयभारी ! महिला बचत गटांनी फुलवली 15 एकर शेती
कोकण म्हणजे शिवसेना, असे काहीसे चित्र काही कालावधीचा अपवाद वगळता जिल्ह्यात पाहायला मिळाले. नारायण राणेंनी शिवसेनेला "जय महाराष्ट्र' केल्यानंतर काही वर्षे सिंधुदुर्गावर राणेंचा स्वतंत्र प्रभाव राहिला. स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्वच सत्ताकेंद्रे राणेंच्या ताब्यात होती; परंतु 2014 मध्ये कुडाळ-मालवणमध्ये शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला तर दुसरीकडे सावंतवाडीतून शिवसेनेचे दीपक केसरकर मोठ्या मताधिक्याने निवडुन आले. त्यामुळे जिल्ह्यात नऊ-दहा वर्षानंतर पुन्हा शिवसेना पाळेमुळे रोवू लागली. जिल्ह्यात अस्तित्वहीन असलेल्या शिवसेनेत पुन्हा जोश निर्माण झाला. त्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये राणे विरूद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळाले. काही निवडणुका राणेंनी जिंकल्या तर काही शिवसेनेने; परंतु कुणालाही जिल्ह्यात एकतर्फी प्राबल्य मिळविता येत नव्हते. विधानसभा निवडणुकीपुर्वी खासदार राणेंनी स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला. त्यामुळे भाजपची ताकद कित्येक पटीने वाढली. निवडणुक निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. या सत्तेच्या राजकारणात शिवसेना भाजपची अनेक वर्षांची युती संपुष्टात आली.
हेही वाचा - पर्यटनस्थळांवर अभ्यागत कराबाबत का आहे उदासीनता ?
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने कुडाळ आणि सावंतवाडी हे दोन्ही मतदारसंघ राखण्यात यश मिळविले. आयत्यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यानी सावंतवाडीत आमदार केसरकर आणि कुडाळमध्ये आमदार नाईक यांना पळताभुई थोडी केली. शिवसेनेचे हे दोन्ही उमेदवार काठावर पास झाले. काही महिने अगोदर राणेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला असता किंवा उमेदवारांनी भाजपच्या कमळ निशाणीवर निवडणुक लढविली असती तर कदाचित ही लढाई खूप जवळ आली असती, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडुन संघटनात्मक कामांकडे झालेल्या दुर्लक्षांची फलश्रुती निवडणुक निकालातुन दिसुन येत आहे. शिवसेनेच्या नेत्यांमध्ये असलेली गटबाजी आणि त्यामुळे संघटितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची नसलेली प्रमुख पदाधिकाऱ्यांची मानसिकता यामुळे लागोपाठ शिवसेनेला पराभवाला सामोरे लागत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेकडे अजुनही कार्यकर्त्याची म्हणावी तशी फळी नाही. प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्याने कार्यकर्त्यामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्याचा परिणाम देखील निवडणुकीच्या अपयशात होत आहे. निवडणुक प्रचार यंत्रणा राबविताना शिवसेना पुरे पडत नाही हे वास्तव आहे. शिवसेनेतर्गंत गटबाजीचा भाजपला मात्र फायदा होत आहे. जिल्हा शत प्रतिशत करण्याचे भाजपाचे स्वप्न आहे. हे स्वप्न पुर्ण करण्याच्या दृष्टीने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. एकुणच भाजपची वाटचाल शिवसेना जिल्हामुक्त करण्याकडे सुरू आहे.
जिल्ह्यात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. प्रमुख पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांकडुन संघटनाबांधणी दुर्लक्ष होत असल्यामुळे कार्यकर्ते संघटनेपासुन दुरावले जात आहेत. जिल्ह्यात इतक्या घडामोडी घडत असताना पक्षश्रेष्ठी देखील त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये नाराजी आहे. शाखा पातळीपर्यंत संघटना बांधणी ही शिवसेनेची ताकद असते; पण गेला काही काळ जिल्ह्यापासून शाखेपर्यंत यंत्रणा ढिसाळ झाल्याचे, काही ठिकाणी नाममात्र पदाधिकारी असल्याचे चित्र आहे. निवडणुकीत मते कमी झाली किंवा वाढली तर त्याचा आढावा घेण्याची पद्धतही कुठेतही लुप्त झाल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात तीन-चार पोटनिवडणुका झाल्या. यामध्ये श्री. केसरकर यांच्या मतदारसंघातील बांदा ग्रामपंचायत, सावंतवाडी नगरपालिका पोटनिवडणूक, आंबेगाव ग्रामपंचायत पोटनिवडणूक आणि आमदार नाईक यांच्या मतदारसंघातील आंब्रड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा समावेश आहे. यातील आंबेगाव ग्रामपंचायत पोटनिवडणूक वगळता इतरत्र भाजपने शिवसेनेला चारीमुंड्या चित केले. अगदी दीपक केसरकरांचा प्रभाव असलेली सावंतवाडी नगरपालिका भाजपने हिसकावुन घेत केसरकरांना मोठा धक्का दिला. जिल्ह्यातील या निवडणुका शिवसेनेसाठी धोक्याची घंटा तर भाजपची शतप्रतिशतच्या दिशेने वाटचाल असल्याचे मानले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.