साडेआठ महिन्यांनंतर राजपरिवार परतला मायदेशी

राणीसाहेबांची प्रकृती सुधारण्यासाठी त्यांना हवापालटाची गरज भासू लागली. यामुळे महाराजांनी व्हिएन्ना येथील मुक्काम हलवला.
Rajkumari Hemlataraje
Rajkumari Hemlatarajesakal
Updated on
Summary

राणीसाहेबांची प्रकृती सुधारण्यासाठी त्यांना हवापालटाची गरज भासू लागली. यामुळे महाराजांनी व्हिएन्ना येथील मुक्काम हलवला.

राणीसाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी राजपरिवार प्रथम फ्रान्समध्ये व नंतर लंडनमध्ये मुक्कामाला गेला. हळूहळू राणीसाहेबांचे आरोग्य सुधारत गेले. यानंतर मायदेशी परतण्याची तयारी सुरू झाली. जवळपास साडेआठ महिन्यांनंतर बापूसाहेब महाराज कुटुंबासह भारतात परतले. त्यांचे प्रजेने मोठ्या आपुलकीने स्वागत केले.

राणीसाहेबांची प्रकृती सुधारण्यासाठी त्यांना हवापालटाची गरज भासू लागली. यामुळे महाराजांनी व्हिएन्ना येथील मुक्काम हलवला. आपल्याकडे उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची पद्धत आहे. युरोपात नेमकी उलटी स्थिती असते. थंडी वाढू लागताच समुद्र किनारी जाण्याची प्रथा तेथे आहे. तेथील उबदार वातावरण आरोग्यालाही चांगले असल्याचे मानले जाते. याचमुळे राणीसाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अशा किनारी भागात जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. तो मानून महाराज कुटुंबासह ८ मार्च १९३६ ला दक्षिण फ्रान्समध्ये कॅन या शहरात राहायला गेले.

कॅन हे पर्यटनस्थळ होते. तेथील समुद्र किनाऱ्याजवळच्या एका हॉटेलमध्ये हे कुटुंब उतरले. २ एप्रिलपर्यंत म्हणजे, जवळपास सव्वा महिना त्यांचा तेथे मुक्काम होता. तेथे फ्रेंच भाषा बोलली जायची. इंग्रजीचा वापर फारच मर्यादित होता. याच काळात युवराज शिवरामराजे व राजकुमारी हेमलताराजे यांना फ्रेंच भाषेची तोंडओळख झाली. ही हवा सगळ्यांना मानवली; मात्र राणीसाहेबांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. यामुळे कॅनमधील मुक्काम हलवण्याचा निर्णय महाराजांनी घेतला. लंडनमध्ये जायचे ठरले. बापूसाहेब मोटारीने लंडनला जायला निघाले. पॅरिसमार्गे ३ एप्रिलला ते इंग्लंडमध्ये पोहोचले. इतर मंडळी ३ एप्रिलला कॅनहून निघून दुसऱ्या दिवशी लंडनला पोहोचली. तेथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ग्रोव्हनर हाऊस या हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम होता. लंडनला महाराज, युवराज आणि राजकन्या या आँट बेटी यांना भेटायला गेले. नंतर लॉर्ड लॅमिंग्टन, सर पेट्रिक कॅडेल या परिचितांची महाराजांनी भेट घेतली.

सगळ्या धावपळीत महाराजांची प्रकृती अचानक बिघडली. चार दिवस ते हॉटेलमध्येच पडून होते. नंतर त्यांना बरे वाटले. ते राहत असलेले हॉटेल मध्यवस्तीत होते; मात्र मोकळी हवा मिळणे अवघड होते. त्यामुळे लंडनपासून ४० मैलावर असलेल्या सेल्सडन पार्क या हॉटेलमध्ये राजकुटुंबाचा मुक्काम हलवला. भारतात परतेपर्यंत त्यांचा मुक्काम तेथेच होता. या दरम्यान एक दिवस महाराज युवराजांना घेऊन ऑक्सफर्ड विद्यापीठात गेले. तेथील आपल्या जुन्या शिक्षकांना भेटले. वर्गमित्रांचीही भेट घेतली. २३ एप्रिलला बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन महाराजांनी नवे बादशहा आठवे एडवर्ड यांची भेट घेतली. महाराजांना या आधी जाहीर ‘केसीएसआय’ या सन्मानाचे स्टार या भेटीत बादशहांनी स्वहस्ते बहाल केले. लंडनमध्ये असतानाचे पालक असलेले रे. कॅ. होम्स यांच्याकडे जाऊन महाराज दोन दिवस राहिले. याच दरम्यान भारतीय क्रिकेटपटूंची टीम इंग्लंड दौऱ्यावर आली होती. तेथेही महाराज गेले.

मॅलव्हर्न येथील शाळा आणि कॉलेजच्या जुन्या सोबत्यांसोबत ते एक दिवस राहायला गेले. यावेळी माजी विद्यार्थ्यांचे गॅदरिंगही झाले. यावेळी महाराज युवराजांना मुद्दाम सोबत घेऊन जायचे. एकूणच लंडनमधला मुक्काम भरगच्च कार्यक्रमांचा होता. ४ एप्रिल ते १८ ऑगस्टपर्यंत त्यांचा येथे मुक्काम होता. राणीसाहेबांच्या प्रकृतीतही सुधारणा होत होती. यामुळे मायदेशी परतण्याचे वेध या कुटुंबाला लागले. १८ ऑगस्ट १९३६ ला त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. दोन छोट्या राजकुमारी, गर्व्हनेस आणि काही साहित्य रावळपिंडी बोटीने आधीच रवाना केले. राणीसाहेब, युवराज आदी मंडळी १८ ऑगस्टला दुपारी विमानाने पॅरिसला निघाले. महाराज सायंकाळी सातच्या विमानाने पॅरिसकडे झेपावले. त्या दिवशी रात्रीचा मुक्काम पॅरिसमध्ये होता. सर्वजण २१ ऑगस्टला मार्सेल्स बंदर येथे पोहोचले. त्याठिकाणी रावळपिंडी बोट पोहोचली होती. मग सर्व कुटुंब भारताच्या दिशेने रवाना झाले. ३ सप्टेंबरला ही बोट मुंबई बंदरात पोहोचली. स्वागतासाठी सावंतवाडीकर प्रजाजन, अधिकारी, मुंबईतील संस्थानातील रहिवासी चाकरमानी होते.

सावंतवाडीकरांना आनंदाचे भरते

राणीसाहेबांची प्रकृती आता चांगली होती. त्यामुळे उपस्थितांच्या चेहऱ्यावरही समाधान होते. हे कुटुंब दोन दिवस मुंबईत राहिले. त्यानंतर सावंतवाडीकडे जायला निघाले. वाटेत खडकी (पुणे) येथे महाराज मिस मॉक्सन यांच्या भेटीसाठी थांबले. पुण्याहून बेळगावला जाताना रायबागेत त्यांचा मुक्काम होता. तेथून ९ सप्टेंबरला सकाळी बेळगाव रेल्वेस्टेशनला ते पोहोचले. तेथेही सावंतवाडीकरांनी स्वागतासाठी गर्दी केली होती. तेथून हे कुटुंब सावंतवाडीकडे निघाले. सावंतवाडीत सायंकाळी पाचच्या सुमारास महाराज पोहोचताच तोफांची सलामी देण्यात आली. जिमखान्यावर नगरपालिकेच्यावतीने त्यांना मानपत्र अर्पण करण्यात आले. तेथून त्यांची मिरवणूक निघाली. जागोजागी स्वागत, ओवाळणी सुरू होती. सावंतवाडीकरांना आनंदाचे भरते आले होते. पूर्ण कुटुंब परदेशाचा दीर्घ दौरा करून राज्यात सुखरूप परतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.