कोकणातील सेनेचा नेता विधानसभेची हॅट्रिक साधणार; राऊतांच सूचक वक्तव्य
शिवसेना व महाविकास आघाडीच्या माध्यमातून अधिकाधिक निधी तालुक्यास उपलब्ध होत आहे.
मालवण : आमदार वैभव नाईक (Vaibhav naik) यांच्या माध्यमातून कुडाळ-मालवण मतदारसंघात जनतेला अपेक्षित असलेली विकासकामे सुरू आहेत. पक्ष नेतृत्वाबरोबर जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेले आमदार अशी ओळख वैभव नाईक यांनी निर्माण केली आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीत ते निश्चितच विधानसभेची हॅट्रिक करतील, असा विश्वास खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान तालुक्यात शिवसेना संघटना अधिक बळकट करण्यात आमदार नाईक यांचे महत्वाचे योगदान आहे. शिवसेना व महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून अधिकाधिक निधी तालुक्यास उपलब्ध होत आहे. किनारपट्टी भागात बंधारे व काही रस्ते हे प्रश्न काही तांत्रीक बाबींमुळे राहिले असतील; मात्र तेही प्रश्न सोडविण्यासाठी आपण स्वतः निश्चितच पाठपुरावा करू अशी ग्वाही राऊत यांनी यावेळी दिली.
तालुका शिवसेना (shivsena) कार्यकारिणीची बैठक खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत आज दैवज्ञ भवन येथे झाली. जिल्ह्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष लक्ष दिले आहे. वैद्यकीय महाविद्यालय, विमानतळ, लवकरच कार्यान्वित होईल. आपत्ती व्यवस्थापनासाठी अधिक निधी उपलब्ध करण्याबाबत मुख्यमंत्री व महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. तौक्ते वादळ काळातील नुकसान भरपाई सर्वाधिक प्राप्त झाली असून नुकसानग्रस्तांना देण्यात आली. सागरी पर्यटनाबरोबर डोंगरी पर्यटनालाही राज्य शासनाच्या माध्यमातून चालना देण्यात येत आहे. सिंधुदुर्गातील बेटांचा विकासही शासनाच्या माध्यमातून केला जाणार आहे असे खासदार राऊत यांनी सांगितले.
यावेळी आमदार वैभव नाईक, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मंदार केणी, नितीन वाळके, मंदार गावडे, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, बंडू चव्हाण, भाऊ परब, समीर लब्दे, राजेश गावकर, किसन मांजरेकर, यशवंत गावकर, किरण वाळके, चंद्रकांत गोलतकर, राजू परब, शीला गिरकर, सेजल परब, अंजना सामंत, राजू नार्वेकर, बाबा सावंत, दीपा शिंदे, विजय पालव, पंकज वर्दम यासह अन्य उपस्थित होते.
सतीश सावंत यांचे काम चांगले
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून नवनवीन योजना आणून त्याचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी व बँकेला यश प्राप्त करून देण्यासासाठी अध्यक्ष सतीश सावंत यांनी सर्वोत्तम काम केले आहे. आगामी जिल्हा बँक निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवली जाईल. जिल्हा बँकेवर शिवसेनेचेच वर्चस्व राहील. याबरोबरच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी शिवसेनेने सुरू केली असून या निवडणुकीतही शिवसेना विजयी होईल असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला.
जन आशीर्वादमधून पैसा येणार नाही
भाजपच्यावतीने जन आशीर्वाद यात्रा काढली जात आहे; मात्र जन आशीर्वाद हे नाव शिवसेनेच्या माध्यमातून सुरू झाले. भाजपाने कोणतीही यात्रा काढली म्हणून त्याचा परिणाम शिवसेनेवर होणार नाही. अथवा गाड्या भरून पैसेही येणार नाही. तळाशीलच्या बंधाऱ्यासाठी जर कोणी दहा कोटी आणतो असे म्हणत असेल तर हा पैसाही राज्य सरकारच्या माध्यमातूनच येईल असाही टोला खासदार राऊत यांनी लगावला. तळाशील बंधाऱ्यासाठी एक कोटी निधीतून तीन टप्प्याचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खासदार राऊतांच्या आम्ही पाठीशी
खासदार विनायक राऊत हे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना गतिमान विकासाचे धोरण अवलंबत आहेत. त्यांच्या पाठीशी जिल्हा शिवसेना ठाम असून हेच खासदार कायमस्वरूपी मिळोत अशा भावना व्यक्त होत आहेत. असे सांगत आमदार नाईक यांनी पक्ष संघटनेच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
चिपी विमानतळ लवकरच सुरू होईल
विमानतळाच्या नादुरुस्त बनलेल्या धावपट्टीचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. केंद्रस्तरीय समितीने केलेल्या पाहणीचा अहवालही परिपूर्ण धावपट्टी असाच आहे. त्यामुळे विमानतळ डिजीसीए चेअरमनची स्वाक्षरी होताच संबंधित एअरलाईन्सला परवाना मिळून चतुर्थीपूर्वी विमानतळ सुरू होण्यास सर्वकाही अनुकूल आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत डिजीसीएची परवानगी मिळताच विमानतळ सुरू होण्यासाठी सज्ज असल्याचे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.