शिवसेनेला एकाकी पाडण्याची खेळी यशस्वी

शिवसेनेला एकाकी पाडण्याची खेळी यशस्वी

Published on

देवरूख - १९९० पासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमेश्‍वर तालुक्‍यात जिल्हा परिषद निवडणुकीत सेनेसमोर भाजपसह आघाडीने कडवे आव्हान उभे केले आहे. हक्‍काचा गड राखण्यासाठी यावेळी शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. यात भर पडली आहे ती अंतर्गत बंडाळीचा सामना करण्याची. उमेदवारांची यादी निश्‍चित करतानाच स्थानिक पातळीवर दमछाक झाल्याने ‘मातोश्री’कडे पाहावे लागले.
१९९० पासून आजपर्यंत केवळ २००६ ते २००९ एवढ्या कालावधीचा अपवाद वगळता संगमेश्‍वर तालुक्‍यात शिवसेनेचा आमदार निवडून येत आहे. १९९२ पासून आजतागायत संगमेश्‍वर तालुका पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे. २००६ ला राणेंच्या काँग्रेस प्रवेशानंतर सेनेला मोठे भगदाड पडले. त्यातून सावरून सेनेने २००७ ला झालेली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जिंकली. तालुक्‍यात व्यक्‍तिकेंद्रित नाही, तर संघटनेच्या जोरावर राजकारण चालते हे सिद्ध केले होते. त्यानंतर २०१० ला सेनेला रवींद्र मानेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाने मोठा धक्‍का बसला. तरीही २०१२ ला पंचायत समिती सेनेने जिंकली. 

या दरम्यान आणि पाठोपाठ २०१४ ला विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेचा आमदार निवडून आला.

तालुक्‍यात राष्ट्रवादीचीही ताकद आहे. त्यानंतर काँग्रेस, भाजप, मनसे असा क्रम लागतो. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रणधुमाळीतही सेनेलाच सर्वाधिक पसंती आहे; मात्र सेनेतंर्गत कुरबुरी आणि भाजपने एकला चलोचा निवडलेला मार्ग यामुळे यावेळी निवडणूक सेनेला सोपी जाणार नाही. दीर्घ काळाच्या चर्चेच्या गुऱ्हाळानंतर आघाडी काल जाहीर झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीने बहुजन विकास आघाडीला सोबत घेतल्याने सेनेला हा मोठा धक्‍का दिला. उत्तर संगमेश्‍वरसह दक्षिण भागातही बविआची ताकद चांगली आहे. याचा फायदा आघाडीला होणार. जागा वाटपातही समाधानकारक तडजोड झाल्यास आघाडी सेनेपुढे कडवे आव्हान उभे करील. भाजपनेही ठिकठिकाणी सेनेच्या गडांना सुरूंग लावले आहेत. या निवडणुकीत बंडाळीचा सर्वाधिक धोका शिवसेनेलाच आहे. त्यामुळे या आधीच्या निवडणुकांपेक्षा सेनेची कसोटी लागणार आहे.

कुणबी फॅक्‍टर महत्त्वाचा
बविआ काँग्रेससोबत गेली. कुणबी सेना भाजपच्या संपर्कात आहे. काही भागात मनसेचाही भाजपला छुपा पाठिंबा राहणार आहे. भाजप कुणबी सेनेची युती झाल्यास ही निवडणूक शिवसेनेला एकाकी पाडणारी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.