लांजा नगरपंचायतीवर 'यांचा' झेंडा

Shivsena Power In Lanja Nagarpanchayat Ratnagiri Marathi News
Shivsena Power In Lanja Nagarpanchayat Ratnagiri Marathi News
Updated on

लांजा ( रत्नागिरी ) - येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेने विरोधकांना चीतपट करत सत्तांतर घडवून आणले. यंदा प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. यात शिवसेनेचे मनोहर बाईत 3546 मतांनी निवडून आले. शिवसेनेचे 9 नगरसेवक निवडून आल्याने नगरपंचायतीत निर्विवाद बहुमत मिळवले आहे. मावळेत नगराध्यक्ष राजू कुरुप यांचा पराभव धक्कादायक मानला जात आहे. 

लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. 9) 73 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर भाजप, शिवसेनेकडून विजयाचे दावे केले जात होते. त्यामुळे येथील निकालाची उत्सुकता होती. आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर दोन अपक्ष आणि दोन कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने शिवसेनेच्या गोटात शांतता पसरली होती. मात्र त्यानंतर झालेल्या मतमोजणीत शिवसेनेने आघाडी घेतल्याने शिवसैनिकांनी जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या लढतीत मनोहर बाईत यांनी  काँग्रेस आघाडीचे राजेश गुरव राणे (2929) यांचा पराभव करून नगराध्यक्षपदाचा मान पटकावला. या निवडणुकीसाठी भाजपचे सुमंत वाघधरे यांना 1087, अपक्ष संपदा वाघधरे यांना 1563 आणि भाजपचे बंडखोर रुपेश गांगण यांना 537 मते मिळाली. 

विजयी उमेदवार असे 

शिवसेनेचे प्रसाद डोर्ले यांनी शिवसेनेकडून विजयी होण्याचा पहिला मान पटकावला. त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार विजयी होत गेले. या निवडणुकीत एकूण 17 नगरसेवकांपैकी शिवसेनेचे पूर्वा मुळे (268 मते, प्रभाग 2), लहू शिवराम कांबळे (264, प्रभाग- 4), प्रसाद डोर्ले (318, प्रभाग- 6), सोनाली गुरव (264, प्रभाग-11), वंदना काटगालकर (162, प्रभाग-12), यामिनी जोईल (245, प्रभाग -14), स्वरूप गुरव (190, प्रभाग-15), समृद्धी सुनील गुरव (276, प्रभाग 16), सचिन डोंगरकर (462, प्रभाग 17) यांनी विजय मिळवला. तसेच शिवसेनेचे बंडखोर अपक्ष राजेश हळदणकर (221, प्रभाग 1) व दूर्वा प्रसाद भाइशेट्ये (208, प्रभाग-3), भाजपचे शीतल सावंत (268, प्रभाग क्र. 7), मंगेश लांजेकर (234, प्रभाग 10), संजय यादव (287, प्रभाग क्र. 13), कॉंग्रेस आघडीचे मधुरा लांजेकर (271, प्रभाग क्र. 8), रफिक नेवरेकर (391, प्रभाग क्र. 9) यांनी विजय मिळवला. अपक्ष मधुरा बापेरकर (प्रभाग क्र. 5) या बिनविरोध निवडून आल्या आहेत. या निवडणुकीमुळे लांजा नगरपंचायतीत सेनेचे 9, भाजपचे 3, काँग्रेसचे 2 आणि तीन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. निवडणुकीत शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष राजू कुरुप यांच्यासह स्वीकृत नगरसेवक नागेश कुरुप यांनाही पराभव पत्करावा लागला. 

आघाडीची सत्ता उलथवली 

नगरपंचायतीत यापूर्वी आघाडीची सत्ता होती. अडीच वर्षानंतर झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस आघाडीच्या नगरसेवकांना हाताशी धरून शिवसेनेने वन टू का फोर करत नगरपंचायत ताब्यात घेतली होती. त्यावेळी राजू कुरुप नगराध्यक्ष झाले होते. 

काँग्रेसने खाते खोलले 

निवडणुकीत भाजप, शिवसेना स्वबळावर लढले, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. गतवेळच्या निवडणुकीत कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती, राष्ट्रवादीचा वरचष्मा होता. यावेळी मात्र नेमके उलट चित्र झाले आहे. कॉंग्रेसने नगरपंचायतीत खाते खोलले, परंतु राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.