ओरोस : पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि भाजप, (BJP) राणे कुटुंबीयांसह महाविकास आघाडीने प्रतिष्ठेच्या बनविलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Sindhudurg District Central Co-op Bank) संचालक पदाच्या निवडणुकीसाठी काल ९८.६७ टक्के मतदान झाले. ९८१ पैकी ९६८ मतदारांनी हक्क बजावत १९ संचालक पदासाठी रिंगणात असलेल्या ३९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले. मतदानावेळी कणकवलीत (Kankavli) बाचाबाची, घोषणाबाजी वगळता जिल्ह्यातील इतर केंद्रांत शांततेत प्रक्रिया झाली. आज (ता. ३१) सकाळी ९ वाजल्यापासून सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढीत मतमोजणी सुरूवात झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. वैभववाडी विकास सोसायटी मतदार संघात दिलीप रावराणे दोन मताने विजय झाले. तर सावंतवाडीतून शिवसेनेचे विद्याधर परब हे विजयी झाले आहेत. मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीमध्ये कणकवलीत समान मतदान झाले आहे.
दरम्यान, कणकवली येथे काल सकाळच्या सत्रात जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. तर मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तंग झाले होते; मात्र अन्यत्र निवडणूक शांततेत पार पडली.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणूक आज पार पडली. यासाठी आठही तालुका तहसील कार्यालयात मतदान केंद्र ठेवण्यात आली होती. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या निवडणुकीत जिल्हा बँकेवर मतदानद्वारे १९ संचालक निवडून द्यायचे होते. यासाठी ९८१ मतदार निश्चित झाले होते. १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व अपक्ष ही महाविकास आघाडी समृद्धी विकास पॅनेल म्हणून निवडणूक रिंगणात होते. त्यांच्या विरोधात भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक परिवर्तन पॅनेल उभे होते. दोन्हीकडून निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही पॅनेलने तगडे उमेदवार देत एकमेकांसमोर तगडे आवाहन उभे केले होते.
या निवडणुकीत आठ तालुका मतदार संघातून आठ संचालक निवडून द्यायचे आहेत. यासाठी कणकवलीमध्ये सेनेकडून विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत विरोधात भाजपचे विठ्ठल देसाई, देवगड तालुक्यात महाविकास आघाडीकडून अपक्ष अविनाश माणगावकर विरुद्ध भाजपचे प्रकाश बोडस, वैभववाडी तालुक्यात सेनेचे दिगंबर पाटील विरुद्ध भाजपचे मोहन रावराणे, मालवण तालुक्यात राष्ट्रवादीचे व्हिक्टर डांटस विरुद्ध भाजपचे कमलाकांत कुबल, कुडाळ तालुक्यात काँग्रेसचे विद्याप्रसाद बांदेकर विरुद्ध भाजपचे प्रकाश मोर्ये व भाजप बंडखोर सुभाष मंडव, वेंगुर्ले तालुक्यात काँग्रेसचे विलास गावडे विरुद्ध भाजपचे मनीष दळवी, सावंतवाडी शिवसेनेचे विद्याधर परब विरुद्ध भाजपचे गुरुनाथ पेडणेकर, दोडामार्ग सेनेचे गणपत देसाई विरुद्ध भाजपचे प्रकाश गवस यांच्यात लढत झाली.
उर्वरित जिल्हास्तर अकरा मतदारसंघातील पतसंस्था मतदारसंघातून शिवसेनेचे सुशांत नाईक विरुद्ध भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, पणन मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुरेश दळवी विरुद्ध भाजपचे अतुल काळसेकर, मजूर-औद्योगिक मतदार संघातून सेनेचे लक्ष्मण आंगणे विरुद्ध भाजपचे गजानन गावडे, मश्चिमार व दुग्धसंस्था मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मधुसूदन गावडे विरुद्ध भाजपचे महेश सारंग, घर बांधणी देखरेख संस्थेतून राष्ट्रवादीचे विनोद मर्गज विरुद्ध भाजपचे संदीप परब, वैयक्तिक मतदार संघातून काँग्रेसचे विकास सावंत विरुद्ध भाजपचे समीर सावंत, दोन महिला प्रतिनिधी मतदार संघातून सेनेच्या अनारोजीन लोबो व काँग्रेसच्या नीता राणेंविरुद्ध भाजपच्या अस्मिता बांदेकर व प्रज्ञा ढवण, अनुसूचित जाती मतदार संघातून राष्ट्रवादीचे आत्माराम ओटवणेकर विरुद्ध भाजपचे सुरेश चौकेकर, इतर मागास मतदारसंघातून सेनेचे मनीष पारकर विरुद्ध भाजपचे रवींद्र मंडगावकर, विमुक्त-भटक्या जमाती मतदारसंघातून काँग्रेसचे मेघनाथ धुरी विरुद्ध भाजपचे गुलाबराव चव्हाण अशी लढत झाली.
सकाळी आठ वाजता प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. हे मतदान यंत्राद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे घेण्यात आले. एका मतदाराला एकूण सहा मते देण्याचा अधिकार होता. यामध्ये राखीव पाच मतदार संघात पाच मते व ज्या संस्थेचा मतदार आहे त्या मतदार संघासाठी एक, अशी एकूण सहा मते द्यायची होती. त्यानुसार ९८१ पैकी ९६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये मालवण, कुडाळ, दोडामार्ग या तीन तालुक्यांत १०० टक्के मतदान झाले आहे. तर सावंतवाडी ९९.५२ टक्के, वेंगुर्ले ९४.७९ टक्के, कणकवली ९७.५७ टक्के, वैभववाडी ५४.५३ टक्के, देवगड ८३.८१ टक्के असे तालुकानिहाय मतदान झाले आहे.
जिल्हा निवडणूक पाश्वभूमीवर शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला व त्यानंतर ढवळून निघालेला जिल्हा यामुळे ही निवडणूक राज्यस्तरावर गाजली होती. यापूर्वी कधीही झाला नव्हता एवढा हंगाम या निवडणुकीत झाला होता. तसेच प्रचारादरम्यान खालच्या पातळीवर जाऊन व्यक्तिगत टीका करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्राबाहेर कडक बंदोबस्त लावला होता. मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी घातली होती. तसेच मतदान केंद्राबाहेर उभारलेल्या बूथवर पोलिसांची करडी नजर होती.
१३ मतदार अनुपस्थित
१३ मतदार मतदान करण्यासाठी आले नाहीत. यात वेंगुर्ले पाच, कणकवली चार, वैभववाडी एक, देवगड दोन आणि सावंतवाडी एक अशाप्रकारे मतदार आले नाहीत. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने व जिल्हा न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन फेटाळल्याने भाजप पुरस्कृत पॅनेलचे वेंगुर्ले तालुका उमेदवार मनीष दळवी मतदान करण्यासाठी जाऊ शकलेले नाहीत. तसेच याच प्रकरणात गुन्हा दाखल असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत हे सुद्धा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला असल्याने मतदान करू शकलेले नाहीत.
“ही शेतकऱ्यांची बँक आहे. आमचे पॅनेल शेतकऱ्यांसाठी काम करते. त्यामुळे उद्या निकालावेळी शेतकऱ्यांचा विजय होणार. आपल्या पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.”
- सतीश सावंत, महाविकास आघाडी
“निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे जिल्हा बँक निवडणूक निकालावेळी भाजपचे सर्व उमेदवार विजयी होताना दिसतील.”
-राजन तेली, भाजप
कणकवलीत तणाव
कणकवली मतदार केंद्रात जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्यात झालेल्या खडाजंगीनंतर आरोप-प्रत्यारोप, तसेच मतदान प्रक्रिया संपल्यानंतर शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत केलेली घोषणाबाजी व शेरेबाजी यामुळे अन्यत्र जिल्ह्यात शांततेत झालेल्या निवडणुकीला गालबोट लागले आहे.
सेफ झोनमध्ये ठेवलेले मतदार पोहोचले केंद्रावर
ही निवडणूक अतिशय अटीतटीची होती. त्यामुळे उमेदवारांनी आपले मतदार दोन दिवसांपूर्वी आपल्या ताब्यात घेत त्यांना अज्ञातवासात ठेवले होते. काहींनी जिल्ह्यानजीकच्या राज्यात ठेवत त्यांची उठबस केली. तर काहींनी जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाणी ठेवत त्यांच्यावर पाळत ठेवली होती. मतदार लपवून ठेवले तरी मतदानाच्या आदल्या रात्री बुधवारी हे मतदार आपल्या बाजूने वळावेत, यासाठी विविध आमिषे दाखविण्याचे काम दोन्हीकडून सुरू होते. त्यामुळे आज मतदान केंद्रावर मतदार पोहोचताना एकदम पोहोचले होते. सेफ झोनमध्ये ठेवलेल्या मतदारांना उमेदवाराने मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.