सिंधुदुर्ग : ‘सह्याद्री’मध्ये धोक्याची घंटा

काही वर्षांपासून कोकणची ढाल असलेला सह्याद्रीचा पट्टा असुरक्षित बनला आहे.
सह्याद्री पट्ट्यातील पर्यावरणाचा ऱ्हास हे आहे
सह्याद्री पट्ट्यातील पर्यावरणाचा ऱ्हास हे आहेsakal
Updated on

डोंगर खचताहेत पर्यावरणाचा असमतोल बनतोय डोकेदुखी

काही वर्षांपासून कोकणची ढाल असलेला सह्याद्रीचा पट्टा असुरक्षित बनला आहे. पुण्यातील माळीण गावातील भूस्खलनाची घटना ताजी असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अशा घटना वारंवार घडत आहेत. दिगवळे-रांजणगाव (ता. कणकवली) येथे २३ जुलै २०२१ ला भूस्खलन झाले आणि प्रशासकीय यंत्रणांचे डोळे उघडले. सह्याद्रीचा पट्टा का ढासळतोय? सह्याद्रीला आपण डिवचतोय का? हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. पश्चिम घाट इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर होऊनही या सह्याद्रीचे लचके आपण तोडत आहोत. त्याचे दुष्परिणाम सह्याद्रीच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत अधिवास असलेल्या सर्व सजीवांना भोगावे लागणार आहेत.

- तुषार सावंत

भूवैज्ञानिक अहवालाची प्रतीक्षा

दिगवळे-रांजणगाव येथे भूस्खलनाची घटना घडल्यानंतर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला पत्र पाठवून या भागाचे सर्वेक्षण करण्याबाबत कळविण्यात आले होते. अहवाल अजूनही प्रतीक्षेत आहे. देशभरात घडणार्‍या भूस्खलनाचे सर्वेक्षण भारतीय वैज्ञानिक विभागातर्फे होत असते; मात्र या संस्थांकडून सुचवलेल्या उपाययोजनांवर प्रभावीपणे काम होत नाही. आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रशिक्षण देत असला तरी या विभागालाही अनेक मर्यादा आहेत. या विभागाकडे तांत्रिक आणि यांत्रिकदृष्ट्या अभाव आहे. याचे गांभीर्य प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीनी वेळीच ओळखण्याची गरज आहे.

पर्यावरणाची हानी

सह्याद्री पट्ट्यातील वन्यजीवांचे स्थलांतर सातत्याने होताना दिसत आहे. याची मुख्य कारणे सह्याद्री पट्ट्यातील पर्यावरणाचा ऱ्हास हे आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेली जंगलतोड, उन्हाळी हंगामातील वणवे, नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोंतांकडे झालेले दुर्लक्ष, जैवविविधतेकडे लोकांची असलेली डोळेझाक, विकास प्रक्रियेतून निर्माण होणारी रासायनिक प्रक्रिया यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होऊ लागली आहे. पर्यावरण ढासळत चालल्याने सह्याद्रीचा पट्टा धोक्याच्या छायेत आहे असे अनेक जाणकार मत मांडतात. सह्याद्री परिसरातील दरडी अचानक नाहीतर संथ गतीने घसरतात. त्याची लक्षणे काही वर्षे, काही महिने, काही दिवस स्थानिक रहिवाशांना निश्‍चितपणे समजत असतात; पण त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.

‘सह्याद्री’शी तुटतेय नाते

सह्याद्री पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती केली जात असे. डोंगर माथ्यावर हंगामी शेती केली जात असे. त्यामुळे गेल्या चार-पाच पिढ्यांपूर्वी सह्याद्री आणि त्या परिसरात राहणार्‍या नागरिकांचे नाते हे घट्ट होते; मात्र सह्याद्रीचा बहुतांशी भाग केंद्रीय वनविभागाच्या अखत्यारीत गेल्यानंतर खर्‍या अर्थाने सह्याद्री पट्ट्यातील जन माणसांचे नाते या निसर्गाची तुटून गेले. यात वनसंज्ञा व इतर निर्बधांचाही समावेश आहे. ज्या भावनेने आपल्या मालकी हक्कातील जमिनीचे संरक्षण केले जात होते तसे संरक्षण आता होत नाही. सह्याद्रीचा बहुतांशी भूभाग शासकीय वन आहे. त्यामुळे शासनाची मालमत्ता म्हणून यावर मोठा आघात केला जातो. गेल्या काही वर्षात चोरटी जंगलतोड रोखणे वनविभागाला म्हणावे तसे शक्य झालेले नाही. शासकीय मालमत्ता असल्याने याची मोठी तस्करीत झाली. परिणामी खाजगी वनक्षेत्र हे सरकार दरबारी नोंदविले गेल्याने स्थानिक रहिवाशांचे सह्याद्रीशी असलेले नाते कायमचे तुटले. त्याचे दुष्परिणाम आता भोगावे लागत आहेत.

पाण्याचे स्रोत बदलले

सह्याद्री पट्ट्यातील बहुतांशी दरी उंच भाग सातत्याने कोसळत आहेत. याची अनेक कारणे असली तरी खर्‍या अर्थाने सह्याद्री पट्ट्यातील नैसर्गिक जलस्त्रोत आता बदलले आहेत. पूर्वी नैसर्गिक जलस्रोतांचे जतन केले जात होते. यासाठी सह्याद्री पट्ट्यामध्ये शिवकालीन तलाव किंवा शिवकालीन बंधारे घातले जात असत. यावर शेती व बागायती अवलंबून असायची. निसर्गाची नाते अतूट असल्यामुळे सह्याद्री पट्ट्यातील रहिवाशी नैसर्गिक स्रोतांचे कायमस्वरूपी जतन करत असत. नैसर्गिक स्त्रोत योग्य पद्धतीने आपले काम करत असत; परंतु गेल्या काही वर्षात नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन फार कमी प्रमाणात होत आहे. जलस्त्रोतांचे मार्ग बदलण्याचे प्रकारही घडत आहेत. भू्स्खलनाला हा घटकही कारणीभूत ठरत आहे.

जमिनीची धूप विनाशाकडे

सह्याद्री पट्ट्यातील नदी नाल्यांमधून होणारी जमिनीची धूप ही विनाशाकडे नेणारी आहे. दरडी गावठाणावर, वस्त्यांवर आणि घाट रस्त्यावर कोसळतात. याची महत्त्वाची कारणे म्हणजे डोंगरउतारावर असमतोल करणारे मानवी अतिक्रमण आहे. दरडी कोसळणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे; पण त्याचे प्रमाणही गेल्या काही वर्षात वाढले आहे. दरडी कोसळत असल्यामुळे नदी-नाले आपले प्रवाह बदलू लागले आहेत. डोंगर भागातील दरडी कोसळून त्याचा थेट परिणाम अगदी समुद्राच्या तळापर्यंत होऊ लागला आहे.

नदीनाल्यामध्ये डोंगरांचा खचलेला गाळ मोठ्या प्रमाणात साठत आहे. त्यामुळे पाणीसाठ्यावर आणि नैसर्गिक पाणी स्त्रोतावर त्याच परिणाम जाणवू लागलेला आहे. नदी नाल्यात गाळ साचल्याने महापुराचे संकट कोकणातील नदीकाठच्या वस्तीवर कायम आहे.

का ढासळतोय सह्याद्री?

सह्याद्री पट्ट्यातील दरडी कोसळण्याच्या संकटाची कारणे अनेक आहेत. त्यात सह्याद्रीची रचना, भूस्तरीय स्वरूप, भूकंप प्रवण क्षेत्र, अतिवृष्टी याच्याशी त्याचा संबंध जोडला जातो; पण त्याशिवाय मानवनिर्मित अनेक कारणे याला आहेत. महत्त्वाचे म्हणजे मानवाने बांधलेली घरे, विकासाच्या नावाखाली रस्ते बांधकाम, डोंगरांचे सपाटीकरण, प्रचंड वृक्षतोड, जमीवर चर खोदणे, खाणकामासाठी सुरुंग उडवून भूस्तर अस्तिर करणे आदी कारणे जबाबदार आहेत. सिंधुदुर्गात डोंगर खचण्याच्या घटना नवीन नाहीत. दिगवळे-रांजणगाव येथे गेल्या पावसाळ्यात असा प्रकार घडला. यापुर्वी मालवण तालुक्यातील काळसे-धामापुर येथे अनेक कुंटूंबे या अशा भुस्खलनाच्या घटनेची साक्षीदार आहेत. गेल्या दोन वर्षात असनिये, झोळंबे, गाळेल, शिरशिंगे या भागातही असे प्रकार घडले आहेत. तरीही आपण सह्याद्रीच्या रक्षणासाठी पाऊल टाकलेले नाही.

वाढते संकट

नैसर्गिक आणि काही मानवनिर्मित कारणांमुळे गेल्या काही वर्षात सिंधुदुर्गासह पूर्ण कोकणात भूस्खलनाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढत आहे. ही भूस्खलनाची महासंकटे जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात करत आहेत. एकीकडे या संकटाकडे आपत्ती निवारणाच्या संकुचित चौकटीतून पाहणे पुरेसे नाही; मात्र यावर उपाय काय योजावेत याबाबत यंत्रणा हतबल झाल्याचे दिसते. दरडी घसरण्यापूर्वी उद्भवणारी लक्षणे म्हणजे निसर्ग वाजवीत असलेली धोक्याची घंटा असते. सह्याद्रीच्या परिसरातील रहिवाशांना हा इशारा अज्ञानामुळे समजत नाही. त्यामुळे अशा संकटग्रस्त भागात प्रशासकीय किंवा सामाजिक क्षेत्रांमधून जनजागृतीची गरज आहे. परिणामी अशा भूस्खलनाच्या घटनांमध्ये कमी हानी होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.