सिंधुदुर्ग : रोज ६२ लाखांचे दूध आयात

दुग्धोत्पादनाला पोषक स्थिती असूनही जिल्हा मागे
milk
milksakal
Updated on

ओरोस : सिंधुदुर्गात दूध उत्पादनाला पोषक स्थिती आहे. तरीही आपण रोज सव्वा लाख लिटर दूध इतर जिल्ह्यातून मागवतो. याचाच अर्थ रोज ६२ लाख ५० हजार रुपये दिवसाला अन्य जिल्ह्याला देत आहोत. हे एक प्रकारे जिल्ह्याचे नुकसान आहे. आता ही स्थिती बदलण्यासाठीची मानसिकता जिल्ह्यात हळूहळू तयार होऊ लागली आहे. शेतीत ‘राम’ नाही. उत्पादनापेक्षा खर्च जास्त. शेतीसाठी मजूर मिळत नाहीत, अशी एक ना अनेक कारणे देऊन शेती उत्पादनाकडे पाठ फिरविणाऱ्या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय साद घालीत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा शेतीप्रधान आहे. या जिल्ह्यात शेतीबरोबर बागायती पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे येथील नागरिकांचा मूळ पिंड शेती व शेतीपूरक व्यवसायाशी जोडलेला आहे; मात्र मधली अनेक दशके येथील तरुण नोकरीच्या माध्यमातून चाकरी करण्याकडे मोठ्या प्रमाणात वळले. या चाकरीच्या नादात शेती कमी होत गेली. शेती जे कसत होते, त्या शेतकऱ्यांनी सुद्धा शेतीकडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली. त्यामुळे जिल्ह्यात सध्या पडीक क्षेत्र वाढले आहे. २०२० मध्ये कोरोना आला आणि चाकरी करणाऱ्या अनेक तरुणांना चाकरीतून एक वेळची भाकरीही मिळणे मुश्कील झाले. त्यावेळी आपला गाव बरा, गावची शेती बरी, किमान एक वेळ उकड्या तांदळाची पेज तरी जेवता येते, याचा साक्षात्कार अनेकांना झाला.

कोरोना संकटात सापडलेल्या तरुणांनी आपला गाव बरा व आपली शेती बरी म्हणत पुन्हा शेतीकडे मोर्चा वळविला आहे. ही बाब सुखदायक आहे. शेती हा आपला कणा आहे. त्यामुळे शेती करता करता शेतीपूरक व्यवसाय केल्यास मालक म्हणून सन्मानाने जगता येणार आहे. चाकर म्हणून मोठ्या शहरात राहून दहा ते पंधरा हजार रुपये कमवून खोटे लंकाधिश बनण्यापेक्षा स्वतःच्या घरात राजा म्हणून जगण्यात काहीच वावगे नाही. कितीही ओरड मारली तरी शेती तोट्यात नाही; मात्र, बदल स्वीकारले पाहिजेत. ही शेती अधिक फलदायी होण्यासाठी दूध उत्पादनासारख्या पूरक व्यवसायाची कास धरणे गरजेचे आहे. यामुळे निश्चितच जिल्ह्यात मोठी आर्थिक क्रांती घडू शकते, हे आता हळूहळू पटू लागले आहे.

अजून सव्वा लाख लिटरची गरज

सिंधुदुर्ग जिल्ह्याला दरदिवशी दीड लाख लिटर दूध लागते. मात्र, जिल्ह्यात सध्या केवळ २२ हजार ५०० लिटर एवढे दूध उत्पादन होत आहे. याचा अर्थ जिल्ह्याला अजून सव्वा लाख लिटर दुधाची गरज आहे. ही गरज कोल्हापूरसारखा जिल्हा भागवतो. म्हणजे जिल्ह्यात आपण दुधाचे उत्पादन घेऊ शकतो, त्याला पोषक वातावरण जिल्ह्यात आहे, तरीही आपण अन्य जिल्ह्याला ती संधी देत आहोत. ५० रुपये लिटर दुधाची किंमत धरली तरी सव्वा लाख लिटर दुधासाठी आपण ६२ लाख ५० हजार रुपये दिवसाला अन्य जिल्ह्याला देत आहोत. हे एक प्रकारे जिल्ह्याचे नुकसान आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अज्ञान आहे. संधी असताना ती आपण घेत नाही, त्या संधीचे सोने करीत नाही, याला अज्ञानच म्हणावे लागेल.

दूध व्यवसाय हा शाश्‍वत

दूध व्यवसाय हा शाश्‍वत व्यवसाय आहे. कारण येथे नुकसान नाही. बाजारपेठेत दुधाला मोठी मागणी आहे. त्यामुळे मार्केट नाही म्हणून दूध वाया गेले, असे म्हणायला वाव नाही. अशा शाश्‍वत असलेल्या व हक्काने पैसे मिळणाऱ्या व्यवसायाकडे आपण वळलो नाही, त्याकडे एक संधी म्हणून पाहिले नाही, तर आमच्यासारखा दुर्दैवी कोणी नाही, असे म्हटले तर चुकीचे नाही. सिमदोडा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात दुधाच्या उत्पादनातून घरोघरी सुखसमृद्धी नांदत असेल, तर आपल्या जिल्ह्यात ती क्रांती का होऊ शकत नाही? आम्हाला नको का सुख-समृद्धी? की आम्ही जिल्ह्यात उद्योग व्यवसाय येणार आणि आपण तिथे चाकरी करणार? याचीच वाट पाहत राहणार? त्यापेक्षा आपल्या घरात मालक बनून दुधाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता आणणार, याचा विचार करण्याची गरज आता जिल्हावासीयांना आहे. त्यामुळे आताच खुणावत असलेल्या दूध व्यवसायाकडे वळणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.