ओरोस : जिल्हा बँकेची २०१५ मध्ये पंधराशे कोटी उलाढाल होती. गेल्या पाच वर्षांत त्यात ९०० कोटींची वाढ झाली असून २४०० कोटींवर उलाढाल पोचली आहे. सतीश सावंत यांनी संचालकांच्या समन्वयातून या कालावधीत शेतकरी हिताचे निर्णय घेतले. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शक कारभार करणारी राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा बँक ठरली आहे. यामुळे महाविकास आघाडीने एकमुखाने सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत सर्वच्या सर्व १९ संचालक महाविकास आघाडीचे निवडून येतील, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून ही निवडणूक महाविकास आघाडी कशाप्रकारे लढविणार आहे, याची माहिती देण्यासाठी सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनमध्ये आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राष्ट्रवादीचे व्हिक्टर डांटस, काँग्रेसचे विद्याप्रसाद बांदेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, जान्हवी सावंत, नागेंद्र परब, संजय आंग्रे, आर. टी. मर्गज, मनीष पारकर आदी उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, ‘‘पाच वर्षांतील मध्यंतरीच्या काळात काही लोकांनी राजकीय दबाव आणत चुकीच्या पद्धतीने कोट्यवधीची कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचा प्रयत्न केला; मात्र हा दबाव झुगारत सावंत यांनी शेतकरी हितासाठी निर्णय घेतला. बँकेत कोणताही घोटाळा होऊ दिला नाही. जिल्हा बँक निवडणूक विकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेत जागावाटप निश्चित केले होते. त्यानुसार जिल्हा बँक निवडणूक लढविण्यात येत आहे.
या निवडणुकीत जिल्ह्यातील मतदार पुन्हा श्री. सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व संचालक निवडून देतील, असा मला विश्वास आहे. त्यानंतर पुढील पाच वर्षांत जिल्हा बँकेची आर्थिक उलाढाल साडेतीन हजार कोटींवर जाईल. काही लोकांनी पक्षीय नव्हे तर व्यक्तिगत स्वार्थासाठी आणलेला दबाव झुगारून सावंत यांनी बाणेदारपणा दाखविला. तसाच कारभार यापुढेही सावंत व त्यांचे संचालक निवडून आल्यानंतर करतील. ही बँक लुटारूंपासून वाचवतील."
कर्जदार आमदार बँक काय चालविणार?
यावेळी बोलताना आमदार केसरकर यांनी महाविकास आघाडीचा जिल्हा बँक जागांबाबत फॉर्म्युला ठरलेला आहे. त्या-त्या पक्षांनी आपले कोणते उमेदवार द्यायचे, हे ठरविण्याचा अधिकार त्या-त्या पक्षाला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज छाननीनंतर कोणत्या पक्षाला किती जागा व उमेदवारांची नावे सतीश सावंत जाहीर करतील, असे सांगितले. यावेळी त्यांनी हा जिल्हावासीयांसाठी कसोटीचा काळ आहे. (कै.) शिवरामभाऊ जाधव यांनी ही बँक रुजविली आहे. त्यांच्यानंतर हा वारसा कोण चालविणार? असा प्रश्न निर्माण झाला होता; मात्र सावंत यांनी ही जागा भरून काढली आहे.
जनतेत जिल्हा बँक आपली असल्याची भावना त्यांनी निर्माण केली आहे. दबाव झुगारून जनतेला सोयीचे निर्णय घेतले आहेत. आतापर्यंत मी सहकार निवडणूक प्रचारासाठी गेलो नव्हतो; परंतु यावेळी सावंत यांच्यासाठी प्रचार करणार आहे. जिल्हा बँक हे जिल्ह्याचे वैभव असून ते टिकविण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना जे स्वतःच्या संस्थेचे कर्ज फेडू शकले नाही, स्वतः कर्जदार आहे ते बँक काय चालविणार? असा प्रश्न केला.
एका दिवसात अडीच कोटी आले कुठून?
जिल्हा बँक संचालक प्रकाश गवस यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबाबत विचारले असता आमदार केसरकर यांनी प्रकाश गवस यांची संस्था ३६ लाख रुपये देणे होती. ते पैसे एका दिवसात भरले गेले. अशाप्रकारे जिल्ह्यातील विविध संस्थांनी अडीच कोटी थकीत रक्कम भरली. एवढी रक्कम आली कुठून, कोणी पैसे दिले, हा प्रश्न निर्माण होत आहे. अशाप्रकारे अडीच कोटी रुपये थकीत रक्कम कोणीतरी व्यक्तीने (स्वतःची सोडून..कारण एवढी रक्कम ते भरू शकत नाहीत) भरली असल्यास तो त्याचा फायदा घेणारच आहे, असे केसरकर म्हणाले.
त्यांनी सुरुवात केल्यावर मी बोलेन
आपल्याकडे खूप पुरावे आहेत. केवळ त्यांनी बोलण्यास सुरुवात करण्याची, आरोप करण्याची वाट पाहत आहोत, असा इशारा सतीश सावंत यांनी भाजपला दिला. जिल्हा बँक सातत्याने नाबार्डच्या ‘अ’ वर्गामध्ये राहिली आहे. एनपीए शून्य टक्के आहे. आम्हाला आता दूध उत्पादनात लक्ष घालवायचे असून एक लाख दूध उत्पादन विकसित करायचे असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.