‘हायस्पीड’ रस्ते तयार करताना नैसर्गिक जलप्रवाहांची दिशा बदलण्याचा झालेला प्रयत्न, घाटरस्त्यांची रुंदी वाढविताना भौगोलिक परिस्थितीचा न केलेला विचार आणि यंत्रणाचे दिशाहीन धोरण यामुळे जिल्ह्यात हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेले हायस्पीड महामार्ग आणि घाटरस्ते अतिवृष्टीत कुचकामी ठरले.
त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते सरळ झाले; परंतु ते सुरक्षित आणि निर्धोक बनले आहेत का? असा प्रश्न सामान्य वाहनचालकांकडून विचारला जात आहे. महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना शहाणपण सुचले नाही, तर भविष्यातही हीच स्थिती कायम राहील. जिल्ह्यात पूरस्थितीत महामार्ग, घाटरस्त्यांच्या मर्यादेविषयी घेतलेला आढावा...
कोटी-कोटींची उड्डाणे
सिंधुदुर्गात प्रामुख्याने मुंबई-गोवा आणि तळेरे-कोल्हापूर हे दोन राष्ट्रीय महामार्ग, खारेपाटण-गगनबावडा, देवगड-निपाणी, उंबर्डे-आचरा, सावंतवाडी-वेंगुर्ले, कसाल-मालवण, देवगड-मालवण-वेंगुर्ले-सावंतवाडी हा सागरी मार्ग यांसह कित्येक राज्यमार्ग आहेत. याशिवाय जिल्हामार्ग, ग्रामीण मार्गाची संख्याही मोठी आहे. गेल्या काही वर्षांत शासनाने महामार्ग आणि राज्यमार्गाची नव्याने बांधणी सुरू केली.
गेल्या काही वर्षांपासून बहुचर्चित मुंबई-महामार्गाचे काम सुरू आहे. या कामासाठी अंदाजे १८ हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. या महामार्गाचे सिंधुदुर्गातील काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यापाठोपाठ सध्या तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काँक्रिटीकरणाने दुपदरीकरण करण्याचे काम सुरू आहे.
आतापर्यंत तीनशे ते चारशे कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असून, उर्वरित कामांसाठी किमान सहाशे ते सातशे कोटी खर्च येणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घाटरस्त्यांवर दरवर्षी शेकडो कोटींचा निधी खर्च होत आहे. जिल्हा मार्ग आणि ग्रामीण रस्त्यावरही कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत.
यामध्ये रस्ते नूतनीकरण करणे, पुलांची उंची वाढविणे, गटारांची बांधकामे करणे, रस्ते रुंदी वाढविणे अशा शेकडो कामांचा समावेश आहे. ही कामे करताना महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग या सर्व विभागांनी सुरक्षित वाहतुकीपेक्षा गतीने वाहतूक एवढाच निकष नजरेसमोर ठेवून कामे केली आहेत.
अतिवृष्टीत मर्यादा उघड
जिल्ह्यात ६ जुलैपासून पावसाचा जोर वाढला आणि ७ जुलैला अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जिल्ह्यात गंभीर स्वरुपाची पूरस्थिती निर्माण होऊन हाहाकार उडाला. पुरामुळे जिल्ह्यातील नागरिकांची दाणादाण उडाली. पूरस्थितीत मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस येथील रस्त्यावरून पुराचे पाणी वाहत होते. याशिवाय याच मार्गावर आणखी तीन ते चार ठिकाणी वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार झाले.
जिल्ह्यातील राज्यमार्ग, जिल्हा आणि ग्रामीण अशा तब्बल ४५ हून अधिक मार्गावरील वाहतूक पूल पुराच्या पाण्यामुळे ठप्प झाली. जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले. केवळ गती एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून बांधणी केलेल्या रस्त्याची अवस्था किती सामान्य आहे, हे निसर्गाने उघड केले. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांची मर्यादा ठळकपणे उघड झाल्या आहेत.
शहाणपणा कोण शिकणार?
जिल्ह्यात पूरस्थिती यावर्षीच निर्माण झाली असे नाही, यापूर्वी २००५ आणि त्यानंतर २०१९ मध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती; परंतु त्यातून बांधकाम विभागाने कोणताही धडा घेतलेला नाही. त्यातून कोणतेही शहाणपण न शिकल्यामुळे त्याच प्रकारांची पुनरावृत्ती दिसत आहे.
धोकादायक झाडे
मुसळधार पाऊस झाल्यानतंर वाऱ्याच्या लहानशा झुळकेने देखील झाडे रस्त्यावर कोसळतात. ही झाडे देखील अनेकदा धोकादायक ठरलेली आहेत. काही वाहनांवर झाडे कोसळण्याचे प्रकार झाले आहेत; परंतु ही धोकादायक झाडे हटविली का जात नाहीत? असा प्रश्न सामान्य चालकांकडून विचारला जातो.
रस्ते बांधणीत त्रुटी
जिल्ह्यातील मोजक्या तालुक्यांचा काही भाग वगळता संपूर्ण जिल्ह्याचा भूप्रदेश हा निसरडा आहे. पावसाचे पाणी नदीनाल्यांपर्यंत गतीने जाते आणि ते समुद्राला जाऊन मिळते. अशीच रचना बहुतांशी भागात असल्यामुळे सतत पाऊस होऊन देखील आपल्याकडे पूर्वी फारशी पूरस्थिती निर्माण होत नव्हती; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. या परिस्थितीस भौगोलिक परिस्थितीचा कोणताही विचार न करता केलेली रस्ते बांधणी हीच आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे बांधकाम अलीकडेच करण्यात आले; परंतु या महामार्गाचे काम करताना पूर्वीचे नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बंद करण्यात आले. हे पाणी नैसर्गिक पद्धतीने नदीनाल्यांपर्यंत सहजतेने जात होते; परंतु महामार्ग प्राधिकरणने या पाण्याची वाटच अडविली. महामार्ग प्राधिकरणचे हेच धोरण सध्या महामार्ग ठप्प होण्याच्या स्थितीत कारणीभूत ठरली आहे.
केवळ मार्ग सरळ करणे एवढेच उद्दिष्ट ठेवून प्राधिकरणने काम करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो सुरक्षित होईल का, याचा विचार त्यांनी केलेला दिसत नाही. पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घाटमार्गाचीही तीच अवस्था आहे. यापैकी कुठलाही घाटमार्ग निर्धोक राहिलेला नाही. तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील करूळ घाटरस्त्याची देखील तीच अवस्था भविष्यात होणार आहे.
या घाटमार्गाचे काम करताना भौगोलिक स्थितीचा काडीमात्र अभ्यास केलेला नाही. परिणामी २० मीटरची एक भिंत कोसळली आहे. उर्वरित तीन-चार भिंतीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. दरडीकडेला गटारींचे काम सर्वप्रथम होणे आवश्यक होते, ते न केल्यामुळे भिंती कोसळत आहेत. रुंदीकरणासाठी स्थिर असलेल्या दरडी हटविण्यात आल्या. त्यामुळे पुढील तीन ते चार वर्षे या घाटमार्गातून पावसाळ्यात प्रवास करणे जीवघेणे ठरणार आहे.
जिल्ह्यातील राज्यमार्गांची स्थितीदेखील याहून वेगळी नाही. नैसर्गिक प्रवाहाचा अभ्यास कुठेच होताना दिसत नाही. कुठेही संरक्षक भिंती घातल्या जातात, कुठेही बंधारे बांधले जातात, परिणामी पाणी मार्गावरून वाहत असल्याचे चित्र पूरस्थितीत पाहायला मिळाले. रस्तेकाम करताना गंभीर स्वरुपाच्या त्रुटी राहिल्यामुळे महामार्गाची अवस्था ग्रामीण रस्त्यांसारखी झाली, हे वास्तव आहे.
पाणी निचऱ्यावर परिणाम
खाडी किंवा समुद्रानजीकची गावे अथवा शहरांमध्ये पाणी साचण्याचे प्रमाण पूर्वी अधिक असायचे. ज्यावेळी नदीनाल्यांचे पाणी समुद्र किंवा खाड्यांमध्ये जात असते, त्यावेळी जर भरती असेल, तर अनेकदा त्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये पाणी भरल्याचे पाहायला मिळते; परंतु आता तर सरसकट सर्वच शहरांमध्ये पुराचे पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
बांदा, कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी, कणकवली, मालवण, ओरोस यांसह सर्वच शहरांमध्ये पुराचे पाणी साचले होते. अनेकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरून नुकसान झाले. याला देखील काहीअंशी प्रशासनच जबाबदार आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे प्रवाह बदलून त्या ठिकाणी टोलेजंग इमारतींना प्रशासनाकडून बांधकाम परवानग्या दिल्या आहेत. अनेक शहरांमध्ये गटारांची व्यवस्थाच नाही. त्याचा एकूणच परिणाम म्हणून अनेक शहरांमध्ये जागोजागी पाणी साचल्याचे दिसून आले.
दृष्टिक्षेपात
महामार्गावर तीन ठिकाणी वाहतूक ठप्प
खारेपाटण-गगनबावडा मार्गावर जामदा पुलावर पाणी
सावंतवाडी-वेंगुर्ले मार्गावर पाणी
उंबर्डे-आचरा मार्गावरील वाहतूक ठप्प
तब्बल ४५ हून अधिक मार्ग होते बंद
घाटमार्गाबाबत गांभीर्य नाही
सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरला जोडणारे जिल्ह्यात प्रमुख चार घाटमार्ग आहेत. यामध्ये करूळ, भुईबावडा, फोंडा आणि आंबोली या घाटांचा समावेश आहे. यापैकी करूळ घाटमार्ग गेल्या २२ जानेवारीपासून काँक्रिटीकरण कामासाठी बंद ठेवला आहे. उर्वरित तीन घाटमार्गांनी वाहतूक सुरू आहे; परंतु या घाटमार्गाच्या मर्यादा ओळखणे आवश्यक आहे. अवजड वाहतुकीसाठी करूळ घाटाला वाहनचालक पसंती द्यायचे, परंतु तो वाहतुकीस बंद आहे.
भुईबावडा घाटमार्गे अवजड वाहतूक करणे जिकिरीचे मानले जाते. तर घाटरस्त्याला भगदाड पडल्यामुळे फोंडा घाटमार्ग अवजड वाहतुकीस बंद केला आहे. आंबोली हा संपूर्ण जिल्ह्यासाठी सोयीस्कर नाही. त्यामुळे या घाटमार्गाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गंभीर व्हायला हवे.
प्रत्येक पावसाळ्यात घाटमार्ग धोकादायक बनतात, ही वस्तुस्थिती आहे; परंतु ते का बनले जातात? त्याला नेमकी कोणती कारणे आहेत? यावर काहीच उपाय नाही का? या प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे.
मुसळधार पाऊस आणि समुद्राला असलेली भरती यामुळे महामार्गाच्या उजव्या डाव्या बाजूला असलेल्या नद्यांचे पाणी महामार्गावर आले. भविष्यात यासंदर्भात काय पर्याय करता येतील, याबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- मुकेश साळुंखे, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक सध्या भुईबावडा घाटमार्गे सुरू आहे; परंतु सध्या पडत असलेल्या पावसामुळे जर त्या घाटातील वाहतूक बंद झाली, तर त्याला पर्यायी मार्गच नाही. त्यामुळे तातडीने करूळ घाटमार्गाचे काम पूर्ण करावे आणि वाहतूक सुरू करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहोत.
- तेजस आंबेकर, अध्यक्ष, व्यापारी महासंघ, वैभववाडी
जिल्ह्यातील घाटमार्गातील वाहतूक सुरक्षित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत. ज्या ठिकाणी खडक आहे, त्या ठिकाणी उपाययोजना करता येतात; परंतु ज्या ठिकाणी माती आहे, त्याठिकाणी कोणत्याही उपाययोजना करता येत नाहीत. भविष्यात यासंदर्भात काही करता येईल का, याचा विचार करणार आहोत. याशिवाय ज्या ठिकाणी आता पुराचे पाणी रस्त्यावर आले होते, ते येऊ नये, यासाठी पर्यायी उपाययोजना करण्यात येतील.
- विनायक जोशी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ घाट वाहतुकीस बंद आहे. भुईबावडा घाट अवजड वाहतुकीस योग्य नाही, तर फोंडा घाट अवजड वाहतुकीस बंद केला आहे. कणकवली, देवगड, ओरोस, मालवण, वैभववाडी या भागातील वाहनचालकांनी अवजड वाहतूक कोणत्या मार्गाने करायची? हा प्रश्न आहे. या सर्व गोष्टींमुळे वाहनधारकांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा.
- गिरीधर रावराणे, माजी अध्यक्ष, ट्रकचालक-मालक असोसिएशन, सिंधुदुर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.