कुडाळ : महादेवाचे केरवडे-कुसग्याची गाळू येथील शेतकरी विठ्ठल रामा कोळेकर (वय ५१) हे निळेली येथील ओहोळाच्या पाण्यात वाहून गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या घरापासून अवघ्या एक किलोमीटरवर घडली.
शेतकरी कोळेकर नेहमीप्रमाणे गुरे घेऊन निळेली-दापटी येथे आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास घराकडून निघाले. गेले चार दिवस सह्याद्री पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे निळेली येथील ओहोळ दुथडी भरून वाहत आहे. ओहोळाच्या पाण्याला फूग लागल्याने ओहाळाजवळचा सपाट भागही पाण्याच्या कवेत गेला. त्या पाण्याचा अंदाज कोळेकर यांना न आल्याने ते वाहून गेल्याची येथे चर्चा आहे.
दुपारी बाराच्या सुमारास तेथूनच जाणाऱ्या पायवाटेने त्यांची मुलगी जात होती. यावेळी तिला ओहोळाच्या पाण्यात कुणीतरी तरंगताना दिसले. तिने जवळ जाऊन पाहिले असता ते वडील असल्याचे तिच्या निर्दशनास आले. मुलीने आरडाओरड केल्यावर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत माणगाव पोलिसांना माहिती दिली. माणगाव पोलिस दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल पालव, तलाठी राजूरकर, पोलिसपाटील सतीश केरवडेकर, माजी सरपंच पंढरी परब,नीलेश सावंत, गंगाराम सावंत यांच्या उपस्थितीत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. विच्छेदनासाठी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने मृतदेह कुडाळ येथे हलविण्यात आला. कोळेकर यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.