सिंधुदुर्ग : वारा सुटला मासळी महागली!

पारंपरिक मच्छीमार हवालदिल; परराज्यातील ट्रॉलर्सचीही घुसखोरी
मासे खोल समुद्रात थंडाव्यासाठी परतले आहेत.
मासे खोल समुद्रात थंडाव्यासाठी परतले आहेत. sakal
Updated on

मालवण: दक्षिणेकडील वाऱ्याचा वाढलेला जोर आणि वाढत्या उष्णतेमुळे किनाऱ्यालगत मासळी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी याचा मासेमारीवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात आहे. मासळीची आवक कमी झाल्याने उपलब्ध मासळीचे दर गगनाला भिडले आहेत.

गेले काही दिवस दक्षिणेकडील वाऱ्याचा जोर वाढला आहे. शिवाय वाढत्या उष्णतेमुळे मासे खोल समुद्रात थंडाव्यासाठी परतले आहेत. त्यामुळे किनाऱ्यालगत मासळी मिळणे मच्छीमारांना कठीण बनले आहे. जिल्ह्यात गेल्या दीड-दोन महिन्यात परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सनी धुमाकूळ घातला आहे. हे अतिक्रमण रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय खात्याची गस्तीनौकाच नसल्याने परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सधारकांना रान मोकळे झाले आहे. परिणामी किनाऱ्यालगत येणारी मासळी हायस्पीड ट्रॉलर्सधारकांबरोबरच एलईडी ट्रॉलर्सधारकांकडून मोठ्या प्रमाणात लुटली जात असल्याचे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांचे म्हणणे आहे.

वाऱ्याचा जोर वाढल्याने मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीस जाण्याचे टाळले आहे. कारण मासेमारीसाठी होणारा खर्च लक्षात घेता तो भरून निघत नसल्याने अनेक मच्छीमारांनी आपल्या नौका किनाऱ्यावरच ठेवल्या असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी समुद्रात वादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. या पार्श्‍वभूमीवर किनारपट्टीवरील मच्छीमारांनी सावधानता बाळगत आपल्या नौका सुरक्षित ठिकाणी हलविल्या होत्या; मात्र या वादळाचा कोणताही परिणाम जाणवला नाही. समुद्रात कोणत्याही हालचाली मच्छीमारांना जाणवल्या नाहीत.

शिमगोत्सवात दांडी किनारपट्टीसह लगतच्या भागातील मच्छीमार मासेमारीला जात नाहीत. आता शिमगोत्सव संपल्याने पुन्हा मच्छीमार मासेमारीसाठी सज्ज झाला आहे. सद्यःस्थितीत केवळ बांगडा मासळीच किरकोळ प्रमाणात मच्छीमारांना उपलब्ध होत आहे. स्थानिक बाजारपेठेत रत्नागिरी येथील सुरमई आणि अन्य मासळी आयात केली जात आहे. सध्या जिल्ह्यात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्यांच्याकडून ताज्या मासळीला चांगली मागणी आहे; परंतु किंमती मासळी उपलब्ध होत नसल्याने उपलब्ध होणाऱ्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. पापलेट, सुरमई यासारखी मासळी स्थानिक बाजारपेठेत रत्नागिरी येथून येत आहे. तर कोळंबी, बांगडा, कालवं, खेकडे हे किरकोळ प्रमाणात उपलब्ध होत आहे. मासळीच्या दरात वाढ झाल्याने मत्स्याहारी थाळीच्या दरातही मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. परिणामी जादा पैसे मोजावे लागत आहेत.

मासळीची चोरी

समुद्रातील परराज्यातील हायस्पीड, एलईडीधारकांचे, पर्ससीननेटचे अतिक्रमण रोखण्यासाठी शासनाने कडक कायदा केला आहे; मात्र या मच्छीमारांकडून कायद्याच्या पळवाटा शोधून मासेमारी सुरूच आहे. ट्रॉलर्सवरून पर्ससीनच्या जाळ्या खोल समुद्रात पर्ससीनच्या ट्रॉलर्सना पुरविल्या जात आहेत. ट्रॉलर्सधारकांकडे मासेमारीचा परवाना असल्याने शिवाय त्यांच्या नौका पर्ससीनच्या नसल्याने त्यांच्यावर मत्स्यव्यवसाय विभाग कारवाई करू शकत नाही. पर्ससीनच्या साह्याने पकडली जाणारी मासळी रात्री उशिरा बंदरात उतरविली जाते. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी शासनाने कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करायला हवी, अशी मागणी स्थानिक पारंपरिक मच्छीमारांनी केली आहे.

हायस्पीड ट्रॉलर्सचा धुमाकूळ

काही मच्छीमार समुद्रात मासेमारीस गेल्यानंतर हायस्पीड ट्रॉलर्सधारकांकडून त्यांच्या जाळ्या तोडून नुकसान केले जात आहे. परिणामी मासळीच्या उत्पन्नापेक्षा नुकसानच जास्त होत असल्याने अनेक मच्छीमारांनी मासेमारीस जाण्याचे टाळले आहे. मत्स्यव्यवसाय खात्याची गस्तीनौका कार्यान्वित नसल्याने जिल्ह्याच्या सागरी हद्दीत हायस्पीड ट्रॉलर्सधारकांनी धुमाकूळ घातला असून, त्यांच्याकडून मासळीची मोठी लूट सुरू आहे. शिमगोत्सवात स्थानिक मच्छीमार मासेमारी बंद ठेवतात; मात्र आता शिमगोत्सव संपल्याने मासेमारीसाठी पुन्हा मच्छीमार सज्ज झाल्याचे मच्छीमार मालंडकर यांनी सांगितले.

सध्या दक्षिणेकडील वाऱ्याचा जोर वाढला आहे. उन्हाळ्यात मासळीचे वास्तव्य खोल समुद्रात असल्याने किनाऱ्याकडे मासा येत नाही. तसेच हायस्पीड ट्रॉलर्स, एलईडीधारकांकडून लूट सुरू आहे. त्यामुळे किनाऱ्यालगत मासेमारी करणाऱ्यांना मासळी मिळत नाही.

मिथुन मालंडकर, पारंपरिक मच्छीमार

पारंपरिक मच्छीमारांच्या मागण्यांनुसार गस्तीनौकेसाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. लवकरच याबाबत कार्यवाही पूर्ण होऊन गस्तीनौका कार्यान्वित होईल. त्यानंतर परराज्यातील ट्रॉलर्सची होणारी घुसखोरी आपण रोखू शकू.

- रवींद्र मालवणकर, प्रभारी सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.