सावंतवाडीकरांनी आंग्य्रांना चारली धूळ; राजघराण्यात अंर्तगत कलह

सावंतवाडीकरांनी आंग्य्रांना चारली धूळ; राजघराण्यात अंर्तगत कलह
Updated on

सिंधुदुर्ग : सावंतवाडी संस्थांनचे तत्कालीन राजे रामचंद्र सावंत यांचा धीरोदत्त कारभार आणि जयराम सावंत महाराजां शौर्याच्या जोरावर सावंतवाडी संस्थानने पोर्तुगीजांबरोबरच रत्नागिरीकडच्या भागात सत्ता असलेल्या आंग्य्रांनाही शह दिला. राज्याचा विस्तार केला; मात्र नंतरच्या काळात या दोघांमध्ये वाद निर्माण झाले. यामुळे पोर्तुगीजांनी पुन्हा डोके वर काढले. काही विघ्नसंतोषी लोकांनी या दोघांमध्ये निर्माण केलेली कटुता सावंतवाडी संस्थानच्या दृष्टीने मात्र नुकसानकारक ठरली.

सावंतवाडी संस्थानने पोर्तुगीजांचा मिळवलेला भाग पुन्हा त्यांनी काही प्रमाणात मिळवला. इकडे रत्नागिरीकडच्या भागात सत्ता गाजवणारे आंग्रे या आधीच संस्थानचे शत्रू बनले होते. आंग्य्रांचा सागरी किनारपट्टीवर दबदबा होता. त्या काळात जलवाहतुकीला व्यापाराच्या दृष्टीने महत्त्व होते. यामुळे किनारपट्टीवरील वर्चस्व खूप महत्त्वाचे ठरायचे. साहजीकच भक्‍कम आरमार असलेल्या आंग्रे आणि सावंतवाडीकरांच्यात स्पर्धा असणे स्वाभाविक होते. यातून या दोन्ही सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्षाचे प्रसंग आले; मात्र जयराम महाराजांच्या शौर्यामुळे यात सावंतवाडीकरांची सरशी झाली.

आंग्य्रांच्या साम्राज्याचे तत्कालीन प्रमुख तुळाजी आंग्रे हे इंग्रज आणि सावंतवाडीकरांच्या जोडीने साताऱ्याच्या छत्रपतींनाही किनारपट्टी भागात त्रास देवू लागले. यावेळी छत्रपतींनी आंग्रेंना शह देण्यासाठी सावंतवाडीकरांनी त्यांच्यावर हल्ला करावा, अशी भूमिका मांडली. सुरूवातीला सावंतवाडीकरांनी हे फारसे मनावर घेतले नाही; मात्र साताऱ्याच्या गादीकडून यासाठीचा आग्रह वाढत गेला. शेवटी 1749ला सावंतवाडीकर आणि मराठ्यांचे सरदार भगवंतराव पंडीत यांनी मिळून आंग्य्रांवर हल्ला केला. यात त्यांनी लांजापर्यंतचा भाग जिंकला. यात आंग्रेंना धडा शिकवणे हा सातारकर छत्रपतींचा हेतू होता. या हल्ल्यामुळे आंग्रे पेटून उठले. त्यांनी सावंतवाडी संस्थानवर रोष धरला. त्यांनी सावंतवाडीकरांना धडा शिकवण्यासाठी मसुरे (मालवण) येथील संस्थानचा भरतगड किल्ला ताब्यात घेतला.

जयराम महाराजांना हे समजल्यानंतर ते स्वतः मसुरेत गेले. त्या किल्ल्यावरील नाईकवडी घराण्यातील शुरांना समजावून आपल्या बाजूला वळवत पुन्हा हा किल्ला सावंतवाडी संस्थानच्या अधिपत्याखाली आणला. हे समजल्यानंतर तुळाजी आंग्रे आणखी संतप्त झाले. त्यांनी मोठे सैन्य जमवत 1750 मध्ये थेट कुडाळवरच स्वारी केली. ही लढाई बरीच प्रसिद्ध आहे. आंग्रे तळगावच्या मार्गाने बांबार्डे येथे पोहोचले आणि त्या ठिकाणी तळ ठोकला. आंग्रे हल्ला करणार असल्याची माहिती संस्थानचे एकनिष्ठ असलेल्या शिवाजी लोंढे यांनी जयराम महाराजांना दिली. त्यांनीही युद्धाची तयारी केली. हेवाळकर, उसपकर आदी प्रमुख सरदारांना सैन्यासह बोलावले.

स्वतः जयराम महाराज आपल्या बोरमाणकी नावाच्या घोडीवर बसून या सैन्याचे नेतृत्व करत होते. सगळ्यात आधी या दोन्ही सैन्याची गाठ बांबार्डे येथे पडली. येथे छोटीशी लढाई झाली; मात्र यात सावंतांना माघार घ्यावी लागली. पुढे आंग्य्रांनी थेट कुडाळवर हल्ला केला. या ठिकाणी दोन्ही सैन्याचे मोठे युद्ध झाले. सगळ्यात आधी आंग्य्रांकडे शूर सरदार मानाजी फाकंडे हे यात मारले गेले. सावंतवाडीकरांतर्फे लढणारे रजपूत सरदार नवसिंग व आंगोजी काट्या यांचाही मृत्यू झाला; मात्र जयराम महाराजांनी प्रयत्नांची शिकस्त करत आंग्य्रांचा पराभव केला. यावरच न थांबता त्यांनी आंग्य्रांचा लांजा-देवरूखपर्यंत पाठलाग केला. वाटेत मिळालेली आंग्य्रांच्या अधिपत्त्याखाली अनेक गावे जाळली. या लढाईचा आंग्य्रांनी बराच धसका घेतला. ते परत सावंतवाडीकरांच्या वाटेला आले नाहीत.

संस्थानकाळात राजवाड्यात वाजवली जाणारी नौबत याच लढाईत आंग्य्रांकडून मिळवली होती. या लढाईत संस्थानचे मुख्य प्रधान जीवाजी विश्राम सबनीस यांनी पराक्रम दाखवला. यामुळे त्यांना कुडाळ तालुक्‍यातील बाव हे गाव इनाम देण्यात आले होते. या लढाईतील विजयामुळे सावंतवाडी संस्थानची किर्ती वाढली. या दरम्यान साताऱ्याच्या छत्रपतींच्या नावाने पेशवे राज्यकारभार पाहू लागले होते. पेशव्यांच्या दरबारातही सावंतवाडी संस्थानचे राजे आणि त्यांचे प्रधान जीवाजी सबनीस यांचे वजन आणखी वाढले. ही सर्व घडी नीट बसत असतानाच अंतर्गत कलहाचा सावंतवाडी संस्थानला फटका बसला.

जयराम महाराज आणि संस्थानचे राजे रामचंद्र सावंत यांच्यात 1752 मध्ये कलह निर्माण झाला. याचे नेमके कारण सांगता येत नाही; मात्र याबाबत दोन शक्‍यता वर्तवल्या जात आहेत. यातील एक म्हणजे राजघराण्याचा पुढचा वारस कोण? यावरून काही विघ्नसंतोषी लोकांनी मने कलुषीत केल्याने हा वाद निर्माण झाला. दुसऱ्या शक्‍यतेनुसार त्या काळात सावंतवाडी संस्थानने बरेच इमारती लाकूड जमा केले होते. रामचंद्र सावंत महाराजांना त्यातून संस्थानच्या किर्तीला साजेसा भव्य वाडा बांधायचा होता. जयराम महाराजांना यातून आणखी गलबते बांधून आरमार अधिक भक्‍कम करायचे होते. या मतभेदातूनही दोघांमध्ये वितुष्ट आल्याची शक्‍यता वर्तवली जाते.

हा अंतर्गत कलह मिटवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले; मात्र त्यात यश आले नाही. शेवटी हा विषय पुण्यात पेशव्यांना कळला. त्याकाळी बाळाजी बाजीराव हे पेशवे होते. त्यांनी या दोघांनाही कलह मिटवण्यासाठी उपदेशपर पत्रे पाठवली. त्याचाही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी या दोघांमधील वाद शमवण्यासाठी विश्‍वासू असलेले रामचंद्र बाबा सुखठणकर यांना सावंतवाडीत पाठवले. त्यांनी दोघांना समजावले. तरीही याचा उपयोग झाला नाही. शेवटी पेशव्यांनी यातून मार्ग काढला. त्यानुसार रामचंद्र सावंत यांनी सावंतवाडीत राहून जीवाजी सबनीस यांच्या मदतीने राज्यकारभार चालवावा आणि जयराम महाराजांनी आपले दोन मुलगे व पांडुरंग विश्राम सबनीस यांच्यासह पुण्यात पेशव्यांच्या दरबारी येवून रहावे असे सांगितले; मात्र जयराम महाराज स्वाभिमानी होते. त्यांना आपले राज्य सोडून दुसऱ्याच्या दरबारी राहणे पटले नाही. 1753 मध्ये ते आपल्या कुटुंबासह कुडाळमध्ये रहायला गेले. पुढे काही दिवसांनी त्यांचे तेथेच निधन झाले. त्यांना एकूण तीन मुलगे होते; मात्र त्यांच्याबाबत फारशी माहिती मिळत नाही. हा कलह समजल्यामुळे सावंतवाडीकरांचे शत्रू असलेले पोर्तुगीज सक्रिय झाले. त्यांनी रामचंद्र सावंत महाराजांना आपल्याला हवा तसा तह करायला भाग पाडले. 25 ऑक्‍टोबर 1754ला गोव्याचा गर्व्हनर जनरल कोंद दी आल्वा आणि रामचंद्र सावंत यांच्यात हा तह झाला. यानुसार मिशनरी लोकांना सावंतवाडीकरांच्या मुलखात धर्म प्रसाराला मोकळीक मिळाली.

पोर्तुगीज सरकारने केरी, साखळी व मोरजी येथील देसाई तसेच पोर्तुगीजांशी एकनिष्ठ वागण्यास तयार असलेल्या सगळ्यांचे पोर्तुगीजांनी रक्षण करावे. सावंतवाडीकरांनी डिचोली, पेडणे महाल, हळर्ण, सत्तरी व तेरेखोल किल्ला येथील सर्व हक्‍क पोर्तुगीजांना सोडून द्यावे. त्याऐवजी रेडी व निवती हे किल्ले सावंतवाडीकरांना परत द्यावे असे ठरले. या तहापासून पुढे सावंतवाडीकरांनी पोर्तुगीजांना नियमित खंड द्यावा असेही यात ठरले. या सगळ्या घडामोडीनंतर रामचंद्र सावंत महाराज पुढच्या काही वर्षात म्हणजे 1755 मध्ये निवर्तले. त्यांनी 17 वर्षे राज्य केले. मृत्यूवेळी त्यांचे वय अवघे 43 होते. त्यांना एक मुलगा, चार मुली मिळून पाच अपत्य होती.

बोरमाणकी घोडीचे बांद्यातील स्मारक

जयराम महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा सावंतवाडी संस्थानच्या इतिहासात अजरामर आहेत. त्यांची बोरमाणकी ही फार आवडती घोडी होती. तिच्यावर स्वार होवून त्यांनी अनेक लढायांमध्ये विजय मिळवला. शेवटी एका खंदकावरून उडी मारून जाताना पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिच्यावर बांदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जयराम महाराजांनी त्या ठिकाणी या बोरमाणकी घोडीचे त्याकाळात स्मारक उभारले. तेथे दिवाबत्ती करण्यासाठी शेख दाऊदबीन शंख महम्मद, बांदेकर मुजावर यांना सनद दिली होती. आजही हे स्मारक सुस्थितीत आहे.

Edited By- Archana Banage

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.