सिंधुदुर्गनगरी: सिंधुदुर्गनगरी म्हणून नव्याने वसलेल्या शहरातील रहिवासी, कर्मचारी व ओरोसवासीयांसाठी बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आठवडा बाजाराची संकल्पना राबवून रविवार या सार्वजनिक सुटीच्या दिवशी आठवडा बाजार भरविला जातो; मात्र २० वर्षांनंतरही प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे येथे सोयी-सुविधा निर्माण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकांना हाल सोसावे लागत आहेत. यात सुधारणा केव्हा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सिंधुदुर्गनगरी या नवनिर्मित शहराचा आठवडा बाजार रविवार या सुटीच्या दिवशी भरविण्याचे निश्चित करून २० वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री हुसेन दलवाई यांच्या हस्ते या आठवडा बाजाराच्या जागेचे मोठ्या थाटात भूमिपूजन झाले. यानंतर आठवडा बाजारात विक्रेते आणि ग्राहकांच्या सोयीसाठी बाजारशेड बांधण्याचे निश्चित करून प्रशासनाकडून दोन वेळा लाखो रुपये खर्च करून बाजार शेड उभारली; मात्र बाजार शेडचे दर्जेदार काम न झाल्याने दोन्ही वेळा खर्च केलेला निधी वाया गेला. बांधलेल्या शेडचे पत्रे उडून गेले त्यामुळे विक्रेत्यांची सोय होऊ शकली नाही. उन्हाळ्यात कड़क उन्हाचा तर पावसाळ्यात चिखलाचा त्रास कायम सहन करावा लागत आहे. येथे आठवडा बाजार सुरू होऊन सुमारे २० वर्षे लोटली तरी अद्यापही येथील सोयी-सुविधांकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. येथील गटारे व स्वच्छतेचा प्रश्न कायमच आहे. शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे. गेली अनेक वर्ष हे शौचालय नादुरुस्त असून बंदच आहे. मुख्यतः महिला विक्रेते व महिला ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गालगत ओरोस फाटा येथे सिंधुदुर्गनगरीच्या प्रवेशद्वारावरच प्रशस्त जागेत रविवारचा आठवडा बाजार भरविला जातो. याबाबत सुरुवातीला येथील ग्रामस्थ आणि विक्रेत्यांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. येथे आठवडा बाजार भरू लागल्याने येथील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तू भाजीपाला मिळू लागला. या बाजारासाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी दाखल होऊ लागले. ग्राहकांचीही मोठी गर्दी होऊ लागली. येथील रहिवाशांना कुडाळ, कसाल, सुकळवाड या आठवडा बाजारावर अवलंबून राहावे लागत होते. ती गैरसोय दूर झाली.
सिंधुदुर्गनगरीचा आठवडा बाजार भरत असला तरी जिल्हा प्रशासनाकडून येथे कोणत्याही सोयी-सुविधा निर्माण केलेल्या नाहीत. येथे सद्यस्थितीत शौचालय मोडकळीस आल्याने व अन्य कोणतीही सोय नसल्याने विक्रेत्यांची व ग्राहकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. येथे लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली व्यापारी गाळे इमरतीचे काम योग्य न झाल्याने वापराविना दुर्लक्षितच राहिली आहे. या इमारतीचा वापर होताना दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी आठवडा बाजार विकास म्हणजे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे प्रतीक असल्याचे स्पष्ट होत आहे. येथील व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा अद्यापही निर्माण केलेल्या नाहीत. त्यामुळे गेली वीस वर्षे भरणाऱ्या सिंधुदुर्गनगरीच्या आठवडा बाजाराची गैरसोयीचा बाजार म्हणून ओळख निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या व्यापाऱ्यांनी याठिकाणी स्वखर्चाने तात्पुरते गाळे उभारले आहेत. त्यामुळे या बाजाराला काही प्रमाणात ऊर्जितावस्था आल्याचे दिसून येते. येथील गाळेधारक नवनगर प्राधिकरणला जागेचे भाडे म्हणून प्रतिमहा प्रत्येकी बाराशे रुपये एवढा कर भरतात. नवनगर प्राधिकरण दरमहा गाळेधारक व्यापारी यांच्याकडून लाखो रुपये महसूल गोळा करीत आहेत; मात्र त्यांच्यासाठी कोणत्याही सोयी-सुविधा अद्याप निर्माण केलेल्या नाहीत.
व्यापारी संकुलाची प्रतीक्षा
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या गाळेधारकांची सोय होण्यासाठीस प्रशासनाकडून व्यापारी संकुल उभारण्यासाठी जागा निश्चित झालेली आहे. त्यासाठी सुमारे साडेपाच कोटी निधीही मंजूर आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येथील गाळेधारक गेली तीन वर्षे व्यापारी संकुलाच्या प्रतीक्षेत आहेत.
अधिकाऱ्यांचे तोंडावर बोट
सिंधुदुर्गनगरी आठवडा बाजारातील विविध समस्यांबाबत सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरणाचे सचिव तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी याबाबत कोणतेही भाष्य केले नाही.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात विस्थापित झालेल्या गाळेधारकांना प्राधिकरण क्षेत्रात सामावून घेण्यासाठी जिल्हा नवनगर प्राधिकरणने सुमारे साडेपाच कोटींचे व्यापारी संकुल मंजूर केले. त्यासाठी जागाही निश्चित झाली. संकुल झाल्यास व्यापाऱ्यांचे अनेक प्रश्न सुटतील. तेथे सर्व सुविधाही निर्माण केल्या जाणार आहेत.
- महेश ऊर्फ छोटू पारकर, नवनगर प्राधिकरण अशासकीय सदस्य
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.