सिंधुदुर्ग : सुट्यांमुळे मालवण हाउसफुल्ल

वॉटरस्पोर्टस्‌ला सर्वाधिक पसंती; तारकर्ली, देवबाग परिसरही गजबजला
सुट्यांमुळे मालवण हाउसफुल्ल
सुट्यांमुळे मालवण हाउसफुल्ल sakal
Updated on

मालवण: सलग सुट्या आणि परीक्षा संपल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्यटकांमुळे येथील पर्यटन बहरले आहे. सुट्यांमुळे मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांच्या लोंढ्यामुळे मालवण, तारकर्ली, देवबाग परिसर हाउसफुल्ल झाल्याचे चित्र आहे. किनारपट्टी भागात वॉटरस्पोर्टस्‌चा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे. मात्र, किमती मासळीच उपलब्ध नसल्याने मत्स्यखवय्यांना बांगडा, तारली यांसारख्या मासळीवर समाधान मानावे लागत आहे.

कोरोना महामारीनंतर पर्यटन खुले झाल्यानंतर देशातील विविध भागातून येथे पर्यटक दाखल होत होते. त्यानंतर कोरोनाच्या काळातील सर्व निर्बंध शासनाने शिथिल केल्यानंतर मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटक, केरळसह देशाच्या अन्य भागातून पर्यटक येथे दाखल होऊ लागले आहेत.

या महिन्यात सलग आलेल्या सुट्यांमुळे पर्यटक मोठ्या संख्येने येथे दाखल झाले आहेत. पर्यटकांची जास्त पसंती किनारपट्टी भागाकडे असल्याने देवबागपासून मालवणपर्यंतची किनारपट्टी गर्दीने फुलून गेली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हिंगसह अन्य जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्याक़डे पर्यटकांचा कल दिसतो. त्यानुसार देवबाग, तारकर्ली, वायरी भूतनाथ, बंदर जेटी, चिवला बीच परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. विविध जलक्रीडा प्रकारांचा आनंद पर्यटकांकडून लुटला जात आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची गैरसोय

गेले काही दिवस सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. याचा मोठा फटका हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे. सलग सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. या पर्यटकांना शाकाहारी, मत्स्याहारी जेवण बनवून देण्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी चांगली मेहनत घेतली आहे; मात्र सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने जेवण बनविण्यासाठी बराच वेळ

जात आहे. त्यामुळे पर्यटकांना वेळेत जेवण उपलब्ध करून देणे हॉटेल व्यावसायिकांना कठीण बनले आहे. येत्या सोमवारपासून महावितरणकडून भारनियमन सुरू केले जाणार असल्याने पर्यटन व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यासमोरील चिंतेत वाढ झाली आहे. गेल्या दोन सायंकाळी दुपारचे जेवण पर्यटकांना सहा वाजेपर्यंत घ्यावे लागले आहे.

जाहिरात फलकांचा भुर्दंड

परीक्षा संपल्याने व सलग सुट्यांमुळे मालवणात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. येथे येणारे पर्यटक इच्छित पर्यटनस्थळी पोचण्यासाठी गुगल मॅपचा वापर करतात. यात शहरातील एक दिशा, दुहेरी मार्गाची व्यवस्थित माहिती या मॅपवर नसल्याने तसेच शहराच्या भरड येथे दिशादर्शक मार्गाची माहिती देणारे फलक जाहिरातींच्या फलकांमुळे पर्यटकांना दिसत नसल्याने त्यांना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड भरावा लागत आहे. त्यामुळे दिशादर्शक मार्ग पर्यटकांना दिसावेत, यासाठी भरड भागात जाहिरातींच्या फलकांचे झालेले अतिक्रमण पालिका प्रशासनाने तत्काळ हटविणे गरजेचे बनले आहे.

किंमती मासळी गायब

मालवणात येणारा पर्यटक ताज्या मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी येतो; मात्र वातावरणातील बदलामुळे सुरमई, पापलेट यासारखी किंमती मासळीच मच्छीमारांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे. सध्या ही मासळी हॉटेल व्यावसायिकांना बाहेरून मागवावी लागत आहे. स्थानिक बाजारपेठेत सध्या बांगडा, तारली, समुद्री खेकडे, कोळंबी यासारखीच मासळी उपलब्ध आहे. किंमती मासळीचा आस्वाद घेता येत नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. बांगडा मासळीच्या दरात घसरण झाली आहे, तर मोरी मासळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.