सिंधुदुर्ग : शिक्षकांनाही आता मालवणीचे धडे

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम; सेतू पुस्तिकाही
प्रजित नायर
प्रजित नायरsakal
Updated on

ओरोस : राज्याच्या विविध भागांतून येऊन जिल्ह्यात कार्यरत गुरुजनांना आता प्रथम मुलांची बोलीभाषा असलेल्या मालवणी भाषेचे धडे गिरवावे लागणार आहेत. तसे नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने केले आहे. यासाठी ‘सेतू’ नावाची मार्गदर्शक पुस्तिका तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मुलांची बोलीभाषा मालवणी असल्याने ती शिक्षकांना माहीत होणे आवश्यक आहे. शिक्षकांनी ही भाषा समजून घेऊन या भाषेतून प्राथमिक शिक्षण दिल्यास मुलांना प्रमाण भाषेकडे (मराठी) लवकर नेणे सुलभ होणार आहे.

पुढील काळात राष्ट्रीय शिक्षण अभ्यासक्रम सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमात बोली भाषा केंद्रित अभ्यासाला प्राधान्य आहे; मात्र विविध ठिकाणांहून येणाऱ्या शिक्षकांना प्रांतिक भाषेची समस्या येते. प्रत्येक प्रांताची एक स्थानिक भाषा असते. भारतात दर २६ किलोमीटरला बोलीभाषा बदलते. स्थानिक भाषा व्याकरणात बांधणे कठीण आहे. पहिलीत दाखल होणारी मुले ज्या बोलीभाषेत वाढलेली असतात, त्यातून त्यांच्याशी संवाद झाल्यास त्यांना आकलन पटकन होते. त्याच भाषेतून ती जलदगतीने आपले विचारही मांडू शकतात. त्यामुळे या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी त्यांच्याशी मालवणीत बोलणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांना या भाषेचे ज्ञान असणेही आवश्यक आहे. बोलीभाषेतील प्रचलित शब्दांची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.

‘सेतू’ पुस्तिका मदतगार ठरेल

जिल्ह्यात घरोघरी मालवणी बोलली जाते. परिणामी शाळेत येणारा विद्यार्थी मालवणीच बोलतो. शाळेत आल्यावर मात्र त्याने मराठीतून बोलावे, असा एकूणच व्यवस्थेचा आग्रह असतो; मात्र या प्रमाण भाषेपासून कोसो दूर असलेला विद्यार्थी व्यक्त होणे थांबते. याचे दूरगामी परिणाम त्याच्या व्यक्तिमत्त्वावर होतात. अशावेळी स्थानिक भाषेच्या माध्यमातून समाज विकासाचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर उभे राहते. हे उत्तरदायित्व निभावण्यात ही पुस्तिका मदतगार ठरेल, असा विश्वास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य अनुपमा तावशिकर यांनी व्यक्त केला.

सेतू पुस्तिकेत हे आहे...

सेतू पुस्तिकेत मालवणी भाषेतील बडबड गीते, कथा, म्हणी, शब्दार्थ आदींचा समावेश आहे. बोलीभाषेचा हात पकडून प्राथमिक शिक्षकांना मुलांना हळूहळू प्रमाण भाषेकडे नेणे सोपे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.